स्मार्ट सिटीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे स्मार्ट सिटीचे अधिकारी सांगतात. पण त्यांनी आजवर दिलेली बरीच आश्वासने पूर्ण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे लोक बोलू लागलेत. ‘स्मार्ट सिटी’ची सुरू असलेली कामे पूर्ण होणार कि, अजून सुरू झाली नाहीत, ती सुरू करून सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार, हेच लोकांना माहीत नाही. त्यामुळे सर्व लोक आणि पणजीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने येणारे लोक संभ्रमात पडले आहेत. आता त्यांचा संभ्रम ‘स्मार्ट सिटी’शी संबंधित अधिकारी दूर करणार का, अन् कधी,अशी विचारणा होतेय. ∙∙∙
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी १ एप्रिलपासून आपण मडगाव मतदारसंघात दारोदार फिरून लोकांची विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी काम सुरूही केले. पण ते मोती डोंगरावरील आयुष इस्पितळापासून. एकूण ४.४९ कोटींच्या या कामाचा त्यांनी शुभारंभही केला. मात्र, ही जागा मडगाव मतदारसंघात समाविष्ट नाही तर ती पडते फातोर्डा मतदारसंघात. त्यामुळे कामाचा शुभारंभ त्यांनी एकंदर फातोर्डा मतदारसंघातून केला, असेच म्हणावे लागेल. दिगंबर कामत आता फातोर्डा मतदारसंघावरही लक्ष केंद्रित करत आहेत असे म्हणायचे का? ∙∙∙
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गेल्या काही दिवसात आरोग्य खात्याच्या आझिलो, हॉस्पिसिओ, गोवा मेडिकल कॉलेजला आकस्मिक भेटी देऊन तेथील कामचुकार डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांना चपराक देऊन यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, अशी त्यांना तंबी दिली. मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्याचा काही परिणाम झाला आहे, असे दिसत नाही. कासारवर्णे-पेडणे आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या ग्रामीण उप आरोग्य केंद्रात ‘सीएचओ’ म्हणून काम करणाऱ्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रात उपस्थिती हा आता सर्व लोकांत चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णांनी ग्रामीण उपआरोग्य केंद्रात येण्याऐवजी धारगळ येथे आयुष हॉस्पिटलात जावे, असे तर या ‘सीएचओं’ना वाटत नसावे ना? की असे वैद्यकीय अधिकारी ‘वर्क फ्रॉम होम’ करून घरबसल्या फुकट पगार घ्यायचा, ही मोहीम राबवताहेत ? आरोग्य खात्याला याबाबत जास्त माहिती कासारवर्णे आरोग्य खात्याचे आरोग्य अधिकारी दामू नार्वेकरच देऊ शकतील. कारण दामू डॉक्टरांच्या आशीर्वादाशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ कसे होऊ शकते, असा प्रश्न रुग्णांना पडला आहे. ∙∙∙
पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा दिलेली मुदत चुकली आहे. ३१ मार्चपर्यंत रस्त्यांचे काम केले जाईल असे सांगण्यात आले होते, परंतु तसे करता आले नसल्याने नवीन मुदत दिली गेली. हा नित्यक्रम गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असून पणजीत कुठला रस्ता खोदला जाणार हे सांगता येणार नाही. पणजीवासी आणि शहरात येणाऱ्यांचे अक्षरशः हाल झालेत. अनेकांना मान, पाठ, अंगदुखी, श्वसन समस्या झाल्याने उपचार व औषधांवर पैसा वाया जात आहे. त्यात कामाची मुदत पुढे गेल्याने मानसून पूर्वी काम होणार याची शंका निर्माण झाली. हे काम पुढच्या वर्षीसुद्धा रेटले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चर्चा होतेय. ∙∙∙
दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस आक्रमक बोलणारे. कोणतेही व्यासपीठ असो, अगदी पत्रकार परिषद असली तरी ते आपल्या जोशपूर्ण आवेशात बोलतात. लोकसभा खासदार म्हणून लोकसभेत ते जेव्हा बोलण्यास उठतात, तो व्हिडिओ असो की, लोकसभेबाहेर व्यक्त केलेले मत असो, ते तत्काळ गोव्यात पोहोचते. त्यांचे व्हिडिओ काही यूट्यूबवर न्यूजचॅनल चालविणाऱ्यांच्या हातात अलगद पडतात, त्यामुळे त्यांना आयतेच खाद्य मिळते. अशा वेगवेगळ्या मार्गाने का होईना, विरियातो चर्चेत राहतात. भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हेही कधी-कधी समाजमाध्यमांचा वापर करून घेतात. गोव्याशी निगडित असलेले प्रश्न राज्यसभेत मांडल्यावर किंवा कोणी मंत्र्यांनी प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तराची माहिती ते गोव्यात काही यूट्यूब न्यूजचॅनलवाल्यांकडे पोहचवितात. मात्र, या दोघांच्या अगदी विरुद्ध बाजू खासदार श्रीपाद नाईक यांची आहे. त्यांचे बातमीचे व्हिडिओ एकतर गोव्यात आल्यावर पहायला मिळतात. राज्यातील तीन खासदारांपैकी अधिकतर समाजमाध्यमांत झळकणारे ते विरियातोच असतात. त्यामुळे कोणत्या माध्यमांचा कसा वापर करायचा हे विरियातोंना अगदीच उत्तमरित्या जमले आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. ∙∙∙
पक्षाच्या ध्येय धोरण आणि निर्णयांचा सर्वांचा आदर करावाच लागेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे. पक्षाने एखादी भूमिका घेतली तर त्याविरोधात कोणीच अगदी मंत्र्यानेही बोलू नये, अशी तंबी त्यांनी दिली आहे. मंत्र्यांच्या कामगिरीचे पक्षाकडून मूल्यमापन होत असून त्याआधारेच पुढील कारवाई होईल असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास दोन महिने झाले असतानाच दामू यांनी आपली पकड किती आहे, हे दाखवून देणे सुरू केले आहे. ∙∙∙
प्रियोळातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेत्यांची भाषणे अनेकांना स्फूर्ती देणारी ठरलीत. त्याशिवाय अनेकांची छाती फुगलीही असू शकते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणे गरजेचे होते, तो जोश निर्माण झालाही असावा. परंतु मगोपच्या नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि गोव्यातील भाजपबरोबरची युती कायम असल्याचे व पुढेही ती युती गरजेची असल्याचे दाखवून दिले. प्रियोळच्या जागेवर अजूनही मगोपने दावा केलेला नाही, परंतु तोपर्यंत ‘कोल्हा आला रे आला’ असे म्हणून उगाच आवई उठवणे आवश्यक होते काय, असा प्रश्न पडतो. चाळीसही मतदारसंघांत प्रत्येक राजकीय पक्षाला आपले हातपाय पसरवण्याचा हक्क आहे. स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर हा पक्षविस्तार गरजेला पडतो. प्रियोळात भाजपचे काही मूळ कार्यकर्ते मेळाव्यापासून अंतर राहून होते. सभापती रमेश तवडकरांच्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले होते, त्यांनी ज्यांना कोणाला इशारा द्यायचा तो त्यांनी दिला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.