
मडगाव: येथील रविंद्र भवनमध्ये सुरू असलेल्या छत दुरुस्ती आणि संरचनात्मक कामांवरून सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीने सर्वात अधिक संभ्रमित तियात्र कलाकारांना करून सोडले आहे. सर्व कलाकार समुदायाला ज्याप्रकारे शेवटच्या घटकेपर्यंत अंधारात ठेवून कला अकादमीच्या नूतनीकरणाचा घाट घातला गेला त्याच प्रकाराची पुनरावृत्ती मडगाव रवींद्र भवनच्या बाबतीत घडवण्यात तर येत नाही ना अशीच शंका कलाकारांना वाटू लागली आहे.
कला अकादमीच्या बाबतीत अक्षम्य गोंधळ घालणारे सार्वजनिक बांधकाम खाते या ठिकाणीही मुख्य भूमिकेत असल्याने, त्यांची ती शंका गैरलागू असण्याच्या शक्यतेवरही शंका घेण्यास जागा आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
चार वर्षांपूर्वी असेच कला अकादमीच्या वास्तू बाबतीत असेच घडायला सुरुवात झाली होती व नंतर ती “दुरुस्ती”साठी कित्येक महिने बंद ठेवली गेली. निविदा न काढता तिच्या दुरुस्तीवर(?) आणि नुतानीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले परंतू आजही तेथे अडचणीचे डोंगर आहेत.
आता रवींद्र भवनही त्याच मार्गाने जात असल्याचा धोका स्पष्ट जाणवतो आहे. खरे तर शासनाने एकमेकांवर होणारे दोषारोप तातडीने थांबवून, स्वतः पुढाकार घेऊन एक स्पष्ट, पारदर्शक आणि जबाबदार प्रणाली तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा हे सांस्कृतिक केंद्रही कला अकादमीसारखेच एका अयशस्वी प्रयोगशाळेत रूपांतरित होईल अशी भावना तियात्र कलाकारांची बनली आहे.
रवींद्र भवनच्या छत दुरुस्ती आणि संरचनात्मक कामाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकार आणि रंगकर्मींच्या मनात आणखी एक संशय बळावत आहे- पाय तियात्रिस्त प्रेक्षागृहाचं रूपांतर इफ्फी चित्रपट महोत्सवासाठी कायमस्वरूपी चित्रपटगृहात तर केलं जाणार नाही ना? हे प्रेक्षागृह बंद स्थितीत ठेवणे म्हणजे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याची भावना कलाविश्वात आहे. एकदा त्याचे रूपांतर चित्रपटगृहात झाले की, कला अकादमीप्रमाणेच येथेही नाट्यप्रयोगासाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था आणि रंगमंच व्यवस्था कायमस्वरूपी नष्ट होण्याची भीती काही कलाकार व्यक्त करत आहेत.
मडगाव रवींद्र भवनची सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आज सारे तियात्र कलाकार करत आहेत. ती जबाबदारी नेमकी कोणाची आहे यावरून रवीन्द्र भवन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत असे तियात्र कलाकारांना वाटू लागले आहे. रवींद्र भवनच्या छत दुरुस्तीवर आतापर्यंत कोट्यवधीं रुपये खर्च झाले अाहेत. पण ‘गळती लागली आहे’ हे कारण पुढे करून पाय तियात्रिस्त प्रेक्षागृह, ब्लॅक बॉक्स यांसारखी महत्त्वाची सभागृहे बंद करण्यात आली आहेत. मे महिन्याच्या मध्यात, पावसाळ्याच्या अगदी तोंडावर सुरू झालेल्या कामांमुळे तियात्रांचे प्रयोग रद्द झाले. त्यातून कलाकारांचे नुकसानही झाले पण कोणताही जबाबदार अधिकारी पुढे येऊन अजूनही योग्य व समाधानकारक उत्तर देत नाही अशी भावना तियात्र कलाकारांमध्ये रुजू लागली आहे.
हल्लीच मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी तियात्र कलाकारांबरोबर या सभागृहाची पहाणी ठेवली होती त्यावेळी ज्येष्ठ तियात्र दिग्दर्शक सॅमी तावारिस यांनी, ही परिस्थिती कुणामुळे उद्भवली तसेच या सभागृहासाठी स्थिरता प्रमाणपत्र देण्यात आले आहे का असे प्रश्न उपस्थीत केले होते. त्यांच्या या प्रश्नांना ‘ही सर्व माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असेल’ असे साळसूद उत्तर मात्र मिळाले. यावर या सभागृहात शेकडो लोक कार्यक्रम पहायला येतात. त्यामुळे सभागृहाला स्थिरता प्रमाणपत्र आहे की नाही हे पहाण्याची जबाबदारी रवींद्र भवन कार्यकारी समितीची असल्याचे मत सॅमी तावारिस व्यक्त केले होते. यावर रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांचे म्हणणे होते, ‘रवींद्र भवन मडगावची आजपर्यंत दुरुस्ती आणि देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेच केली जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याने अजून या इमारतीचा ताबा अधिकृतपणे रवींद्र भवनला दिलेला नाही. रवींद्र भवनची दुरुस्ती करण्याची कुठलीही यंत्रणा रवींद्र भवन किंवा कला व संस्कृती खात्याकडे नाही. त्यामुळे या इमारतीच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याचीच आहे.’
रवींद्र भवनच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि हे भवन योग्य मार्गावर आणण्यासाठी तातडीचे उपाय घेणे आवश्यक आहे असे मत गोवा मनाेरंजन सोसायटीचे माजी कार्यकारिणी सदस्य विशाल पै काकोडे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी रवींद्र भवनची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून प्रतिष्ठित गोमंतकीय कलाकार, सांस्कृतिक प्रशासक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स तत्काळ स्थापन करा अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून त्यांनी केली आहे. संस्थेच्या मागील कार्याचा आणि खर्चाचा तपशीलवार आढावा घ्यायचा, रचनात्मक सुधारणा सुचवायच्या आणि या संस्थेला सर्वसमावेशक, सशक्त सांस्कृतिक केंद्र बनवण्याचा रोडमॅप तयार करण्याचा अधिकार या टास्क फोर्सला असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः मुलं आणि युवावर्गासाठी नाट्य, संगीत, नृत्य, दृश्यकला आणि पारंपरिक गोमंतकीय लोककला यांच्या नियमित प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्याची आवश्यकता देखील अधोरेखित केली आहे.
मडगाव रवींद्र भवनची जबाबदारी कुणीच घेत नाहीत असा जो आरोप करण्यात येत आहे त्यात काहीच तथ्य नाही. अन्यथा प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी हे सभागृह बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलाच नसता. वास्तविक आम्ही ही दुरुस्ती योग्य वेळेतच हातात घेतली होती. मात्र वादळीपट्टा निर्माण होऊन पाऊस लवकर आला याला आम्हाला कसे जबाबदार धरता येईल? रवींद्र भवनच्या दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेच केली जाते. मात्र दुरुस्ती योग्यरित्या होत आहे की नाही हे पहाण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.