Pandurang Madkaikar, Babush Monserrate, Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मडकईकरांच्या आरोपांवरून उत्पल यांचे बाबूशकडे बोट, मोन्‍सेरात यांचा पलटवार; नेत्यांसह मंत्र्यांचा सावध पवित्रा

Pandurang Madkaikar Allegations: एका मंत्र्याने १५ ते २० लाख रुपये घेतले’ असा सनसनाटी आरोप भाजपचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केल्‍यामुळे राज्‍यभर खळबळ माजली आहे.

Sameer Panditrao

Pandurang Madkaikar Allegations Effect Goa Politics

पणजी: ‘एका लहान कामासाठी आपल्याकडून एका मंत्र्याने १५ ते २० लाख रुपये घेतले’ असा सनसनाटी आरोप भाजपचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केल्‍यामुळे राज्‍यभर खळबळ माजली आहे. या आरोपाने सत्ताधाऱ्यांना बचावात्मक पवित्र्यात ढकलले आहे. तर, माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी या प्रकरणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला आहे.

या प्रकरणामुळे एरवी अनेक राष्ट्रीय विषयांवर बोलणारे भाजपचे प्रवक्ते ‘थंडगार’ पडले आहेत. मडकईकर यांना पैसे दिलेच नाहीत किंवा तेवढे पैसे घेतलेच नाहीत, असे कोणीही म्हटलेले नाही. काल या प्रकरणावर पहिल्यांदा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी तोंड उघडले व ‘काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये’ असे वक्तव्य करत मडकईकर यांना एक प्रकारे इशाराच दिला.

मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने पर्वरीतील मंत्रालयात आलेल्या अनेक मंत्र्यांना याबाबत विचारले असता कोणीही ‘या प्रकरणी चौकशी करून सत्य शोधून काढा’ असे म्हणण्याचे धाडस दाखवले नाही.

अगदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘काल आपण या विषयावर बोललो आहे’ असे सांगत हा विषय गुंडाळला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही या विषयावर भाष्य करणे टाळले आहे. सर्वांनी सावध पवित्रा घेतला आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना पणजीत मंगळवारी रात्री भेटून परतताना हा गौप्यस्फोट पांडुरंग मडकईकर यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आजवर सत्ताधारी भाजप आणि सरकारकडून मडकईकर यांच्या आरोपाचे खंडन करण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘आरोप कोणीही करू शकतो. पुरावे नसल्यास त्याला अर्थ राहत नाही.

बाबूश म्‍हणतात, नाव घ्‍या!

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पांडुरंग मडकईकर यांना ‘त्‍या’ मंत्र्याचे नाव घेण्याचे आवाहन केले आहे. मडकईकर हे माझे नजीकचे मित्र आहेत. आमचे संबंध पूर्वीपासून आहेत. ते माझे सहकारी होते. आता त्यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारत असाल तर एक तर त्यांनी नाव घेऊन आरोप करायला हवा होता. त्याही पुढे मंत्र्याने पैसे मागितले होते का, हेही स्पष्ट करायला पाहिजे होते, असे बाबूश म्‍हणाले.

सुदिन, गोविंद म्‍हणतात...

१. वीजमंत्री असलेले मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तर फारच सावध भूमिका घेतली आहे. मी आधी मडकईकर यांना भेटतो आणि त्यानंतरच या विषयावर बोलतो, असे त्यांनी म्हटले आहे. मडकईकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटलेले नाही.

२. मंत्री गोविंद गावडे यांनी न विचारताच ‘आपला कारभार पारदर्शी आहे’ असे हा विषय काढल्यावर सांगून टाकले. पांडुरंग मडकईकर यांना वडीलबंधू या नात्याने आपण पाहतो. त्यामुळे त्यांच्या विधानावर आपण प्रतिक्रिया देऊ इच्‍छित नाही, अशी बचावात्मक भूमिका त्‍यांनी घेतली आहे.

उत्पल पर्रीकर यांचे बाबूशकडे बोट

भाजपचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांमुळे ‘तो मंत्री कोण?’ अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणावर गोमन्तक टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत उत्पल पर्रीकर यांनी थेट महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे बोट दाखविले आहे. तर, बाबूश यांनी ‘आपणाकडे रिकामटेकड्यांना उत्तरे देण्यास वेळ नाही. कोणीही उठेल आणि काहीही बोलेल, त्यावर स्पष्टीकरण देत बसायचे काय? आम्हाला कामे आहेत’ असे सांगत उत्पल यांना प्रतिटोला लगावला आहे.

मडकईकरांनी केलेला आरोप ही काही आश्चर्यकारक बाब नाही. आपण यापूर्वी ‘डबल इंजीन’ सरकारला हा ‘ब्रेक’ असल्याचे आपण म्हटले होते. दिवसेंदिवस जी माहिती कानावर पडते आहे, त्‍यावरून तो मंत्री कोण ते समजते. निवडणुकीला उभे राहायचे, पैसे उभे करायचे आणि त्यातील एक छोटा हिस्सा पुन्हा निवडणुकीत गुंतवायचे हेच त्यांचे निवडणूक मॉडेल आहे. मडकईकरांनी पुरावे द्यावेत आणि त्यानुसार सरकारने तक्रार दाखल करावी, असेही उत्‍पल यांनी नमूद केले.

हे सर्व प्रकरण पाहिल्यास त्‍यामागे पणजीचा आमदार असल्याचे दिसते. तरीसुद्धा तो मंत्री कोण, हे सर्वांना कळले पाहिजे. यापूर्वी सर्वत्र बाबूश यांच्या स्वीय साहाय्‍यकाचे नाव ऐकू येत होते. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्‍यानंतर त्‍यास बाबूश यांनी बाजूला केल्याचे समजते.
-उत्‍पल पर्रीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT