Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, पणजीतील झोपडपट्टीबाबत परब गप्प का?

Khari Kujbuj Political Satire: नाकेरी-बेतुल येथे बंदुकीच्‍या मॅगझीन्‍स तयार करणाऱ्या कारखान्‍यात जो स्‍फोट झाला त्‍यातून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sameer Panditrao

पणजीतील झोपडपट्टीबाबत परब गप्प का?

पणजीत बेकायदेशीर घरे आहेत आणि या झोपडपट्टीत हक्काचा मतदार आहे. त्या झोपडपट्टीवर परप्रांतीयांविरोधात पोटतिडकीने बोलणारे आरजीचे प्रमुख मनोज परब का गप्प आहेत, याचे उत्तर आरजीवाले तरी देणार आहेत का? असा प्रश्न विचारला तर कोणास वावगे वाटू नये. आरजीची भूमिका काय आहे, हे वारंवार आमदार वीरेश बोरकर आणि पक्षप्रमुख मनोज परब सांगतात. परब बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषदा घेऊन सक्रिय असल्याचे दाखवू लागले आहेत. मध्यंतरी काही काळ ते भूमिगत झाल्याचेच वाटत होते, असो. परब यांची ती वैयक्तिक बाब, परंतु जर त्यांनी राज्यातील झोपडपट्टींचा विषय हाती घेतला असेल, तर सर्वच तालुक्यांतील झोपडपट्टींवर त्यांनी बोलले पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे. तिसवाडीतील विशेषतः पणजीतील झोपडपट्टींवर किंवा बेकायदेशीर घरांवर त्यांनी बोलायला हवे, असे आता पणजीतील आरजीप्रेमीच म्हणत आहेत. काही झोपडपट्ट्यांवर बोलणे किंवा आवाज उठवणे आणि दुसऱ्या ठिकाणच्या झोपडपट्टीविषयी गप्प बसणे, हा दुटप्पीपणा सहजपणे नागरिकांच्या लक्षात येतो याची परब यांना निश्चितच कल्पना असेल. ∙∙∙

नाकेरीच्‍या स्फोटावर पांघरूण?

नाकेरी-बेतुल येथे बंदुकीच्‍या मॅगझीन्‍स तयार करणाऱ्या कारखान्‍यात जो स्‍फोट झाला त्‍यातून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्‍या कंपनीचे हे गोदाम आहे ती कंपनी आपले गोदाम मानवी वस्‍तीपासून बरेच दूर आहे असे सांगत असली तरी याही भागात स्‍थानिकांची ये-जा चालू असते असे दिसून आले आहे. त्‍यामुळे हा स्‍फोट कंपनीच्‍या हलगर्जीपणामुळे झाला की आणखी कशामुळे याची चौकशी करणे नितांत गरजेचे आहे. मात्र, याबाबतीत जी गुप्‍तता पाळली जात आहे ते पाहिल्‍यास या स्‍फोटावर पांघरूण तर घातले जाणार नाही ना? अशी शंका व्‍यक्‍त केली जाते. हे गोदाम स्‍थानिक आमदार एल्‍टन डिकॉस्टा यांच्‍यासाठी एक डोकेदुखी ठरू शकते. त्‍यामुळे एल्‍टन यासंदर्भात काय भूमिका घेतात हेही आता पहावे लागणार आहे. ∙∙∙

काब्राल सर, हम तुम्‍हारे साथ है।

कुडचडेच्‍या युवा स्‍वराज्‍य स्‍पोर्टस्‌ आणि कल्‍चरल क्‍लबतर्फे नुकताच कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचा जंगी सत्‍कार करण्‍यात आला. या सत्‍काराला प्रमुख पाहुणे म्‍हणून नावेलीचे आमदार उल्‍हास तुयेकर यांना बोलावण्‍यात आले होते. यावेळी काब्राल यांचा मानाची पगडी आणि शाल देऊन सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यापूर्वी सुवासिनींकडून त्‍यांना आरतीही ओवाळण्‍यात आली. यावेळी त्‍यांच्‍या समर्थकांनी ‘काब्राल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा सूचक घोषणाही दिल्‍या. कुडचडेतील काहीजण काब्राल यांचा मतदारसंघातील प्रभाव कमी झाला असे म्‍हणत असताना शुक्रवारी झालेला काब्राल यांचा दणदणीत असा हा सत्‍कार बरेच काही सांगून गेला असेच म्‍हणावे लागेल. ∙∙∙

स्मित हास्यामागचे रहस्य काय?

या दिवसात मंत्रिमंडळ बदलासंदर्भात चर्चा सर्वत्र चालू आहे. कदाचित अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनानंतर अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोनच दिवसांनी अधिवेशन सुरू होत आहे. विद्यमान सभापती रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे आपले कदाचित सभापती म्हणून शेवटचे अधिवेशन आहे का? असा प्रश्न सभापतींना विचारला तर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. या स्मित हास्यामागचे रहस्य नेमके काय याचा शोध तेथील उपस्थित घेताना दिसत होते. मात्र, ते नक्कीच मंत्री होतील अशी भावना त्यांच्या सभोवताली असलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होती. ∙∙∙

कारवाईचा फार्स?

म्हापसा पालिकेतून लोकांच्या कामासंदर्भातील फाईल्स गहाळ होण्याच्या तक्रारी वाढू लागल्याने उपसभापतींनी याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात स्वतःहून तक्रार दिली आहे. मुळात जे काम मुख्याधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते, ते काम उपसभापतींनी केले. आता पोलिस किंवा तपास यंत्रणा यावर कोणती कारवाई करतात, हे पाहावे लागेल. कारण तक्रार दाखल होताच त्या प्रकरणाचा तार्किक शेवट होणे गरजेचे असते. त्यामुळे पालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर बेशिस्तपणाची कारवाई होणार का? की हा फक्त फार्स बनून राहतो, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल. ∙∙∙

शिमगोत्सवाचे कवित्व

शिमगोत्सवाचे कवित्व काही थांबता थांबत नाही. मुळात उशीर का झाला, यावरच हे चर्वितचर्वण सुरू आहे. तसे पाहिले तर आयोजक आपल्यापरीने काम करीत असतात, पण स्पर्धकांची मनमानीही या उशिराला कारणीभूत ठरली आहे. राज्यातील विविध शहरांत सध्या राज्य पातळीवरील शिमगोत्सव सुरू आहे. पूर्वी शिमगोत्सवात सहभागी पथके वेळेवर यायची, पण आता आपले काम करून सुशेगादपणे हे स्पर्धक स्पर्धास्थळी येतात. त्यामुळे मग पुढे वेळ वाढतच जातो. विशेषतः चित्ररथ पाहण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांना रात्री उशीर होत असल्याने हा शिमगोत्सव सोडून घर गाठावे लागते. त्यामुळे मुले हिरमुसली होतात. म्हणून पुढील वर्षापासून राज्यस्तरीय शिमगोत्सवात वेळेचे काटेकोरपणे बंधन घातले आणि वेळेत जे कुणी स्पर्धक येत नाहीत त्यांना जर स्पर्धेतून बाद केले, तर स्पर्धा निश्‍चितच लांबणार नाही आणि दर्शकांना शिमगोत्सवाचा आनंद लुटता येईल. दर्शकच बोलताहेत हे..!∙∙∙

लोबोंचे भजन

मस्तकाला टिळा लावून मायकल लोबो रस्त्याशेजारी चिकन खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काही जणांनी संताप व्यक्त केला होता. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीराम जपावर लोबो टाळ वाजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. काही का असेना चर्चेत राहण्याचे टायमिंग लोबो साधत असतात. कधी ते म्हापशाच्या आमदारांवर तोंडसुख घेतात, तर कधी पर्यटन खात्यावर घसरतात. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT