सासष्टी: मडगाव रवींद्र भवनच्या पाय तियात्रिस्त सभागृह व ब्लॅक बॉक्सच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. आम्ही जी ३० ऑक्टोबरपर्यंतची कालमर्यादा ठरवली होती, तोपर्यंत हे काम पूर्ण होईल व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सभागृह खुले केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
कामत यांनी असेही सांगितले की, दुरुस्तीच्या कामाची गती योग्यप्रकारे सुरू असून अर्धेअधिक काम पूर्ण झाले आहे.
यासंदर्भात रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्याने जी जी कामे करावयास हाती घेतली आहेत, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या कामावर देखरेख करण्यासाठी एक खास समितीचे गठन करण्यात आले असून आम्ही त्यांच्याकडे समन्वय साधून आहोत. कला अकादमीसाठी जी देखरेख समिती नियुक्त केली होती, त्यातील दोन सदस्य या समितीत आहेत. त्यामुळे या समितीतील सदस्य नियमितपणे या कामावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, यंदा मे महिन्यात सभागृहाच्या दुरुस्तीचे काम हातात घेतले होते; पण आकस्मिक पावसामुळे सभागृहात पाणी गळती सुरू झाली. त्यामुळे फॉल्स सिलिंगला तडा गेला. तसेच ब्लॅक बॉक्समधील भिंतीनाही तडा गेला. त्यामुळे संपूर्ण दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले होते. सर्वप्रथम मुख्य सभागृहावरील छतावर पत्रे घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
फॉल्स सिलिंगचे काम पूर्ण झाले आहे, खुर्च्या दुरुस्त केल्या आहेत व कार्पेट बसविण्याचे काम हातात घेतले आहे. या कामाबरोबर इफ्फीचे कामही समांतर पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे कामत यांनी सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण होईल. १६ ऑक्टोबरला सकाळी तियात्र कलाकारांची बैठक बोलावली असून सायंकाळी देखरेख समितीची बैठक होणार आहे व त्यात कामाचा आढावा घेतला जाईल, असे तालक यांनी सांगितले.
लाखो रुपये खर्चून मुख्य सभागृहातील रंगमंच, रंगमंचामागे असलेल्या कलाकारांच्या ग्रीन रुम, शौचालयाची दुरुस्ती, ध्वनी व प्रकाश यंत्रणेतही सुधारणा केली होती. कलाकारांच्या ज्या तक्रारी होत्या, त्यांचे निरसन केले होते. सध्या मुख्य सभागृह, ब्लॅक बॉक्स यांच्या दुरुस्तीच्या कामाबरोबरच संलग्न इमारतीच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.