Goa Beach | New Year 2023 Dainik Gomantak
गोवा

New Year 2023: पर्यटकांनी नियम बसवले धाब्यावर; गोव्यात संगीत रजनींची 'फुल टू धूम'

New Year 2023: नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

New Year 2023: नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत. यात देशी पर्यटकांचा जास्त भरणा असून मोरजी किनारी भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, कॉटेजीस, रिसॉर्ट्‌स व क्लब्समध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत रजनींचेही आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

किनारी भागात जो कुणी संगीत रजनीचे आयोजन करतो त्याने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी नियोजित स्थळी जाऊन ध्वनियंत्रणा, पार्किंग व्यवस्था, लोकवस्ती व इतर गोष्टींचा अहवाल पोलीस उपअधीक्षकांना दिल्यानंतर तो अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो. त्यानुसार नंतर उपजिल्हाधिकारी परवाने देतात. मात्र पोलिस कधीच घटनास्थळी जाऊन पाहणी करत नाहीत. अहवालही कार्यालयात बसून देतात.

मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनारी भागात हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. त्यांचे मनोरंजन करणे स्थानिक व्यावसायिकांचे व पर्यटन खात्याचे कर्तव्य असते. मात्र, पर्यटन खात्यातर्फे या किनारी भागात चेन्जिंग रूम, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय पार्किंग या कोणत्याच सुविधा नाहीत तरीही सरकार आणि पर्यटन खाते पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे आश्वासन देतात.

विनापरवाना आयोजन

वर्षसमाप्तीच्या दिवसांत किनारी भागात मोठ्या प्रमाणात रात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी घेऊन पहाटेपर्यंत पार्ट्यांचे आयोजन करून ध्वनिप्रदूषण केले जाते. हा प्रकार चालू असल्याची पोलिसांना व जे परवाने देतात त्यांना पूर्ण माहिती असते. त्यातच काहीजण परवाने न घेता पार्ट्यांचे पहाटेपर्यंत आयोजन करून स्थानिकांची झोपमोड करतात.

डझनभर पार्ट्या

पेडणे तालुक्यातील किनारी भागाचा विचार केला तर मोरजी, आश्वे-मांद्रे, हरमल व केरी या किनारी भागात 31 रोजी डझनभर पार्ट्यांचे आयोजन केले आहे. या सर्व पार्ट्यांना प्रवेश शुल्क आकारले जाते. रात्री बारापूर्वी काही पार्ट्या आयोजकांनी प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.

खासगी जमिनीवर पार्किंग

किनारी भागात 31 रोजी होणाऱ्या पार्ट्यांत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येतील. काही देशी पर्यटक आपापली वाहने घेऊन येतात. त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय आयोजकांनी खासगी जमिनी भाडेपट्टीवर घेऊन केली आहे. तर काही ठिकाणी पे-पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकांची लूट चालू आहे.

दर्जेदार पर्यटकांची संख्या रोडावली

किनारी भागातील सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे येथे दर्जेदार पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे. आवश्‍यक सुविधा असत्या तर अनेक पर्यटक आले असते. आज किनारी भागात देशी पर्यटकांची गर्दी वाढली तरी त्याचा हवा तेवढा फायदा व्यापारी, व्यावसायिकांना होत नाही.

फलकांचे अतिक्रमण

पार्ट्यांची जाहिरात सोशल मीडिया, फेसबुकवर, ठिकठिकाणी भले मोठे फलक लावून केली जाते. प्रत्येक रस्त्याच्या जंक्शनवर हे फलक व त्यांचे अतिक्रमण दिसून येते. ज्या ठिकाणी पार्टी असते त्या ठिकाणी पर्यटकांना दिशा कळण्यासाठी लाईट मारून ठिकाण प्रकाशित केले जाते.

‘स्वस्त’ पर्यटकांची वाढ

किनारी भागात आज स्वस्तातील पर्यटक आढळून येतात. गटागटात भाड्याने राहून ते हॉटेलवर जेवण्यापेक्षा खोलीवरच जेवण बनवतात. काही स्वस्तातील पर्यटक रात्रीच्या वेळी संगीत पार्टीचे आयोजन करतात, हॉटेल चालवतात, पार्ट्यांचे जाहिरात फलक रस्त्यावर लावतात, बेकायदा व्यवसाय करण्यातही त्यांचा मोठा हात आहे.

