Non-local dominance affecting Goa's truck business
पणजी: पेडणे बार्देश ट्रक असोसिएशनने परप्रांतीयांकडून मालवाहतूक व्यवसायावर वर्चस्व गाजवले जात असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आरटीओंनी या ट्रक व्यावसायिकांची कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. ट्रक व्यवसायात परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर संकट आले आहे.
परप्रांतीयांनी गोव्यात व्यवसाय सुरू केल्याने स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा ठपका असोसिएशनने ठेवला आहे. ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी स्पष्ट केले की, आरटीओ विभागाला पत्र पाठवून परप्रांतीय वाहन मालकांची माहिती मागवण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी गोव्यात भाड्याने घेतलेल्या घरांच्या करारावर आधारित वाहनांची नोंदणी केली आहे. ही नोंदणी नियमांच्या चौकटीत आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
गोव्यात बाहेरून आलेले लोक व्यवसाय करत असल्याने स्थानिकांना अडचणी येत असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी केले होते. असोसिएशनने नमूद केले की, बाहेरून येऊन रोजगार करणारे लोक मान्य आहेत, परंतु जर त्यांनी स्थानिक व्यवसायांवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली, तर आम्ही गप्प बसणार नाही.
असोसिएशनने ‘आरटीओ’कडे परप्रांतीय वाहन मालकांची सविस्तर माहिती आणि वाहन नोंदणीसाठी वापरलेल्या भाडेकराराची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीत स्थानिकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. पेडणे बार्देश ट्रक असोसिएशनच्या या मागणीनंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
शेट्ये यांनी सांगितले की, रेती आणि चिरे यासारख्या पारंपरिक व्यवसायांमध्ये स्थानिकांचा सहभाग लक्षणीय होता. मात्र, आता बाहेरून आलेल्या लोकांनी मालवाहतूक गाड्यांचा व्यवसाय ताब्यात घेतला आहे. आमच्याकडे पेडणे आणि बार्देश तालुक्यांतील प्राथमिक माहिती आहे, ज्यात परप्रांतीयांच्या सुमारे ७०० ते ८०० मालवाहू गाड्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.