Mopa Airport : मोपा विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. आता उद्घाटनाआधीच विमान कंपन्यांनी आपली विमानं मोपावर उतरवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ओमान एअरलाईन्सने 1 जानेवारीपासून आपली गोव्यात येणारी सर्व विमानं दाबोळीऐवजी मोपा विमानतळावर उतरवणार असल्याची घोषणाच केली आहे. जानेवारीपासून एअरलाईन्स दाबोळीचा उड्डाणांसाठी वापर करणार नसून प्रवाशांच्या माहितीसाठी ओमान एअरलाईन्सने ही माहिती जाहीर केली आहे.
पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. जानेवारी 2023 पासून येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. नागरी विमान सेवा मात्र दाबोळी येथेच राहाणार असून ते बंद होणार नाही, असे मोपा विमानतळ संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी नुकतेच स्पष्ट केले. ‘दाबोळी बंद’वरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच शानभोग यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
ते म्हणाले, दाबोळी विमानतळ हे मुळात नौदलाचे आहे. नौदलासाठी नेहमी काही तास नागरी उड्डाण बंद ठेवावे लागते. आंतरराष्ट्रीय मोठी जम्बो विमाने छोट्या दाबोळी विमानतळावर उतरू शकत नाहीत. त्यामुळे मोपासारख्या विमानतळाची आवश्यकता भासली. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय होईल व तूर्त दाबोळीला नागरी सेवा सुरूच राहिल. दाबोळी विमानतळावर सर्व साधनसुविधा आहेत. त्या वाया जाता कामा नये. खासगी विमानांसाठी पार्किंग व्यवस्था मोपा येथेच उत्तम आहे. दाबोळीपेक्षा मोपाला विमान पार्किंग भाडेही कमी असणार आहे. त्यामुळे खासगी विमाने मोपाकडे वळतील, असे शानभोग यांनी सांगितले.
उद्घाटन घोषणांत वारंवार बदल
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनाच्या तारखा पंतप्रधानांच्या अनुपलब्धतेमुळे वारंवार बदलत गेल्या. 14 जुलैला मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2022 नंतर उद्घाटन होईल, असे घोषित केले होते. काम आटोक्यात नसल्याने 1 ऑगस्टला हे उद्घाटन सप्टेंबरनंतर होईल, असे सांगितले. त्यानंतर गोव्यात मोपा विमानतळावर पहिले विमान डिसेंबरमध्ये उतरेल असे सांगितले होते. मात्र, येत्या 8 डिसेंबरला पंतप्रधान एका कार्यक्रमानिमित्त गोव्यात येणार असल्याने त्याच दिवशी विमानतळाचेही उद्घाटन करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
हेम्बर्ग, दुबई, सिंगापूर येथून येणारी कार्गो विमाने बंगळूर, हैद्राबाद येथील विमानतळावर उतरतात. ती आता मोपाला उतरतील. आयात-निर्यातीला गोव्याला चांगले दिवस येणार आहेत. भविष्यात रेल्वेमार्गही मोपाला जोडला जाऊ शकतो, अशी माहिती मोपा विमानतळाचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.