केरळच्या मेपपयुर, कोझिकोड येथून एक युवक आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला. दीपक असे या 36 वर्षीय युवकाचे नाव आहे. दीपकच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
दीपकच्या घरच्यानी तो मृत झाल्याचे समजून देण्यात आलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले. डीएनए चाचणी केल्यानंतर हा मृतदेह दीपकचा नसल्याचा त्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला.
दरम्यान, गोवा आणि केरळ पोलिसांनी केलेल्या तपासानंतर तब्बल आठ महिने उलटून गेल्यावर केरळमध्ये मृत घोषित झालेला दीपक मडगाव येथे जिवंत सापडला आहे. या विचित्र घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय दीपक जून 2022 मध्ये मेपपयुर येथून बेपत्ता झाला. दीपकच्या कुटुंबीयांना दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह दीपकचा असल्याचे सांगून सोपविण्यात आला. मात्र संशय आल्याने त्याची डीएनए चाचणी करण्यात आली व तो मृतदेह दीपकचा नसल्याचे समोर आले.
धक्कादायक बाब म्हणजे सोपविण्यात आलेला मृतदेह सोन्याच्या तस्करीमध्ये हत्या झालेला इर्शाद याचा असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, यामुळे दीपकच्या कुटुंबीयांनी मोठा वाद घातला. त्यानंतर दीपक शोधण्यासाठी नादापुरम कंट्रोल रूम डीवायएसपी अब्दुल मुनीर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली.
दरम्यान, पोलीस तपासात दिरंगाई होत असल्यामुळे दीपकची आई श्रीलता यांनी केरळ उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.
जिल्हा गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पथकाने गोवा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने केलेल्या तपासात दीपक आठ महिन्यानंतर मडगाव येथे सापडला.
गुन्हे शाखेने दीपकचा फोटो गोवा पोलिसांना पाठवला होता. गोव्यातील एका लॉजमध्ये दीपकने दिलेल्या आधारकार्डमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवण्यात मदत झाली.
बेपत्ता होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
आठ महिन्यानंतर दीपक अखेर गोव्यात सापडला पण, त्याचे बेपत्ता होण्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच, आठ महिन्यात झालेल्या घडमोडींची त्याला काहीच माहिती नव्हती का? याशिवाय तो सज्ञान असल्याने त्याला माघारी जाण्यास काय अडढळा येत होता? असे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत.
दरम्यान, दीपकची चौकशी केल्यानंतरच या सर्व प्रश्नांनी उत्तरे मिळतील असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.