Goa city traffic update Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजी शहराला ‘ट्रॅफिक जॅम’चा विळखा! पाटो पुलाची दुरुस्ती, स्मार्ट सिटीच्या खोदकामांमुळे वाहनांच्या प्रचंड रांगा

Patto Bridge Repairs Updates: कदंब बसस्थानक, आंबेडकर उद्यान, दिवजा सर्कल, जुना पाटो पूलाकडे वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी कार्यालये बंद झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा दिसून आल्या.

Sameer Panditrao

पणजी: नव्या पाटो पुलाचे दुरुस्ती काम, त्यामुळे अन्य मार्गाने वळविलेली वाहतूक आणि त्यातच राजधानी पणजीत जागोजागी सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या खोदकामांमुळे आज पणजी शहर ‘ट्रॅफिक जॅम’च्या विळख्यात अडकले होते.

रुआ दी ओरेम खाडीवरील नव्या पाटो पुलाचे दुरुस्ती काम, शहरात स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे आणि जुन्या पाटो पुलावरून वळविलेल्या वाहतुकीमुळे शहरात शुक्रवारी अनागोंदीचा प्रत्यय आला.

कदंब बसस्थानक, आंबेडकर उद्यान, दिवजा सर्कल, जुना पाटो पूलाकडे वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी कार्यालये बंद झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा दिसून आल्या. नव्या पाटो पुलावरील एका मार्गाचे दुरुस्तीचे सलग काम चार दिवस सुरू राहणार असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार, असे दिसते.

एका बाजूने पणजीकरांची अजूनही स्मार्ट सिटी कामांच्या त्रासातून सुटका झालेली नाही. त्यातच आता वाहतूक वळविल्याने पणजीतून बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शुक्रवार सरकारी कामाचा दिवस असल्याने सकाळी व संध्याकाळी कदंब बसस्थानक, दिवजा सर्कल, जुना पाटो पूल, तसेच काजू दरबारसमोर वाहतूक कोंडी दिसून आली. ज्या मार्गावरून वाहतूक वळविली होती, त्या मार्गांवर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस होते; परंतु वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडीचा प्रकार दिसून आला.

वाहतूक कोंडी झाल्याने वाहने काही काळ एकाच ठिकाणी थांबण्याचे प्रकार अधून-मधून घडले. सायंकाळी मांडवी पुलाखाली वाहनांच्या रांगा दिसून आल्या. शहराबाहेर पडणाऱ्या रहदारीमध्ये पर्यटकांची, स्थानिकांची तसेच प्रवासी वाहने सायंकाळच्या वेळेला एकत्रित आल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.

पाटोवरील जुन्या पुलावरून पणजी शहरात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी नव्या पुलावरील एका मार्गाचा वापर केला जात होता. शिवाय सांताक्रूझकडून पणजी शहरात जाणारी वाहतूक त्याच मार्गाने सुरू होती. परंतु जुन्या पाटो पुलाकडून पुढे जाणारी वाहतूक हस्तकला महामंडळाजवळील पुलावरून वळविली गेल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडले नाहीत.

सायंकाळी इतर ठिकाणांहून पणजीत येणाऱ्या नागरिकांना वाहने घेऊन येण्यास किमान २५ ते ३० मिनिटे लागल्याच्या तक्रारी आल्या. १४ तारखेपर्यंत नव्या पुलाच्या दुरुस्तीचे काम चालणार असल्याने दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

पोस्ट ऑफिस परिसरातून वाहतूक वळविण्यात येणार असल्याने या भागात रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली वाहने अन्यत्र हलविण्याची आवश्‍यकता होती. ती वाहने तशीच राहिल्याने वाहतूक अतिशय कूर्म गतीने सुरू होती.

विकेंडमुळे राजधानीत पर्यटकांचे लोंढे

१४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने शुक्रवारी रजा टाकून सोमवारपर्यंत चार दिवस गोव्यात सुटीचा आनंद घेण्यासाठी अन्य राज्यांतून अनेक पर्यटक स्वतःची तसेच भाडोत्री वाहने घेऊन गोव्यात आले आहेत. आज या पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक कोंडीत भर पडलेली दिसून आली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यातील नोंदणीकृत वाहनांचा मोठा भरणा होता.

शहराबाहेर पडण्यासाठी एकच मार्ग

पाटो पुलाचे काम सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक वळविल्याने पणजी शहराबाहेर पडण्यासाठी सायंकाळी एकच मार्ग वापरात होता. त्यामुळे डॉ. आंबेडकर उद्यानापासून जुन्या पुलावरून जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकच मार्ग असल्याने वाहतूक कोंडी झाली.

मळ्यातील नागरिकांना मनस्ताप

मळ्यातील नागरिकांना शुक्रवारी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. टपाल खात्याच्या मागील बाजूच्या वस्तीतील लोकांनाही बराच मन:स्ताप सहन करावा लागला. जुन्या पाटो पुलावरून शहरात वाहतूक वळविल्याने या परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळाली नाही.

स्मार्ट सिटीचे काम ‘रामभरोसे’

१. पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. आतापर्यंत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याची हमी न्यायालयाला देऊनही अद्याप ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.

२.पुन्हा एकदा आयपीएससीडीएलने ३१ मे पर्यंत कामे पूर्ण करण्याची हमी दिल्याने खोदकामे आणि इतर कामे सुरू आहेत, ती अभियंत्यांच्या देखरेखीखाली होत नसल्याचे दिसून येत आहे.

३. जी कामे होत आहेत, त्याविषयी आयपीएससीडीएलने सुस्पष्टता दिली जात नसल्याने पणजीवासीयांना शहरात दररोज वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT