Save Goa Front राज्यात यंदा अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. अशा स्थितीत म्हादई नदी वाचवण्यासाठी जनतेने एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे. एकवेळ अशी येईल की, पाण्यासाठी लोकांमध्ये वाद होतील.
त्यामुळे आतापासूनच म्हादईच्या बचावासाठी लोकांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. येत्या क्रांतिदिनी मडगाव येथे लोहिया मैदानावर म्हादई बचावसंदर्भात होणाऱ्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेव्ह गोवा फ्रंटने चिंबल येथे पत्रकार परिषदेत केले.
यावेळी सांताक्रुझमधील आरटीआय कार्यकर्ते आर्थुर डिसोझा म्हणाले की, तिसवाडीतील अनेक भागांत अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून राहावे लागते. काही ठिकाणी बांधकामे उभारून विहिरी बुजविल्या आहेत.
सांत आंद्रेत पाण्याचे दुर्भीक्ष
सांत आंद्रेचे समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर म्हणाले की, सांत आंद्रे मतदारसंघात गेल्या महिन्यात पाच दिवस पाणी नव्हते. पाण्यासाठी लोकांनी तेथील विहिरींवर धाव घेतली. त्यामुळे विहिरीतील पाणी काही दिवसांतच संपले.
भविष्यात म्हादईचे पाणी बंद झाले तर गोव्यात पाणी टंचाईमुळे लोकांमध्ये वाद होणे शक्य आहे. म्हादई बचावसाठी सरकार जरी प्रयत्न करत असले तरी त्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही.
बोंडवेल तळ्यामुळे पाणी सुरक्षित
सांताक्रुझ मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या आहे. त्यावर आजपर्यंत तोडगा काढलेला नाही. तेथील बोंडवेल तळे राखण्यासाठी लोकांना पाठपुरावा करावा लागला.
या तळ्यामुळे या भागातील काही विहिरी अजून सुरक्षित आहेत, असे आर्थुर डिसोझा म्हणाले. चिंबल, मेरशी, कालापूर तसेच सांत आंद्रे भागात पाण्यासाठी आजही लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पाऊस आला तरी अजूनही राज्यातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असे सेल्सा फर्नांडिस म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.