The level of dams in the state has decreased drastically राज्यातील धरणांच्या पातळीत कमालीची घट झालेली आहे. दुसरीकडे मान्सून मंदावला आहे. त्यामुळे गोमंतकीयांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
उत्तर गोव्यातील तिळारी व आमठाणे ही दोन धरणे वगळल्यास अंजुणे धरणात पुढील १२ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मॉन्सूनने येत्या काही दिवसांत जोर न पकडल्यास डिचोली व सत्तरी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यात अंजुणे, आमठाणे व तिळारी ही तीन धरणे आहेत. यातील अंजुणे धरणात फक्त ३.७ टक्के पाणीसाठा राहिला आहे.
म्हणजेच फक्त बारा दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. सत्तरी व डिचोली या दोन तालुक्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आमठाणे धरणात ४४.१ टक्के व तिळारी धरणात ९६ टक्के पाणीसाठा आहे.
मॉन्सून आणखी मंदावल्यास उत्तरेतील काही तालुक्यांतील स्थिती बिकट होऊ शकते. काही भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे. अंजुणे धरण हे सत्तरी व डिचोली तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागवते.
धरणातून मर्यादित पाणीपुरवठा सुरू
अंजुणे धरणातून सत्तरी, डिचोली व बार्देशमधील काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु याचा परिणाम बार्देशवर तेवढा जाणवणार नाही. कारण बार्देशला आमठाणे व तिळारीमधून पाणीपुरवठा होतो.
सत्तरी व डिचोली भागावर याचे अधिक परिणाम होऊ शकतात. सध्या अंजुणे धरणात दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच काल बुधवारपासून या धरणातून मर्यादित पाणीपुरवठा केला जातोय.
पर्यायी व्यवस्थेबाबत अभ्यास सुरू
जलस्त्रोत विभागातील सूत्रांनी सांगितले की, अंजुणेमध्ये सध्या दहा दिवस पुरेल इतकेच पाणी बाकी आहे. जास्तीत जास्त बारा दिवसांपर्यंत पुरवठा होऊ शकतो.
बुधवारपासून आम्ही मर्यादित पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पस्थळी करतोय. मॉन्सून लांबल्यास पर्यायी व्यवस्थेबाबत जलस्त्रोत विभागाकडून अभ्यास सुरू आहे. पावसाने जोर धरणे आता गरजेचे बनले आहे.
तिळारी धरणात ९६ टक्के पाणीसाठा : तिळारी धरणात ९६ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा किमान ६० दिवस म्हणजे दोन महिने पुरेल इतका आहे.
त्यामुळे मॉन्सून लांबला तरी पेडणे व बार्देश तालुक्यावर त्याचा परिणाम जाणवणार नाही. दुसरीकडे आमठाणे धरणात सध्या ३० ते ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अंजुणे धरणातील घटत्या जलपातळीमुळे जलस्त्रोतांवर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांसाठी ही धोक्याची घंटा आहे. धरण लवकर भरले नाही तर शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अंजुणे धरणातील पाणी वाळवंटी नदीत सोडले जाते. या पाण्यावर पडोसे व साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प अवलंबून आहे. तसेच अस्नोडा प्रकल्पात जलशुद्धीकरण प्रक्रिया होते. तिळारी धरणाच्या पाण्यावर अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प व आमठाणे धरण अवलंबून आहे.
चार गावांचे स्थलांतर व पुनर्वसन करून अंजुणे धरण साकारले होते. डिचोली, सत्तरी व बार्देश तालुक्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या तो एक महत्त्वाचा दुवा आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.