पणजी : येत्या 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 186 पंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असून उमेदवारांनी मतदारांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. आप्तेष्टांना निवडून आणण्यासाठी आजी-माजी आमदार सक्रीय झाले असूत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षीय पातळीवर निवडणूक होत नसली तरी सर्व आजी-माजी आमदार आपापले समर्थक उमेदवार निवडून येण्यासाठी झटू लागले आहेत. सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, आमदार दिलायला लोबो, माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
सभापती रमेश तवडकर यांच्या काणकोण मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. कारण त्याठिकाणी त्यांच्या पत्नी सविता तवडकर या पैंगीण पंचायतीतून रिंगणात आहेत. या प्रभागात आणखी दोन उमेदवार असल्याने येथे तिहेरी रंगत रंगणार असेच चित्र आहे.
त्यामुळे सविता तवडकर यांच्या विजयासह पैंगीण पंचायत आणि मतदारसंघातील इतर पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, बार्देश तालुक्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसते. खासदार विनय तेंडुलकरही प्रचारात सक्रीय झाले ते त्यांनी आपल्या भाच्याच्या विजयासाठी रविवारी मोरजीमध्ये बैठका घेतल्या.
दुसरीकडे, विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला असला तरी सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायतींवर भाजपचा झेंडा उभारण्यासाठी फ्रान्सिस सिल्वेरा सध्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आपला पुतण्या ॲल्विन याला आगशी पंचायतीतून प्रभाग क्रमांक एकमधून बिनविरोध निवडून आणले आहे. भंडारी समाजाचे नेते अनिल होबळे यांनीही पत्नी संध्या होबळे यांना मेरशी पंचायतीत रिंगणात उतरविले आहे.
पर्वरी मतदारसंघातून पेन्ह दि फ्रांस आणि साल्वादोर दो मुंद याठिकाणचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात मंत्री रोहन खंवटे यांना यश आले आहे. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी वेरे-रेईश मागूस पंचायतीतून प्रभाग क्रमांक दहामधून मातोश्री नैना जयप्रकाश नाईक यांना बिनविरोध निवडून आणले आहे.
विधानसभेत पत्नी जनिता मडकईकर यांना अपयश आले असले तरी त्याचे दुःख बाजूला सारत माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मुलगी सुहिरा मडकईकर हिला पंचायत सदस्य करण्यासाठी व्यूहरचना आखल्या आहेत. त्याशिवाय आई जनिता यासुध्दा सुहिरा यांच्याबरोबर प्रभाग चारमध्ये प्रचाराला लागलेल्या आहेत. या प्रभागात एकूण सात उमेदवार असल्याने सप्तरंगी लढत होत आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
पुत्रासाठी लोबो दाम्पत्यांचे कष्ट : कळंगुटचे आमदार मायकल लोबो व आ.दिलायला लोबो हे दोघेही पुत्र लॅनियल यांचा राजकीय प्रवास सुकर करण्यासाठी कष्ट घेत आहेत. पर्रा पंचायतीवर लोबो यांचे वर्चस्व राहिले आहे. डॅनियल ज्या प्रभाग क्रमांक 2 मधून उभे आहेत, त्यांच्यासमोर इतर दोन उमेदवारांचे आव्हान आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.