Ponda Municipal Council Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Elections 2023 : प्रभाग पुनर्रचना, आरक्षणामुळे वाढली रंगत; प्रचारावर शेवटचा हात

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

फोंडा पालिका निवडणूक आता अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे उमेदवारांचे प्रचारावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी पालिका क्षेत्रात काही प्रभागांची केलेली पुनर्रचना मतदारांना संभ्रमात पाडताना दिसत आहे.

खासकरून प्रभाग 9 व 15 यांची पुनर्रचना म्हणजे ‘गोंधळात गोंधळ’चा प्रकार वाटतो आहे. प्रभाग 8 व 11 यांचे सलग तीनवेळा झालेले आरक्षणही धक्कादायक असेच म्हणावे लागेल. यावेळी प्रथमच इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झालेला प्रभाग 10 ही अनेकांना कोड्यात टाकणारा ठरतो आहे.

प्रभाग 10 मध्ये इतर मागासवर्गीयांची संख्या बरीच कमी असूनही मागासवर्गीयांकरता आरक्षित का? असा प्रश्न या प्रभागातील मतदारांकडून विचारला जात आहे. या प्रभागातील एक मतदार तसेच समाजकार्यकर्ते गौरेश कोलवेकर यांनी हा प्रभाग मागासवर्गीयांकरता आरक्षित केल्यामुळे या प्रभागातील सर्वसाधारण गटातील महिलांची संधी हुकली आहे, असे सांगितले.

यावेळी गेल्या वेळच्या तुलनेने उमेदवार कमी असूनही काही प्रभागांत चुरस वाढलेली आहे. मतदारांत मात्र जास्त उत्साह दिसून येत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे एक भाजप सोडल्यास इतर पक्ष ही निवडणूक गांभीर्याने घेत आहेत, असे दिसत नाही.

काँग्रेस फक्त दोन-तीन जागांवरच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. काँग्रेसने आपली सर्व शक्ती प्रभाग ११ व १२ वर लावलेली दिसत आहे. मागच्या वेळी काँग्रेसने १५ ही प्रभागांवर लक्ष केंद्रित केले होते. मगोची हीच स्थिती आहे. रायझिंग फोंडातर्फे १२ जागा लढविल्या जात असल्या तरी गेल्या खेपेप्रमाणे त्या मगोप्रणित आहेत की नाहीत, हे कळायला मार्ग नाही.

गेल्या फोंडा पालिका निवडणुकीत मगोचे नेते तथा विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली होती. पण यावेळी अजूनतरी त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. रायझिंग फोंडातर्फे डॉ. केतन भाटीकर हे किल्ला लढवत असून त्यांना किती यश मिळते हे बघावे लागेल.

मात्र, सुरवातीलाच त्यांच्या खंद्या समर्थक विद्या पुनाळेकर यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा पॅनल एक पाऊल मागे गेल्यासारखा वाटायला लागला आहे. पण ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही वृत्ती बाळगत हा पॅनल पुढे सरकताना दिसत आहे.

‘दै. गोमन्तक’चा बोलबाला

‘दै. गोमन्तक’ने फोंडा पालिकेतील 15 प्रभागांचे प्रभागनिहाय विश्‍लेषण करून या पालिकेच्या निवडणुकीच्या शब्दांकनात आघाडी घेतल्याचे फोंड्यात बोलले जात आहे. अशा प्रकारचे विश्‍लेषण करणारे ‘गोमन्तक’ हे एकमेव दैनिक असल्याचा अभिप्राय फोंडा विकास समितीचे अध्यक्ष राम कुंकळकर यांनी दिला आहे.

यामुळे आम्हाला पूर्वीच्या व सध्याच्या प्रभाग रचनेतील बदल, राजकीय स्थितीतील बदल इत्यादी माहिती समजू शकली, असे ते म्हणाले. याच आधारावर वर्ष झाल्यानंतर प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांच्या कार्याचा आढावा घेणारी मालिका ‘दै. गोमन्तक’ने सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

उमेदवारांबाबत साशंकता

फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हेही जातीने निवडणुकीत लक्ष घालताना दिसत आहेत. मात्र, काही प्रभागांत दिलेले चुकीचे उमेदवार भाजप पॅनलसमोर प्रश्न उभे करू शकतात, असा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. पण दुसऱ्या पॅनलमधले उमेदवार निवडून आले तरी ते त्या पॅनलकडे एकनिष्ठ राहतील की भाजपमध्ये जातील हे सांगणे कठीण बनले आहे.

तानावडे यांचे जातीने लक्ष

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी फोंडा पालिका निवडणुकीत जातीने लक्ष घातले असून ते स्वतः प्रचाराचा आढावा घेताना दिसत आहेत. प्रचारात काही कमी राहिले आहे का ते पाहून ती कमी दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एखाद्या प्रदेशाध्यक्षाने पालिका निवडणुकीत संपूर्णपणे सक्रिय होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

‘भाजप’ निवडणूक गांभीर्याने घेतो : तेंडुलकर

भाजप प्रत्येक निवडणूक मग ती पंचायतीची असो जिल्हा पंचायतीचे असो वा पालिकेची असो गांभीर्याने घेतो, असे मत राज्यसभा खासदार तथा फोंडा पालिका निवडणुकीचे भाजपचे प्रभारी विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केले. आपण निवडणूक होईपर्यंत कृषी मंत्री रवी नाईक यांच्याबरोबर प्रचार करणार असून प्रभागातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले.

अटीतटीची लढाई होण्याची अपेक्षा

प्रभाग २, ९ व १५मध्ये दुरंगी लढती असून त्यामुळे इथे अटीतटीची लढाई अपेक्षित आहे. मतदार मात्र पक्षापेक्षा उमेदवाराच्या कार्याला महत्त्व देताना दिसत आहेत. उमेदवाराचा असलेला वैयक्तिक संपर्कही महत्त्वाचा ठरत आहे. एकंदरीत संपूर्ण पालिका क्षेत्राचा आढावा घेतल्यास मतदारांपेक्षा उमेदवारांचा उत्साह अधिक दिसत असून युद्धात व राजकारणात सर्व काही क्षम्य असते, ही धारणा मनाशी बाळगत ते खिंड लढविताना दिसत आहेत एवढे खरे.

भाजपला सहा नगरसेवकांची गरज

सुरवातीला दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजप पॅनलने आघाडी घेतली आहे. आता पालिकेत बहुमताचा आकडा गाठायला त्यांना फक्त सहा नगरसेवकांची गरज आहे. सध्या ही पालिका भाजपजवळ असल्यामुळे ती भविष्यातही आपल्याकडे ठेवण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT