पणजी: वाहतूक नियमांच्या उल्लंघनानंतर वाहतूक खात्याकडून ठोठावण्यात येणारा दंड ऑनलाईन पद्धतीने सात दिवसांत न भरल्यास तो ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन भरावा लागतो, हा नियम अनेकांना माहीत नसल्यामुळे सोमवारी दंड भरण्यासाठी वाहतूक खात्याच्या पणजी कार्यालयात मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राजधानी पणजीसह विविध भागांतील मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होताच वाहतूक पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तत्काळ ऑनलाईन पद्धतीने वाहन मालकांस चलन पाठवतात. परंतु, नियमानुसार वाहतूक पोलिसांनी चलनाच्या माध्यमातून जारी केलेला दंड सात दिवसांतच ऑनलाईन पद्धतीने भरता येतो.
तसे न केल्यास संबंधितांना वाहतूक खात्याच्या कार्यालयात जाऊन हा दंड भरावा लागतो. याच नियमाची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे सोमवारी वाहतूक खात्याच्या कार्यालयात दंड भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठी गर्दी केल्याची माहिती खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार ‘डिजिटल इंडिया, डिजिटल गोवा’च्या घोषणा देत आहे. पण, राज्यात मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड वाहतूक खात्याच्या कार्यालयात येऊन भरावा लागतो, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे मत टॅक्सी व्यावसायिक बाप्पा कोरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. वाहतूक खात्याने सर्वप्रथम विविध भागांतील सिग्नल योग्य पद्धतीने कार्यान्वित करावे, तेथे टायमर बसवावेत आणि त्यानंतरच वाहन चालकांकडून दंड वसूल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.