Social Welfare Department Office in Panaji Needs Modernization
पणजी: समाजकल्याण खात्याचे कार्यालय पणजीत पोर्तुगीजकालीन इमारतीत आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयाची इमारत बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून जर्जर झालेली आहे. येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कामावर बसावे लागत आहे. खात्याचे कार्यालय स्थलांतरासाठी मंत्री सुभाष फळदेसाई आग्रही आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना कुठे ‘खो‘ बसला आहे, हे काही समजत नाही.
पर्वरी येथील गृहनिर्माण महामंडळाच्या इमारतीत हे कार्यालय स्थलांतर होणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले होते. या खात्याचा संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अजित पंचवाडकर यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सुमारे दोन ट्रक कागदपत्रे तेथून हटवली होती. त्यामुळे या मजल्यावरील कागदपत्राचा काही टनाचा बोजा कमी झाला. याशिवाय इमारतीची तात्पुरती त्यांनी डागडुजीही करून घेतली. पंचवाडकर यांनी व मंत्री फळदेसाई यांनी कार्यालय स्थलांतरासाठी गती दिली आणि पर्वरी येथील गृहनिर्माण महामंडळाच्या इमारतीत जागाही निश्चित झाली. परंतु त्यानंतर या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी कार्यालयाचे स्थलांतर होईल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती, परंतू ते झाले नाही.
पोर्तुगीजकालीन इमारतीत समाजकल्याण खात्याचा कारभार अनेक वर्षांपासून सुरू आहे. या कार्यालयाने अनेक संचालक पाहिले, त्याशिवाय याच कार्यालयातून समाजहिताच्या कल्याणकारी योजनाही लोकांसाठी सुरू झाल्या.
अलीकडे जुंता हाऊसमधील एक-एक कार्यालयाचे स्थलांतर होत आहे. समाजकल्याण खात्याप्रमाणे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या कार्यालयाची स्थिती होती. आता उत्तर गोवा जिल्हा पंचायतीला नूतनीकरण केलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. स्वायत्त संस्था असलेल्या या कार्यालयाचे स्थलांतर झाले, पण एका संचालनालयाचे स्थलांतर होण्यासाठी विलंब का लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.