पणजी, राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामांमुळे मे महिन्यात ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आलेले पे-पार्किंग १ जूनपासून सुरू केले आहे. परंतु पे-पार्किंग कंत्राटदराने शहरातील पार्किंगच्या ठिकाणावरील शुल्काचे फलक (साईनबोर्ड) बदलले नाहीत.
खराब झालेल्या फलकांवर दरही दिसत नसल्याने सध्या वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. एका वाहनधारकाचा आणि पार्किंग शुल्क आकारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर गुरुवारी सकाळी गार्सिया गार्डनजवळ वाद झाला. पार्किंग फलक आहे, पण त्याच्या खाली दर लिहिलेला भाग खराब होऊन निघून घेला आहे.
त्यामुळे वाहनधारकांना पार्किंगचे दर माहीत होत नाहीत, शिवाय त्या ठिकाणी पे-पार्किंग आहे की नाही, हेही स्पष्ट होत नाही. त्यातूनच वाहनधारकांचे आणि पार्किंग शुल्क आकारणाऱ्या कर्मचाऱ्याशी वाद झाला.
३१ मे रोजी पे-पार्किंग बंदीची तारीख संपल्यानंतर १ जून रोजी महापौरांनी पार्किंग शुल्क आकारणी सुरू झाल्याचे जाहीर केले. परंतु सहा दिवस झाले तरी खराब झालेले फलक बदले नाहीत.
गुरुवारी सकाळी जो प्रकार घडला, त्यानंतर मात्र महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त ग्लेन मदेरा यांनी पे-पार्किंग सायंकाळी कंत्राटदारास बोलावून घेऊन नव्याने फलक लावण्याच्या सूचना केल्या. पार्किंगच्या दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन महिन्यांत इमारतीच्या कामास प्रारंभ
गेल्यावर्षी नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते महानगरपालिकेने केला होता. परंतु त्यानंतर ते काम काही पुढे सरकलेच नाही. आता काही महिन्यांतच त्या घटनेला वर्षाचा कालावधी होईल.
नूतन इमारतीविषयी महापौर मोन्सेरात यांनी आता दोन महिन्यांनी इमारतीच्या कामास सुरुवात होणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा महानगरपालिकेतीलच कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.