पणजी, अभिजात भारतीय संगीताचा मोठा वारसा, अभिमानास्पद परंपरा आपल्याला लाभली आहे. व्यासंग व थक्क करणाऱ्या साधनेने हे संगीत ज्या गोमंतकीय कलाकारांनी बहरत ठेवले, त्यात पंडित योगराज नाईक हे एक होते, असे गौरवोद्गार संगीत समीक्षक जनार्दन वेर्लेकर यांनी काढले.
नामवंत सतारवादक पंडित योगराज नाईक प्रतिष्ठानने कला व संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने पाटो-पणजी येथील संस्कृती भवन सभागृहात मंगळवारी योगराज यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या स्वरयोगी महोत्सवात वेर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर, उपाध्यक्ष प्रशांती तळपणकर उपस्थित होत्या.
सगुण वेळीप यांनी या उपक्रमाला कला व संस्कृती संचालनालयाचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. प्रचला आमोणकर म्हणाल्या, माझा भाऊ योगराज याचे सतार वाद्यावर निस्सीम प्रेम होते. गोव्यात सतारवादक निर्माण व्हावेत म्हणून त्याची धडपड होती. यावेळी योगराज यांच्या मातोश्री श्यामलता, भगिनी प्रचला, पूनम, पत्नी उषा, कन्या डॉ. गौतमी, पुत्र कार्तिक यांनी योगराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. डॉ. साईश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
सोनार यांच्या बासरीवादनाने रसिक भारावले
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने संगीत रसिक भारावले. त्यांनी भूपाली राग विस्ताराने वाजवून मैफलीला प्रारंभ केला. त्यांची अलापीतील आर्तता थेट रसिकांच्या काळजाला भिडली.
किरवाणी रागही त्यांनी ऐकविला. त्यांना किशोर पांडे यांनी तबल्यावर साथ दिली. त्यापूर्वी साशारिसा हिचे सतारवादन झाले. तिला कौस्तुभ च्यारी यांनी तबला साथ दिली.
साशारिशा हिला शिष्यवृत्ती प्रदान
योगराज नाईक प्रतिष्ठानतर्फे सतारवादन शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची यंदा साशारिशा हरमलकर ही मानकरी ठरली.
हरी शर्मा यांनी ती पुरस्कृत केली होती. जनार्दन वेर्लेकर यांच्या हस्ते तिला ती प्रदान करण्यात आली. रोख दहा हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह असे तिचे स्वरूप आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.