पणजी: स्मार्ट सिटी म्हटल्यावर लोकांना सर्व स्मार्ट गोष्टी नजरेत येणे अपेक्षित असले तरी राजधानीत प्रवेश केल्यावर आपण खराच स्मार्ट सिटीत प्रवेश केला का असा प्रश्न अनेकांना पडतो. स्मार्ट सिटीत बसशेड उभारण्यात आली आहेत, लोक त्यांना स्मार्ट बसशेड असेही संबोधतात. परंतु या स्मार्ट बसशेडमध्ये बसण्यासाठी आणि पाऊस आल्यावर आसऱ्यासाठी या स्मार्ट बससेडमध्ये सोय नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीतील बसशेड म्हणजे फक्त ‘स्मार्ट देखावा’ असल्याचे लोक बोलू लागले आहेत.
राज्य सरकारने यापूर्वी बांधलेल्या बसशेडचे कौतुक आजही होते, परंतु कोट्यांनी पैसे खर्च करून स्मार्ट सिटीने उभारलेल्या बसशेडच्या कौतुकापेक्षा नाक मुरडणारेच लोक जास्त दिसतात. रायबंदर ते मिरामारपर्यंत स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. स्मार्ट म्हटल्यावर सर्व काही स्मार्ट असेल असा समज लोकांमध्ये आहे. हा समज सरकारने पूर्णपणे धुळीत मिळवला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने सरकार पैसे करत असल्याचा आरोप करणारे विरोधक योग्यच असल्याच्या विचारांकडे आज लोक वळू लागले आहेत.
प्रवाशांना बसची वाट पाहताना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांना उभे राहावे लागू नये म्हणून बसशेड बांधल्या जातात. मात्र स्मार्ट सिटीने उभारलेल्या बसशेडमध्ये बसणे शक्य नाही. स्मार्ट सिटीच्या बसशेड नजरेत आल्यावर त्याची रचना बघून लोक या बससेड पुन्हा बांधण्याची मागणी करीत होते. मात्र या मागणीला सरकारने महत्त्व दिले नाही.
स्मार्ट सिटीच्या बसशेड आणि इतर शहरातील व गावातील बसशेडची तुलना आज गोमंतकीय करू लागले आहे. राज्यात अजूनही बसमधून प्रवास करणारे शेकडो लोक आहेत. त्यांच्यासाठी एक उत्तम सुविधा तयार करून देणे सरकारचे कर्तव्य आहे, मात्र सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे, असे लोक बोलू लागले आहेत. स्मार्ट सिटीत स्मार्ट सिटी हे नाव सोडले तर काहीच स्मार्ट नाही, हा लोकांचा समज आता पक्का होत चालला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.