Ponda By Election
फोंडा: पात्रावनंतर फोंड्याचे काय...हा प्रश्न अनेकांना सतावत असताना रवींचा राजकीय वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांच्याकडे द्यावा, अशा अनेकजणांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बहुतांशजणांनी तर आता विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने फोंडा मतदारसंघातून निवडण्यात येणारा लोकप्रतिनिधी बिनविरोध असावा, असे म्हटले आहे, पण विरोधी पक्ष त्याला मान्यता देईल काय, हाही खरा प्रश्न आहे.
येत्या २०२७ च्या निवडणुकीत फोंड्यात सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यादृष्टीने काँग्रेस, आपसह गोवा फॉरवर्डनेही अनेक उपक्रम आखून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यात काँग्रेस पक्षाने दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या माध्यमातून फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी अनेक उपक्रम आखले.
‘आप’नेही फोंड्यात ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केली आहे. गोवा फॉरवर्डने ‘जनता दरबार’द्वारे मतदारांशी संवाद साधला आहे. असे असताना आता रवी पुत्राला बिनविरोध निवडून देण्याची तयारी निश्चित नसणार. त्यामुळे बिनविरोध निवडून देण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावल्यासारखे होणार आहे.
रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी आपण विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे मागच्या काळातच दाखवून दिले आहे. दोनवेळा फोंडा पालिकेचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम केले. या काळात जेसी तसेच इतर स्वयंसेवी संस्था संघटनांशी असलेले संबंध तसेच फोंडा शिक्षण संस्थेचा सचिव म्हणून केलेल्या कामाचा निश्चितच रितेश यांना फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
रवी नाईक यांच्या अंत्यसंस्कारावेळी आयोजित शोकसभेत भंडारी समाजाच्या प्रतिनिधींनी पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. निवडून आल्यावर मंत्रिमंडळात समावेश करण्याचीही मागणी केली आहे, पण यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मौन बाळगले आहे.
निवडणुकीतील उमेदवार निवडताना भाजपची एक वेगळी पद्धत आहे. उमेदवार ठरवताना सर्व बाबी तपासूनच निवड ठरवली जाते. त्यासाठी भाजपचे एक मंडळ कार्यरत असते. त्यामुळे पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपच ठरवणार आहे, जे आम्हाला मान्य असेल.- सुनील देसाई, ज्येष्ठ नेते, भाजप फोंडा
जनमानसाच्या मतानुसार उमेदवार ठरवला तर विजय निश्चितच होतो. सध्या रितेश नाईक यांना उमेदवारी देण्यासंबंधी जनमानसाचा विचार आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत रितेशला उमेदवारी दिली तर पुढे दीड वर्षांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीस पक्षाला मोकळीक राहणार आहे.ॲड. मनोहर आडपईकर, ज्येष्ठ नेते, भाजप
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.