सोयीसुविधांची वानवा

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येतात. मात्र, त्यांच्या सोयीसाठी किनारी भागात चेन्जिंग रूम, शौचालय, पार्किंग व्यवस्था नसते आणि या सुविधा पुरवण्यासाठी पर्यटन खात्याला अपयश आलेले आहे.

पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

किनारी भागात कोणतीच पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे येणारे पर्यटक त्यांना पार्किंगची जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करून ठेवतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

अमली पदार्थांचा वापर

अशाप्रकारच्या संगीत रजनींमध्ये सर्राससपणे अमली पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत असते. कारण या पार्ट्यांमध्ये मौजमजा करण्यासाठीच पर्यटक आलेले असतात. त्यातून मग गैरव्यवहारांना उत्तेजना मिळाल्याने काही अनैतिक घटनादेखील घडतात.

रात्री 10 नंतरही डीजेचा आवाज; पोलिसांचे दुर्लक्षच

रात्री 10 नंतर संगीत रजनीच्या कार्यक्रमांना बंदी असूनही किनारी भागात मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात संगीताचे कार्यक्रम सुरू असतात. या पार्ट्यांना रोखण्यासाठी पोलिसही पाहिजे तशी कारवाई करताना दिसत नाहीत. राज्यात सध्या किनारी भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किनारी भागातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये संगीत रजनी रंगत आहेत.

खालील नियम घालून परवाने दिले जातात

  • कोणते स्पीकर बॉक्स वापरले जातात त्याचा तपशील.

  • केवळ 55 डेसिबल क्षमतेच्या आवाजाने संगीत वाजवणे.

  • ध्वनी यंत्रणा 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारी असू नये.

  • नियोजित स्थळापासून 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असू नये.

  • नियमांचे पालन करताना कायद्याचा भंग झाला तर पोलिसांनी कारवाई करावी.

  • वेळ आणि नियमांचे पालन करावे.

  • कायद्याचा भंग केल्यास गुन्हा नोंदवावा.

  • रात्री १० ते सकाळी सहापर्यंत दारूकामाची आतषबाजी करू नये.

  •  ज्या क्लबमध्ये पार्टी चालू असेल त्याला दोन दरवाजे असायला हवेत.

  •  जमिनीच्या बाजूने सर्व स्पीकर असावेत.

  • लोकांच्या बाजूने थेट स्पीकर लावू नयेत.

  • मोठा आवाज करू नये.

  •  एखादी लग्नाची पार्टी किंवा धार्मिक उत्सव असेल तर नियम पाळावेत.

  • कायद्याचा भंग केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार एक वर्ष तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा असेल.

  • नियमांचे पालन होत नसेल तर दिलेले परवाने परत घेण्याचा अधिकार ज्यांनी परवाने दिले त्यांना आहे.

  • अर्जदाराने जनहित लक्षात घेऊन ध्वनिप्रदूषण करू नये.

  • अर्जदाराने आवश्‍यक परवाने घ्यावेत.

  • कोस्टल प्राधिकरण विभाग कायद्याचे पालन करावे.

नियमांचे गांभीर्य नाही

उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक व स्थानिक पोलिस यांच्या अहवालानुसार एकूण 18 नियम घालून संगीत रजनींसाठी परवाने दिले जातात. त्या नियमांचे कुणीही पालन करत नाही. शिवाय जे परवाने देतात तेही दुर्लक्ष करतात. ध्वनी प्रदूषणाचा स्थानिकांना त्रास सोसावा लागतो. मोजकेच लोक तक्रारी करतात. त्यांचीही या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही.

सरकारला फायदा शून्य!

31 डिसेंबरला सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंत संगीत रजनी पार्ट्यांची धूम आयोजित केली जाते. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत परवानगी घेऊन पहाटेपर्यंत ध्वनिप्रदूषण केले जाते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डीजेवादक या पार्ट्यांमध्ये लाखो रुपये देऊन आणले जातात.

तसेच व्हीआयपींचीही मोठी उपस्थिती असते. या पार्ट्यांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. त्यातील एक टक्कादेखील सरकारच्या तिजोरीत जमा होत नाही व सरकार तो वसूल करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT