Uday Bhembre  Dainik Gomantak
गोवा

Goa Opinion Poll Day: ''जॅक सिक्‍वेरांनाच ओपिनियन पोलचं बाप म्‍हणणं हा इतर नेत्‍यांवर मोठा अन्‍याय...''; कोकणी नेते उदय भेंब्रे स्पष्टच बोलले

Uday Bhembre On Opinion Poll Efforts: गोव्‍याचे महाराष्‍ट्रात विलीनीकरण होऊ नये यासाठी वेगवेगळ्‍या संघटना वेगवेगळ्‍या स्‍तरांवर काम करत होत्‍या.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: गोव्‍याचे महाराष्‍ट्रात विलीनीकरण होऊ नये यासाठी वेगवेगळ्‍या संघटना वेगवेगळ्‍या स्‍तरांवर काम करत होत्‍या. या प्रत्‍येक संघटनांचे प्रमुख वेगवेगळे होते. ओपिनियन पोलचा कौल विलीनीकरणाच्या विरोधात गेला. त्‍यामागे अनेक नेत्‍यांचे प्रयत्‍न होते. साहजिकच तो एक सामूहिक स्‍वरूपाचा विजय होता. त्‍यामुळे या ‘ओपिनियन पोल’चे बाप फक्‍त डॉ. जॅक सिक्‍वेरा असे म्‍हणणे म्‍हणजे इतर नेत्‍यांवर तो एक प्रकारचा अन्‍याय होईल, असे मत या चळवळीत आघाडीवर राहून काम केलेले कोकणी नेते उदय भेंब्रे यांनी व्‍यक्‍त केले.

जनमत कौलदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला गोमंतक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात भेंब्रे यांची मुलाखत घेतली असता त्‍यांनी अनेक विधाने केली. त्‍यात गोव्‍यातील ख्रिस्‍ती समाजाबाबतही एक महत्त्‍वपूर्ण विधान केले. ते म्‍हणाले, राजभाषा आंदोलनावेळी गोव्‍यातील (Goa) संपूर्ण ख्रिस्‍ती समाज कोकणीच्‍या बाजूने होता हे केवळ अर्धसत्‍य आहे. या आंदोलनात हा समाज कोकणीच्‍या बाजूने लढला हे जरी खरे असले तरी या समाजातील बराच वर्ग फक्‍त मराठीच्‍या भीतीने आंदोलनात सामील झाला होता. या वर्गाला कोकणी काहीही देणेघेणे नव्‍हते.

जनमत कौलाच्‍या वेळीही काहीशी अशाच प्रकारची स्‍थिती होती. ख्रिस्‍ती समाज विलीनीकरणाच्या विरोधात ठामपणे उभा राहिला ही जरी गोष्‍ट खरी असली तरी त्‍यातील काहींनी ‍कोकणीबद्दल आपुलकी नव्‍हती. त्‍यांना फक्‍त आपण महाराष्‍ट्रात विलीन होणार ही एकच भीती सतावत होती. त्‍यामुळेच त्‍यांनी या जनमत कौल आंदोलनाला पाठिंबा दिला, असा दावा भेंब्रे यांनी केला.

दै. ‘गोमन्‍तक’चे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली. त्‍यात प्रामुख्‍याने ‘जनमत कौलाचा बाप कोण?’ यावरच चर्चा झाली. यापूर्वी बेळगावात कोकणी परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्‍या अधिवेशनात भेंब्रे यांनीच सर्व प्रथम ‘सिक्‍वेरा हेच केवळ ओपिनियन पोलचे बाप नाहीत’ असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍याबद्दल त्‍यांना विचारले असता ते म्‍हणाले, गोव्‍याचे महाराष्‍ट्रात (Maharashtra) विलीनीकरण करावे की त्‍याचा संघराज्‍याचा दर्जा कायम ठेवावा यासाठी ओपिनियन पोल घेण्‍याचा निर्णय दिल्‍लीत झाला. त्‍यावेळी डॉ. सिक्‍वेरा हे ‘युनायटेड गोवन्‍स’ या प्रादेशिक पक्षाचे नेते होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शब्‍दांचा प्रभाव दिल्‍लीतील काँग्रेसच्‍या केंद्रीय नेत्‍यांवर पडणे शक्‍यच नव्‍हते.

