गोव्याची ओळख केवळ नाईट लाइफ आणि पर्यटनापुरती मर्यादित नाही, तर येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. आता याच गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध पाळोळे बीचला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्याचा मान मिळाला असून, जगातील टॉप 25 बीचच्या यादीत सहावे स्थान मिळाले आहे. Beach.com च्या ग्लोबल बीच इंडेक्स 2026 मध्ये पाळोळेचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जागतिक टॉप 25 यादीत स्थान मिळवणारा पाळोळेम हा आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे.
Beach.com च्या ग्लोबल बीच इंडेक्स 2026 मध्ये जगभरातील समुद्रकिनाऱ्यांचे विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. या क्रमवारीत पाळोळे बीचने सहावे स्थान पटकावले. आशियातील इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्याला या टॉप 25 यादीत स्थान मिळालेले नाही. त्यामुळे पाळोळे बीचसह गोव्याच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.
ग्लोबल बीच इंडेक्स 2026 तयार करताना केवळ पर्यटकांची लोकप्रियता विचारात घेण्यात आलेली नाही. तज्ज्ञांनी केलेल्या नामांकनांसह पर्यटकांची मते आणि नासाकडून उपलब्ध झालेल्या समुद्राच्या पाण्याचा रंग व स्वच्छतेसंबंधीच्या माहितीचाही अभ्यास करण्यात आला. एकूण 18 निकषांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये समुद्रकिनाऱ्याची गुणवत्ता, पाण्याची स्वच्छता, पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा, पोहोचण्याची सोय, हवामान आणि पर्यटकांचा एकूण अनुभव अशा बाबींचा समावेश होता. या निकषांमध्ये पाळोळे चांगली कामगिरी केल्याने त्याला जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले.
दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात असलेला पाळोळे बीच आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रकोरीच्या आकाराची समुद्रकिनाऱ्याची रचना, पांढरी शुभ्र वाळू, नारळाची झाडे आणि तुलनेने शांत समुद्राचे पाणी यामुळे हा परिसर पर्यटकांना विशेष आवडतो. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी पालोलेम एक लोकप्रिय ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य आणि परिसरातील पर्यटन सुविधा यामुळे देशी-विदेशी पर्यटक येथे भेट देतात.
या आंतरराष्ट्रीय गौरवाबाबत गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन ए. खवंटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पालोलेमला मिळालेली ओळख ही गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटकांना मिळणाऱ्या खास अनुभवांची पावती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारचे लक्ष केवळ पर्यटकांची संख्या वाढवण्यावर नसून जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर आहे. पर्यटनामुळे स्थानिक समुदाय, पर्यावरण आणि सांस्कृतिक ओळख यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या मते, या गौरवामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर गोव्याचे स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच दक्षिण गोव्यातील पर्यटनालाही चालना मिळू शकते.
पाळोळे बीचला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गसौंदर्यासोबत विविध साहसी उपक्रमांचाही आनंद घेता येतो. समुद्रात पोहणे, कयाकिंग, डॉल्फिन पाहण्यासाठी बोटीतून सफर करणे आणि जवळील बॅकवॉटर परिसराचा अनुभव घेणे अशा पर्यायांचा पर्यटक आनंद घेऊ शकतात. याशिवाय आसपासची किनारी गावे, स्थानिक खाद्यपदार्थांची ठिकाणे आणि वेलनेस सुविधा यामुळे पर्यटकांची सहल अधिक खास ठरते.
गोवा पर्यटनाला केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील अंतर्गत भागातील पर्यटन, ऐतिहासिक वारसा स्थळे, स्थानिक खाद्यसंस्कृती, वेलनेस, आध्यात्मिक पर्यटन आणि निसर्गभ्रमंती यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. पाळोळे बीचला मिळालेल्या जागतिक मानांकनामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आणखी प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.