मडगाव : ज्या ऐतिहासिक मैदानाकडे फक्त मडगावकरांचेच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीयांचे भावनिक संबंध जुळले आहेत ते मैदान वीज खात्याच्या लेखी 'बेवारस मैदान' आहे का? असा सवाल सध्या मडगावातील स्वातंत्र्य सैनिकांची मुले विचारत आहेत. याचे कारण म्हणजे लोहिया मैदानाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना या ऐतिहासिक महत्त्वाच्या मैदानावर वीज खात्याने भलत्यांचाच एक ट्रान्स्फरमर तिथे आणून उभा केला आहे. त्यामुळे मैदानाची जागा तर कमी झाली आहेच शिवाय या मैदानाचे सौंदर्यही नष्ट झाले आहे.
18 जून 1946 या दिवशी याच मैदानावरुन डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीजांचा भाषण बंदीचा हुकूम तोडला होता. याच ऐतिहासिक घटनेने गोवा मुक्तीच्या क्रांतीची ठिणगी पेटवली होती. त्यासाठी या मैदानाला ऐतिहासिक महत्व असून सध्या सार्वजनिक सभा घेण्यासाठी मडगावात उपलब्ध असलेले ते एकमेव मैदान आहे.
मडगावातील या मैदानाचे सध्या सौंदर्यीकरणाचे काम चालू आहे. ट्रान्सफॉर्मरमुळे मैदानाचे सौंदर्यीकरण खराब होत असल्याने समोर एक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र या भिंतीमुळे या मैदानात आत काय चालू आहे ते बाहेर असणाऱ्या लोकांना दिसणे शक्य नाही. या मैदानावर सभा असतात त्यावेळी मैदान लोकांनी भरून गेले तर बाकीचे लोक रस्त्यावर उभे राहून ती सभा ऐकतात. आता या भिंतीमुळे अशा बाहेरून सभा ऐकणाऱ्यांना व्यत्यय होणार आहे.
18 जून क्रांती समितीचे खजिनदार विनायक मोर्डेकर यांना या संदर्भात विचारले असता, या पूर्वी हा ट्रान्सफरमर मैदानाच्या समोर जी इमारत आहे तिथे होता. मात्र मडगावात भूमिगत वीज यंत्रणा सुरु झाली त्यावेळी या समोरच्या इमारतींना वीज पुरवठा करण्यासाठी असलेला हा ट्रान्सफॉर्मर परस्पर लोहिया मैदानाच्या मोकळ्या जागेत कुणाचीही परवानगी न घेता वीज खात्याने बसवला, असं त्यांनी सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले, ज्या इमारतींना वीज पुरवठा या ट्रान्सफॉर्मरवरुन होत आहे. त्या इमारतींनी यासाठी जागेची तजवीज करुन ठेवली आहे. त्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर त्या जागेत हलवण्यात यावा अशी मागणी आम्ही स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्याकडे केली आहे. त्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनाही आम्ही भेटणार असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.