पणजी: स्वच्छता मार्गदर्शक कार्यक्रम शहरी कचरा व्यवस्थापनात साधी नवकल्पना आणि समुदायाच्या नेतृत्वाखालील उपाययोजनांच्या रूपांतरणकारी शक्तीचे प्रतीक आहे. इमॅजीन स्मार्ट सिटीमध्ये, आम्ही पणजीच्या टिकाऊ कचरा व्यवस्थापन पद्धती प्रदर्शित करून देशभरातील बदल घडवून आणणाऱ्यांना प्रेरणा देऊ इच्छितो, असे उद्गार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी काढले.
पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड स्वच्छता मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम साळगाव येथील गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परिषद सभागृहात आयोजित केला होता. त्याच्या समारोप सत्रात ते बोलत होते. त्यांनी यावेळी पणजीच्या कचरा व्यवस्थापन योजनेची माहिती सादर केली.
गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, जीआयझेड ही विदेशी संस्था आणि अखिल भारतीय स्थानिक स्वशासन संस्था यांच्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोर्ट ब्लेअर, केरळ, स्वच्छ गंगा मिशन आणि गोव्यातील विविध शहरी स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
कार्यक्रमात सहभागींना साळगाव कचरा प्रक्रीया प्रकल्प, पणजी महापालिका बाजार खत निर्मिती प्रकल्प, हिरा कचरा सुविधा आदी ठिकाणी भेट देता आली. या भेटीवेळी कचरा वेगळीकरण, खत तयार करणे आणि बायोगॅस उत्पादन याबाबत प्रत्यक्ष माहिती त्यांना मिळाली.
रॉड्रिग्ज म्हणाले की, स्वच्छता मार्गदर्शक कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन २.० चा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश मार्गदर्शकांना त्यांच्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि साधने प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम विशेषत: दुर्बल किनारपट्टी प्रदेशांमध्ये शहरी कचरा व्यवस्थापनाच्या अद्वितीय आव्हानांना संबोधित करतो. भारताच्या कचरामुक्त शहरे तयार करण्याच्या ध्येयाशी तो जुळणारा आहे.
जीआयझेडचे प्रकल्प संचालक सेबॅस्टियन मार्कर्ट म्हणाले, स्वच्छता मार्गदर्शक कार्यक्रम सहकार्य आणि ज्ञान-सामाईकीच्या शक्तीचे प्रतीक आहे. विविध हितधारकांना एकत्र आणून, या उपक्रमाने सहभागींना त्यांच्या समुदायांमध्ये सार्थकीकरण घडवून आणण्यास व टिकाऊ कचरा व्यवस्थापन पद्धती मजबूत करण्यास आवश्यक साधने प्रदान केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.