गोव्‍यातील हा तिढा पोटनिवडणूक घेऊन सोडवावा अशा आशयाचा ठराव केंद्र सरकारच्‍या मंत्रिमंडळाने घेतला होता आणि त्‍यात बदल होणे अशक्‍य असल्‍याचे तत्‍कालीन केंद्रीय मंत्री मोरारजी देसाई यांनी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्‍यक्ष पुरुषोत्तम काकोडकर यांना सांगितले होते. मात्र काकोडकर यांनी तत्‍कालीन केंद्रीय नेते स. का. पाटील यांना आपला विचार पटवून देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव बदलण्‍यास भाग पाडले. त्‍यानंतर केंद्रात कायदा संमत करण्‍यात आला आणि गोव्‍यासाठी ओपिनियन पोल घेण्‍याचा निर्णय झाला. त्‍यामुळे ओपिनियन पोलचे बाप कोण, असे म्‍हणायचे झाल्‍यास ‘काकोडकर’ असे म्‍हणता येईल. पण डॉ. सिक्‍वेरा यांना ही उपाधी देणे कदापि शक्‍य नाही, असेही भेंब्रे म्‍हणाले.

म्‍हणून ख्रिस्‍ती समाजाचा आंदोलनाला पाठिंबा

ओपिनियन पोल चळवळ आणि नंतर झालेली राजभाषा चळवळ या दोन्‍ही चळवळींना गोव्‍यातील ख्रिस्‍ती समाजाने संपूर्ण पाठिंबा दिला. मात्र आज हा समाज कोकणी चळवळीपासून दूर का? असे विचारले असता भेंब्रे म्‍हणाले, या दोन्‍ही चळवळीत या समाजाने खंबीर पाठिंबा दिला ही गोष्‍ट खरी असली तरी यातील एका मोठ्या गटाला कोकणीशी काहीही देणेघेणे नव्‍हते हे नंतरच्‍या घटनांनी स्‍पष्‍ट केले. ओपिनियन पोलवेळी आपल्‍याला महाराष्‍ट्रात विलीन व्‍हावे लागणार व राजभाषा आंदोलनावेळी आपल्‍यावर मराठी थोपली जाणार अशी भीती त्‍यांना वाटत होती. त्‍यामुळे या भीतीपोटी हा समाज या आंदोलनाला पाठिंबा देण्‍यासाठी प्रवृत्त झाला. मात्र नंतर इंग्रजी माध्‍यमाचा मुद्दा समोर आला, त्‍यावेळी याच समाजातील मोठ्या घटकाने कोकणीला नव्‍हे तर इंग्रजीला पाठिंबा दिला ही गोष्‍ट विसरून चालणार नाही असेही ते म्‍हणाले.

युगो-काँग्रेसची युती न झाल्‍याने नुकसान

ओपिनियन पोल जिंकल्‍यावर लगेच जी निवडणूक झाली, त्‍यावेळी युनायटेड गोवन्‍स पार्टीचे अध्‍यक्ष असलेले डॉ. जॅक सिक्‍वेरा यांच्‍याकडे काँग्रेस आणि युगोने युती करून निवडणूक लढवावी, जेणेकरून मगो पक्षाचा पराभव होणे शक्‍य होईल असा प्रस्‍ताव ठेवला होता. काँग्रेसला हा प्रस्‍ताव मान्‍य होता, पण सिक्‍वेरा यांना तो मान्‍य नव्‍हता. ओपिनियन पोलनंतर गोव्‍यात युगोची सत्ता येणार अशा भ्रमात ते होते. मात्र जाहीर झालेल्‍या निकालाने त्‍यांचा भ्रमनिरास झाला. पण यामुळे गोव्‍याचे मात्र मोठे नुकसान झाले, असे मत उदय भेंब्रे यांनी व्‍यक्त केले. ते म्‍हणाले, युगो-काँग्रेसचे सरकार आले असते तर गोव्‍याची राजभाषा लगेच कोकणी झाली असती आणि घटकराज्‍याचा दर्जाही लगेच मिळाला असता. यानंतरची सतरा वर्षे सत्तेवर महाराष्‍ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT