झगमगाटी पण बेगडी संस्कृतीत गोव्याचा श्वास कोंडत असताना तोंड आ वासून पाहाणे हेच गोमंतकीय तरुणाईच्या हाती आहे. स्वयंपूर्ण गोव्याचा नारा देणाऱ्यांनी वास्तवांत येऊन संत्रस्त गोव्यातून उमटणारे निषेधाचे सूर समजून घ्यायला हवेत, त्यांच्या दमनासाठी अघोरतंत्राचा वापर करू नये. मध्यंतरीच्या काळांत मलुल पडलेली उत्तर गोव्याची किनारपट्टी नको त्या कारणासाठी पुन्हा चर्चेच्या प्रकाशझोतात आलेली आहे.
(North Goa's coastline is again in limelight for an unwanted reason)
टीक-टॉक नायिका आणि हरियाणातल्या उभरत्या राजकीय नेत्या सोनाली फोगट यांचा, त्या जीवाचा गोवा करण्यासाठी आल्या असता झालेला अकाली मृत्यू, तो मृत्यू हृदयविकाराने झाल्याचें जबाबदार अधिकाऱ्यांचे उतावळें विधान, नंतर गोमेकॉत झालेल्या शवचिकित्सेवेळी पीडितेने विघातक पदार्थ सेवन केल्याचा निष्कर्ष आणि तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमा, कूर्मगतीने चाललेली पोलिस चौकशी आणि त्याविषयी मयत महिलेच्या परिवाराने जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी, चौकशीची गती वाढवण्यासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यानी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेली रदबदली आणि शेवटी हरियाणातील खाप पंचायतीने आक्रमक होत सरकारला दिलेल्या अंतिम मुदतीनंतर प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय... अशा चित्रविचित्र घटनाक्रमामुळे एकूण प्रकरणाला हॉलिवुडच्या देमार क्राइम थ्रिलरचे स्वरूप आलेले आहे. तूर्तास संशयित पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीअंती गुन्हेगारांना सजा होईलच, पण गोव्याच्या फेनिल, चकचकाटी आकर्षणभूमींत प्राण गमवावे लागलेल्या युवतींची संख्या एकाने वाढली आहे, याचीही नोंद होईल.
चौदा वर्षांआधी स्कार्लेट किलिंग नामक षोडशवर्षीय ब्रिटिश किशोरीचा मृतदेह याच परिसरांत सापडला होता. तिला अमली पदार्थ पाजून तिच्यावर बलात्कार करून मृतदेह पाण्यात फेकून दिला होता. चालू वर्षी तर काही महाविद्यालयीन युवक- युवती आणि दक्षिण भारतातील टेक- सिटींतल्या धनवान परिवारांतील पोरे अमली पदार्थांच्या अतिरेकी सेवनाला बळी पडलीं. योगायोगाची बाब म्हणजे यातील बहुतेक अपमृत्यूंचा संबंध राज्यातील अशा काही नाइट क्लबशी जुळलेला आहे, जिथल्या ट्रान्स संगीताचे आकर्षण एक्सटेसी सारख्या वेगळ्या अर्थाने ब्रह्मानंदी टाळी लावण्याची क्षमता असलेल्या त्याज्य पदार्थाशी जुळले गेलेय. या क्लबांच्या परिसरात हा पदार्थ सहजपणे खरेदी करता येतो.
हळदोणे येथील सिद्धी नाईक या युवतीला आलेला अपमृत्यूही किनारपट्टीतल्या गैरव्यवहारांशी निगडित असावा; केवळ सबळ पुरावे नसल्यानेच त्याच्या मुळापर्यंत जाणे शक्य झालेले नाही. राज्याची किनारपट्टी अमली पदार्थांचा स्वर्ग बनली असून कॉर्पोरेट जगातील तरुण, शिवशिवणाऱ्या रक्ताला खुणावते आहे.
गोव्यातून अमली पदार्थांचा व्यवहार करणारा कुख्यात इस्रायली ड्रगसम्राट अटाला आणि त्याची स्विडीश प्रेयसी आमोरी यांनी दशकभरापूर्वी ड्रग्सचे विक्रेते, पोलिस आणि राजकारण्यांमधल्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करताना अनेक संशयांना सप्रमाण सिद्धच केले होते. पण जेव्हा न्यायरक्षकांचेच पाय फाटक्यात असतात तेव्हा गुन्हेगारांना अभय मिळणे ठरलेलेच. दशकभरांत उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत सुधारणा होणे दूरच राहिले. राजकारण्यांची घट्ट मगरमिठी येथील प्रत्येक व्यवहारावर बसलेली आहे, अर्थांत भटकी गुरे आणि समुद्रातील टार बॉल्सचा प्रादुर्भाव वगळतां.
लख्ख सूर्यप्रकाशाची आणि फेनिल समुद्रकिनाऱ्यांची भूमी असे जे गोव्याच्या भूमीचे वर्णन केले जायचे, त्याला आता गुंगीची भूमी, अशी जोड मिळाली असून राजकीय क्षेत्राबरोबरच स्थानिकांचा सहज धनाचा लोभ त्यामागे आहे. येथे ड्रग माफियाचा सुळसुळाट आहे. या व्यवसायातील नफ्याची गणिते तरुण रक्ताला ज्या सहजरितीने आकर्षित करतात, त्या सहजतेने लोहचुंबकही पोलादाला आकर्षित करू शकणार नाही. थिरकण्याचे वेड लागलेले अतिखोल खिशांचे गुंतवणूकदार इथली चमकदमक अविरत चालावी यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात आणि भ्रष्ट धनाच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला मिळतात म्हणून स्थानिकही या नशिल्या मनोरंजनाच्या जर्सी गाईला पिळताना मागेपुढे पाहात नाहीत.
कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेली यंत्रणा दुर्बल आहे, पक्षपाती आहे, राजकीय क्षेत्राची बटिक बनली आहे. घटनाक्रमाकडे दुर्लक्ष करण्यासाठी तिला मुबलक प्रलोभन दिले जाते. वाया गेलेल्या पोरांच्या विधवा मातेप्रमाणे हतबल झालेला गोवा या नशेच्या लब्धप्रतिष्ठित सौदागरांचा धनसंचय आणि राजकीय क्षेत्रातले वाढते वजन मूकपणे पाहात आलेला आहे. एरवीही आज लोकशाहीचे अधिष्ठान नितिमत्ता आणि चारित्र्यापेक्षा लोकप्रियता आणि लोकानुयायवरच अधिक अवलंबून असते.
कोण्या एका काळचे लख्ख सूर्यप्रकाशांत न्हाऊन निघालेले आपले नितांतरमणीय समुद्रकिनारे, ज्याच्या अविरत लाटांवर आपली मुलेबाळे विहरायची, ज्याच्या उदरांतल्या मत्स्यधनाने इथल्या कोळ्यांच्या रापणी भरून जायच्या तो अरबी समुद्र आणि उन्हाळ्यातील समुद्रस्नानासाठी येणाऱ्या गोमंतकियांच्या परिवारांना आपल्या विस्तारांत सामावून घेणाऱ्या ''दर्यावेळा'' आता ''आय लव्ह गोवा'', असे ओरडून सांगणाऱ्या टी शर्टांत अंगाला येणारा स्वस्त मद्याचा दर्प अयशस्वीरित्या दडपू पाहाणाऱ्या आणि किनाऱ्यांचे पवित्र्य जमेल त्या पद्धतीने भ्रष्ट करणाऱ्या, सुटलेल्या दोंदांच्या पर्यटकांच्या टोळधाडीने गजबजून जातात.
खाटा, चित्र विचित्र आकाराच्या छत्र्या यांच्या गर्दीतून वाट काढत आज स्थानिकांना किनाऱ्यावर फिरावे लागते. ज्यांचे अस्तित्व धोक्यांत आले आहे, अशा दुर्मिळ समुद्रजीवी प्रजातींनाही किनाऱ्यांवर प्रवेश नाकारण्यापर्यंत मानवी हस्तक्षेप गेलेला आहे. कठोर कारवाईचे इशारे दिले जात असतानाही पर्यटक आपली वाहने किनाऱ्यांवर घुसवण्याची दादागिरी करतात. त्यांना खुणावत उद्दिपित करणारे मसाज, एस्कोर्ट सेवा, ड्रग्स आणि तत्सम वैषयिक प्रलोभनांची यादी सोबत घेऊन वावरणारे दलाल पावलोपावली भेटतात. हेच दृष्य आज गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण बनले असून तेच गोव्याच्या पर्यटनाचे वस्तुनिष्ठ चित्र असल्याचे देशी- विदेशी पर्यटन वर्तुळाला वाटते
आहे.
या व्यसनासक्त पर्यटनाची एक समांतर अर्थव्यवस्था कार्यरत असून तिच्या अनुययातून येणारी अफाट संपत्ती पाहाता, सहसा कुणी तिचा त्यागही करणार नाही. यातून राज्याला काही अल्प महसूल मिळतही असेल, पण त्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते आहे. गोव्याच्या शांतताप्रिय समाजव्यवस्थेच्या अंगांगावर उमटणारे ओरखडे याची प्रचिती देतात. वस्तुस्थितीची दाहकता नाकारताना स्वप्नसृष्टींत रमू पाहाणारी आपली तरुणाई नशेच्या जाळ्यांत फसत चालली आहे, अल्पावधित पैसा कमावण्याचे आमिषही असतेच. अंतिम झोपेकडे घेऊन जाण्याची, शरीर आणि समाज पोखरण्याची क्षमता असलेल्या या नशेच्या ऑक्टोपसचे जहरी हातपांय आता किनारपट्टी ओलांडून राज्याच्या अंतर्भागापर्यंतही पोहोचले आहेत.
पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या आपल्या किनारपट्टीत सरबराई व्यवसायाचा अनियंत्रित विस्तारही अपरिहार्य अशा अरिष्टाची चाहुल देतो आहे. जसजसा हा विस्तार समुद्राच्या जवळ जाईल तसतशी धोक्याची आणि हानीची पातळीही वाढत जाईल. किनारपट्टीवरली सीआरझेड नियमांची उल्लंघने पाहून न्यायव्यवस्था सरकारसह सगळ्यांचेच कान वेळोवेळी टोचत असते पण कारवाई मात्र काहीच होत नाही. जेव्हा कर्लिससारखे हातातून निसटू पाहाणारे आणि व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह करणारे प्रकरण उद्भवतें, तेव्हाच प्रशासनाचे बूड हलते आणि आपण काहीतरी करत असल्याचा देखावा उभा केला जातो.
व्यसनव्यवसायाच्या कचाट्यातून गोव्याची जीवनरेखा मानली गेलेली मांडवी नदीही सुटलेली नाही. ज्यांचे वर्णन पापगृहे असे करता येईल अशा तरंगत्या कॅसिनोंनी तिच्या पात्राला विळखा घातला आहे. निवडणुकांतील जाहीरनामे आणि बलाढ्य राजकारण्यांचे वचननामेही या कॅसिनोंना हात लावू शकत नाहीत. नदीपात्रांत मलाचे बिनदिक्कत निस्सारण करत आणि मद्यधुंदीची अहोरात्र तजवीज करत हे जुगारखाने जगाच्या डोळ्यांआड हमखास खिसे रिते करण्याची ग्वाही देत उभे आहेत. किनारपट्टीवर आता भटकी गुरे, बेवारशी कुत्री आणि फिरत्या विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढला आहे. इथले शॅकमालक गोऱ्या कातडीसमोर लोटांगण घालत देशी पर्यटकांना सेवा नाकारतात, प्रसंगी उद्धटपणे त्यांना घालवूनही देतात. दुसऱ्या बाजूने काही परदेशी गुंतवणूकदारांनी किनारपट्टीचे विशिष्ट भाग व्यापले असून तेथील वास्तव्यापासून भोजनापर्यंत प्रत्येक उद्यमावर त्यांचे नियंत्रण असते. दंडेलशाहीच्या वापराने ते स्थानिकांची मुस्कटदाबी करतात.
देशभरातील अनेक धनवंत आणि बुद्धिवंतांनाही गोव्यात सेकंड होम हवा असतो. पण या लोकांचे गोव्याच्या उत्कर्षांत काहीच योगदान नसते. त्यांत बॉलिवुड तारे-तारका आल्या, व्यवसाय विश्वातले मुखंड आले आणि प्रशासनातील बडे अधिकारीही, ते केवळ आपल्या ऐशो- आरामाच्या विकृत प्रदर्शनासाठीच येथे येतात. गोमंतकियांच्या हाती आता शांत भूतकाळाच्या रम्य आठवणींत रमण्याव्यतिरिक्त काहीच राहिलेले नाही. त्यांच्या संसाधनांवर, नैसर्गिक वारशावर धंदेवाईक परप्रांतियांनी कधीच कब्जा केला आहे.
या झगमगाटी पण बेगडी संस्कृतींत गोव्याचा श्वास कोंडत असताना तोंड आ वासून पाहाणे हेच गोमंतकीय तरुणाईच्या हाती आहे. स्वयंपूर्ण गोव्याचा नारा देणाऱ्यांनी वास्तवांत येऊन संत्रस्त गोव्यातून उमटणारे निषेधाचे सूर समजून घ्यायला हवेत, त्यांच्या दमनासाठी अघोरतंत्राचा वापर करू नये. गोवा पोलिसांनी आपले वर्तन आदर्श वाटावे, अशा स्तरावर आणणे अगत्याचे आहे.
पश्चिम घाटांप्रमाणे गोव्याला अरबी समुद्राकडून अनेक अमूल्य भेटी मिळत असतात. मात्र किनारपट्टीकडे आपले अघोरी दुर्लक्ष समुद्री परिस्थितिकाच्या निऱ्यांनाच हात घालत आहे. राज्याला सढळहस्ते खर्च करणाऱ्या पर्यटकांची नितांत गरज असली तरी त्या नादांत संवेदनाविहिन आणि कल्पकताविहिन रानटी पर्यटकांना किनारपट्टी आंदण देता येणार नाही. या पर्यटकांनी पोर्तुगीजांनी प्रभावित केलेल्या आमच्या भोजनकौशल्याचा अवश्य आस्वाद घ्यावा,पण त्याना गुंगीच्या अत्युच्च स्तरावर नेणारी नशा नाही मिळायची. आपल्या पारंपरिक आदरातिथ्याचा वारसा सोडण्यास सहसा कुठलाही गोमंतकीय तयार नसेल पण आलेल्या अभ्यागताला बसल्या ठिकाणी कोसळला म्हणून हॉस्पिटलांत घेऊन जायची आणि त्याला मृत म्हणून घोषित केल्यानंतर चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून घ्यायचीही कुणाचीच तयारी नाही.
नवा पर्यटन मौसम दाराशी येऊन ठेपला आहे. आपल्या आर्थिक अपेक्षांबरोबर पर्यावरणीय उत्तरदायित्वाचे भान राखणाऱ्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या जाणिवांची कदर करणाऱ्या पर्यटनासाठी आग्रही होण्याची वेळ हीच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.