Goa Education X
गोवा

Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा 'एप्रिल'मध्ये! शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी

New Education Policy Goa: राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच इतर शैक्षणिक संस्थांना हा नियम लागू असल्याचे परिपत्रक आज शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यात १ एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच इतर शैक्षणिक संस्थांना हा नियम लागू असल्याचे परिपत्रक आज शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन नियम लागू असेल. एप्रिल महिन्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी तास घेण्यात येतील. या विद्यार्थ्यांना १ मे ते ३ जून २०२५ या काळात उन्हाळी सुट्टी असेल. ४ जूनपासून नियमित वेळेत शाळांचे तास घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी संस्था प्रमुखांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनांना सूचित केले आहे.

बदल करण्याची कारणे अशी...

राज्यात एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.

नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

वर्ष २०२६ मध्ये प्राथमिक शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही एप्रिलमध्ये करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्वसामान्यपणे एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतात; परंतु सुटी सुरू होत नाही. काही मुले शाळेत येत नाहीत.

सीबीएससी, आयसीएसी तसेच महाराष्ट्र आणि मिझोराम यांसारख्या राज्यांत एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्षाची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.

आठवीपर्यंतचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण!

यंदा नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होईल. त्यावेळी जरी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नसला तरी देखील इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. कारण आठवीपर्यंत सरसकट पास धोरण राज्यात अंमलात आहे.

अभ्यासक्रमासाठी वेळ पुरत नसल्याने निर्णय

नवीन ‘एनईपी’च्या अनुषंगाने दोन सत्रांत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो; परंतु सद्यस्थितीत पहिल्या सत्राला वेळ अधिक मिळतो आणि दुसऱ्या सत्राला कमी. त्यामुळे दोन सत्रांमध्ये वेळेचे असंतुलन हवे. तो प्रश्‍न कायमचा मिटेल.

या निर्णयामुळे शाळांच्या पूर्वीच्या वेळेत बदल करावा लागणार नाही. काही शैक्षणिक संस्थांमध्ये सकाळी माध्यमिक शाळा आणि संध्याकाळी उच्च माध्यमिक शाळा भरतात. त्यामुळे अशा कारणांमुळे शाळेच्या वेळा बदलणे कठीण आहे.

केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहार योजना राबविते. परंतु या योजनेच्या माध्यमातून जेवढे दिवस विद्यार्थ्यांना आहार द्यायला हवा, तेवढे दिवस देता येत नाही. या निर्णयामुळे नियमानुसार शाळेचे दिवस पूर्ण होतील.

या निर्णयामुळे गणेश चतुर्थी, नाताळ आणि दिवाळी सुट्टीच्या कालावधीत बदल केला जाणार नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्टी ही १ मे ते ३ जून २०२५ या कालावधीत असेल.

नवीन शैक्षणिक वर्ष कशापद्धतीने राबवावे, यासंबंधी शुक्रवारी राज्यातील सर्व मुख्याध्यापक आणि नंतर शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येणार आहे.

सरसकट पास धोरण तात्काळ रद्द नाही

केंद्र सरकारने इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी हे धोरण तात्काळ रद्द करता येणार नाही. तसेच, केंद्र सरकारचे नियम तंतोतंत स्वीकारता येणार नाहीत. तसे केल्यास नापास विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते, अशी भीती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी व्यक्त केली आहे. लोलयेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा नापास होण्याचा दर वाढू नये, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये तसेच जे विद्यार्थी शिक्षण मागे पडतात, त्यांच्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावे लागणार असून त्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. त्या समितीद्वारे यासंबंधीचे कार्य सुरू असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

मागे पडणाऱ्यांना मदतीचा हात

राज्यात जे विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीत मागे पडतात, त्यांच्यासाठी अतिरिक्त तास घेऊन त्यांचा अभ्यास घेतला जातो. आठवीपर्यंत सरसकट पास धोरण रद्द केल्यानंतर जे विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीत मागे पडतील, त्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सक्षम करता येईल याचाही विचार केला जात असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT