ponda 
गोवा

फोंड्यात कोविड इस्‍पितळाला विरोध

Narendra Tari

नरेंद्र तारी

फोंडा :

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता मडगाव पाठोपाठ फोंड्यातही कोविड इस्पितळ करण्याच्या सरकारच्या निर्णयाला फोंडावासीयांनी तीव्र विरोध केला आहे. आज (रविवारी) अचानकपणे फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ कोरोना इस्पितळ जाहीर करताना येथील रुग्णांना बांबोळी इस्पितळात हलवण्यास स्‍थानिकांनी हरकत घेतली. मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी यावेळी इस्पितळात धाव घेऊन या निर्णयाबाबत सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे हा निर्णय तात्पुरता पुढे ढकलला. खुद्द आरोग्य संचालकांनीच त्याबाबत आमदारांना व लोकांना याबाबतची ग्वाही दिली आहे.

आज चर्चा, मात्र रुग्‍णांच्‍या
सुविधेबाबत प्रश्‍‍नचिन्ह
फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ खाली करण्याचा निर्णय एका दिवसापुरता स्थगित झाला असला, तरी उद्या (सोमवारी) याबाबत चर्चा करून फोंड्यातील रुग्णांची सोय कुठे करणार आहात, तातडीचे तसेच अपघाताच्या रुग्णांवर कुठे इलाज होणार आहे, शस्त्रक्रिया कुठे केल्या जातील, आणि फोंडा तालुक्‍यातील लोकांना आरोग्य सुविधा कुठे उपलब्ध होतील, ते आधी सांगा असे सुदिन ढवळीकर यांनी सुनावले आहे.
यावेळी सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत डॉ. केतन भाटीकर, राजेश कवळेकर, रामचंद्र नाईक, अनील नाईक, सुधीर राऊत, भिका केरकर, गिताली तळावलीकर, शिवानंद सावंत, विराज सप्रे तसेच फोंडा पालिकेचे इतर नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात कोरोना रुग्ण वाढल्याने मडगावचे कोविड इस्पितळ अपुरे पडत असल्याने आता फोंड्यातील इस्पितळावर सरकारचा डोळा आहे. त्यानुसार अचानकपणे सरकारी पातळीवर निर्णय घेत फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ हे कोविड इस्पितळ करण्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी तडकाफडकी घेत फोंड्यातील या इस्पितळातील इतर सर्व रुग्णांना बांबोळी इस्पितळात हलवून त्याजागी कोरोना रुग्णांना दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्याचा आदेशही आरोग्य खात्याला देण्यात आला होता. त्यानुसार आरोग्य संचालक डॉ. डिसा यांनी फोंड्यातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांना इस्पितळ खाली करण्यासंबंधीचा आदेश दिला होता.

विरोध नाही, पण...!
फोंड्यात कोविड इस्पितळासाठी विरोध नाही, मात्र फोंड्यातील लोकांना वैद्यकीय सुविधा आधी उपलब्ध करा. त्या कुठे असतील ते सांगा.
- सुदिन ढवळीकर (आमदार, मडकई)

रुग्णांची हमी द्या
फोंडा उपजिल्हा इस्पितळातून तडकाफडकी सुमारे शंभर रुग्णांना बांबोळीत दाखल करण्याच्या प्रकाराबद्दल आधी या रुग्णांच्या आयुष्याची हमी द्या. आधी फोंड्यात लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करा.
- डॉ. केतन भाटीकर (मगो नेता, फोंडा)

स्पष्टपणे सांगा, अन्यथा तीव्र विरोध
आयडी उपजिल्हा इस्पितळ कोरोना इस्पितळ जाहीर केल्‍यानंतर रविवारी संध्याकाळी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डिसा फोंड्यातील या इस्पितळात दाखल झाले. मात्र, त्यापूर्वीच मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी नागरिक व कार्यकर्ते तसेच सरपंच, पंच व नगरसेवकांसमवेत फोंडा आयडी इस्पितळ गाठून या इस्पितळाच्या कोविड इस्पितळात रुपांतरास तीव्र विरोध केला. यावेळी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.
आमदार सुदिन ढवळीकर यांनी डॉ. विकास कुवेलकर यांना यासंबंधीचा जाब विचारला असता, त्यांनी सरकारी आदेशाकडे बोट दाखवले. त्यानंतर आरोग्य संचालक डॉ. डिसा तेथे आल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनी त्यानाही जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही सुदिन ढवळीकर यांनी फोनवरून बातचीत केली. या इस्पितळात रुग्णांसाठी गॅस सेवा आहे, त्यामुळेच हा निर्णय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मात्र कुडचडेतही गॅस सुविधा असलेले इस्पितळ असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. शेवटी इस्पितळ खाली करण्याचा निर्णय तूर्त स्थगित ठेवून उद्या (सोमवारी) यासंबंधी काय ते पाहू, अशी ग्वाही आरोग्य संचालकांनी आमदार व इतरांना दिल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, उद्या (सोमवारी) काय ते स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही तीव्र विरोध करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

फोंड्यात एकच इस्पितळ!
फोंडा तालुक्‍यातील रुग्णांसाठी विविध आजारांवर उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी एकच उपजिल्हा इस्पितळ आहे. त्यातच तातडीचे रुग्ण अथवा अपघातग्रस्त रुग्णासही याच इस्पितळात आणले जाते. आता हे इस्पितळ कोविडसाठी राखीव ठेवल्यास तालुक्‍यातील लोकांचे काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे. फोंडा तालुक्‍यातील तातडीच्या वेळेला रुग्णांना कुठे घेऊन जायचे, कुठे उपचार करायचे ते आधी सांगा, अशी विचारणा नागरिकांनी केली आहे.

सरकारला फोंडाच दिसते काय...!
आतापर्यंत कोरोना रुग्णांसाठी फोंड्यात शिरोडा त्यानंतर फर्मागुढीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाची वसतीगृहे कोविड निगा केंद्रे करण्यात आली. फर्मागुढीतील पर्यटन कुटीरही कोरोनासाठी देण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच दोन कोविड मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावरही फोंड्यातच गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामुळे सरकारला फक्त कोविडसाठी फोंडाच दिसते काय, असा सवाल फोंडावासीयांनी केला आहे. कोविड इस्पितळासाठी विरोध नाही, मात्र, इतर वैद्यकीय सुविधा फोंडावासीयांना कुठे उपलब्ध होतील, ते आधी सांगा, असा आग्रह फोंडावासीयांनी धरला आहे.

लोकांनी करायचे काय?
अचानकपणे उपजिल्हा इस्पितळ कोविड केल्यास इतर आजारांवर उपचारासाठी येणाऱ्यांना काय करायचे. फोंडा तालुक्‍यातील सर्व पंचायतींतील रुग्ण आयडी उपजिल्हा इस्पितळातच येतात, त्यामुळे आधी आरोग्य सेवा कुठे ते सांगा.
- राजेश कवळेकर (सरपंच, कवळे)

निर्णय योग्यच...
फोंडा उपजिल्हा इस्पितळ कोविडसाठी राखीव ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, कारण या इस्पितळात सुविधा आहेत, मात्र त्याचबरोबर फोंड्यातील रुग्णांची योग्य सोय अन्यत्र करायला हवी.
- प्रदीप शेट (भाजप नेता, मडकई)

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT