Ponda Municipal Council Election
Ponda Municipal Council Election  Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council: निवडणुकीनंतरही फोंड्यातील राजकारण ‘तेज’; भाजपात अस्वस्थता

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा नगरपालिका निवडणूक होऊन आता मंडळ स्थापन झाले असले तरीही फोंड्यातील राजकारण शमण्याची चिन्हे काही दिसत नाही. पालिकेबरोबर फोंडा मतदारसंघातील कुर्टी- खांडेपार ही एकमेव पंचायतही भाजपने काबीज केल्यामुळे आता भाजपचे या मतदारसंघावर राज्य झालेले आहे. पण तरीही भाजप गोटात अजूनही अस्वस्थता दिसत आहे.

रितेश नाईक फोंड्याचे नगराध्यक्ष झाल्यामुळे भाजपच्याच काही नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसल्यासारखे झाले आहे. त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता अधूनमधून प्रकट होताना दिसत आहे. सध्या फोंडा भाजपमध्ये दोन गट असून एक मूळ भाजपावासी व दुसरा रवी नाईकांबरोबर झालेले भाजपवासी असे त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. या दोन गटातला वाद थेटपणे चव्हाट्यावर येताना दिसत नसला तरी पडद्यामागून या वादाला अधून मधून फोडणी मिळत असते.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी गटातर्फे रायझिंग फोंडाचे ज्येष्ठ नगरसेवक शिवानंद सावंत यांना उमेदवारी दाखल केली होती. तत्पूर्वी रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपले चार व अपक्ष म्हणून निवडून आलेले व्यंकटेश नाईक या पाच नगरसेवकासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी नगराध्यक्ष भाजपचा व उपनगराध्यक्ष रायझिंग फोंडाचा असे समीकरण होईल, असा कयास व्यक्त होत होता. पण तसे न होता सावंतानी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

उपनगराध्यक्षपदासाटी रायझिंग फोंडाच्या वेदिका वळवईकर यांनी अर्ज दाखल केला. आता फक्त चार नगरसेवक असूनसुद्धा रायझिंग फोंडाने भाजपला आव्हान देण्याचे धारिष्ट कोणाच्या '' बळावर ''दाखवले, यावर निवडणूक समयी चर्चा सुरू होती. पडद्यामागे काही वेगळेच राजकारण शिजते आहे की काय? यावरही चर्वितचर्वण सुरू होते.

पण गुप्तमतदानाऐवजी हात दाखवून मतदान केल्यामुळे या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. पण नंतर पालिकेच्या इमारतीसमोर काढण्यात आलेल्या फोटोत सत्ताधारीचे फक्त पाचच नगरसेवक दिसल्यामुळे परत या चर्चेला हवा मिळाली. मात्र मुख्यमंत्र्याबरोबरच्या फोटोत भाजपचे दहाही नगरसेवक दिसल्यामुळे ही चर्चा खंडित झाली असली तरी या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीला असलेल्या अनेक कंगोऱ्यांबाबत सध्या शहरात चर्चा होताना दिसत आहे.

गुप्त मतदान झाले असते, तर..

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत गुप्त मतदान झाले असते, तर मडगाव पालिकेत मागे झाले तसे होऊ शकले असते, असे मत व्यक्त होत आहे. यातून एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते अशी संभावना बोलली जात आहे. तशी सगळी ‘फिल्डिंग’ लावली गेली होती, पण हात दाखवून मतदान झाल्यामुळे ही फिल्डिंग बदलावी लागली, असे सांगितले जात आहे. पण या खेळाची चाहूल लागल्यामुळेच नगरसेवकांना थेट मतदानाद्वारा ‘आमने सामने’ आणावे लागले, अशी चर्चा आहे. आता हा ‘कथित निशाणा चुकला असला तरी यातून ‘दाल में कुछ काला है’ हे दिसून आले एवढे मात्र खरे.

भाटीकर नेमके कोठे आहेत? :

केतन भाटीकरांनी आपल्या चार व अपक्ष नगरसेवकाबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आणि त्यांनीही त्यांचे स्वागत केल्यामुळे फोंडा शहरात तो एक चर्चेचा विषय बनतो ना बनतो, इतक्यात त्याच ग्रुपबरोबर भाटीकरानी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला खमंग फोडणी मिळाली.

पण भाटीकरांनी आपण फोंड्याच्या विकासाकरता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे सांगून ढवळीकर हेच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या फोंडा पालिका निवडणुकीत ढवळीकरानी रायझिंग फोंडा पॅनलला विशेष मदत केली नव्हती, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे या पॅनलने जे काही यश मिळवले त्याचे श्रेय मतदार भाटीकारांना देताना दिसतात. मात्र मुख्यमंत्री, वीजमंत्री यांची एकाच वेळी भेट घेऊन भाटीकरांनी एका दगडात दोन ‘तीर’ मारल्याचे बोलले जात आहे. हे ‘तीर’ कोणते? हे भविष्यात स्पष्ट होणार असले तरी सध्या फोंडा पालिकेत व कुर्टी- खांडेपार पंचायतीत भाटीकर विरुद्ध ‘इतर’ अशी स्थिती दिसते आहे. एवढे मात्र निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT