Netravali Waterfall Dainik Gomantak
गोवा

Netravali Waterfall : धबधब्‍यांवर जाण्‍यास बंदीचा निर्णय जाचकच! नेत्रावळीतील व्‍यावसायिकांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Netravali Waterfall :

मडगाव, पावसात काेणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गोव्‍यातील धबधब्‍यांवर जाण्‍यास वन खात्‍याने सरसकट बंदी घालण्‍याचा जो आदेश काल जारी केला त्‍याला नेत्रावळी आणि काणकोण या भागातील स्‍थानिक लोक आणि व्‍यावसायिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

गोव्‍यातील धोकादायक धबधबे कोणते आणि सुरक्षित धबधबे काेणते याची यादी वन खात्‍याकडे असतानाही ही सरसकट बंदी का, असा सवाल करून या बंदीमुळे कित्‍येक स्‍थानिकांचा पर्यटनाशी संबंधित असलेला धंदा बुडेल याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.

मागच्‍या वर्षी जुलै महिन्‍यात सांगे येथील मैनापी धबधब्‍यावर दोन दुर्घटना घडल्‍या होत्‍या. एका दुर्घटनेत वास्‍कोतील दोघांना बुडून मृत्‍यू आला होता. तर अन्‍य एका दुर्घटनेत एक स्‍थानिक दगावला होता. या दोन्‍ही घटना केवळ तीन दिवसांच्‍या फरकाने घडल्‍या होत्‍या. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन वन खात्‍याने ही बंदी घातली आहे. मात्र, त्‍यामुळे स्‍थानिकांचा धंदा बुडेल, अशी भीती व्‍यावसायिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

पावसाळी पर्यटन हे फक्‍त तीन महिने चालणारे पर्यटन असून गोव्‍यातील हे धबधबे पाहण्‍यासाठी जे पर्यटक येतात त्‍यांच्‍यासाठी खाद्यपदार्थ आणि जेवण तयार करून ते काही स्‍थानिक महिला स्‍वयंसेवक गट विकत असतात.

पावसाचे हे तीन महिने या गटांसाठी अतिरिक्‍त आमदनी मिळवून देणारे असतात. त्‍याशिवाय धबधब्‍यांच्‍या ठिकाणी भजी आणि अन्‍य खाद्यपदार्थ विकण्‍याचे ठेलेही गावच्‍या लोकांकडून लावले जातात. पावसाचे तीन महिने या भागातील स्‍थानिकांसाठी अशा जोडधंद्यामुळे फायदेशीर ठरत असतात.

मागच्‍या वर्षी दोन दुर्घटना घडल्‍या म्‍हणून संपूर्ण पावसाळी पर्यटनावरच सरसकट बंदी आणणे हा मूर्खपणाचा विचार, अशी प्रतिक्रिया खोतीगाव-काणकोण येथील अभयारण्‍यातील पर्यटन व्‍यावसायिक बासुरी देसाई यांनी व्‍यक्‍त केली. नेत्रावळी अभयारण्‍यातील धबधब्‍यांवर दोन दुर्घटना घडल्‍यानंतर दीर्घकाळ धबधबे पर्यटकांसाठी बंद केले होते. मात्र, त्‍यानंतर कमी धाेकादायक धबधबे खुले केले होते. याचाच दुसरा अर्थ म्‍हणजे, अतिधोकादायक धबधबे कोणते आणि कमी धोकादायक धबधबे कोणते याची माहिती वन खात्‍याकडे आहे. अशा परिस्‍थितीत सगळेच धबधबे पर्यटकांना बंद करण्‍याऐवजी जे अतिधोकादायक धबधबे आहेत तेच बंद करणे शक्‍य होते, असे ते म्‍हणाले.

समुद्रकिनाऱ्यांवर बंदी का नाही?

मागच्‍या वर्षी धबधब्‍यांवर पर्यटक बुडून मरण्‍याच्‍या जशा दुर्घटना घडल्‍या तशाच दुर्घटना गाेव्‍यातील कित्‍येक समुद्रकिनाऱ्यांवरही घडल्‍या. वागातोर येथे सेल्‍फी काढण्‍याच्‍या नादात पर्यटक समुद्रात घसरून पडल्‍याने पर्यटकांचे जीव जाण्‍याच्‍या घटना घडल्‍या. धबधबे धोकादायक म्‍हणून पावसात त्‍यांच्‍यावर बंदी घालण्‍यात येते तर समुद्रकिनाऱ्यांवरही ती का घातली जात नाही, असा सवाल खोतीगाव अभयारण्‍यात इको टुरिझममध्‍ये कार्यरत असलेल्‍या बासुरी देसाई यांनी केला.

सुरक्षेचे उपाय हवेत

पावसात धबधब्‍यांवर येणाऱ्या पर्यटकांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने वन खात्‍याने सरसकट बंदी घालण्‍याऐवजी त्‍यासाठी सुरक्षेचे उपाय कोणते घेता येतील याकडे लक्ष देण्‍याची गरज नेत्रावळीच्‍या पंचसदस्‍य राखी नाईक यांनी व्‍यक्‍त केली. ज्‍या मैनापी धबधब्‍यावर मागच्‍या वर्षी दोन दुर्घटना घडल्‍या. तिथे जाण्‍यासाठी जी पायवाट आहे तिथे पर्यटकांच्‍या सुरक्षेसाठी रेलिंग्‍स बसवा, अशी मागणी आम्‍ही केली होती. ही दुर्घटना होऊन वर्ष उलटले तरी हे रेलिंग्‍स बसविले नाहीत. यावरून वन खात्‍याचा हलगर्जीपणा उघड होत नाही का, असा सवाल त्‍यांनी केला.

पर्यटकांना मनाईमुळे स्‍वयंसेवक गटांचे नुकसान

यापूर्वी दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे धबधब्‍यात उतरण्‍यास बंदी घालण्‍याचा आदेश जारी केला होता. हा आदेश जारी असतानाच आता वन खात्‍याने नवा आदेश जारी केला आहे. धबधब्‍यांवर आंघोळ करण्‍यासाठी पर्यटकांना मनाई करणे हे जरी आवश्‍‍यक असले तरी हे धबधबे पहाण्‍यासही बंदी का असावी, असा सवाल काही स्‍थानिकांनी केला.

पर्यटक धबधब्‍याच्‍या पाण्‍यात उतरू नयेत यासाठी पोलिस किंवा वनरक्षक तिथे तैनात करून सुरक्षेचे उपाय घेता आले नसते का? जर असा आदेश जारी करायचाच होता तर एक पंधरा दिवस आधी त्‍याची माहिती स्‍थानिकांना देता येणे शक्‍य नव्‍हते का, असाही सवाल या व्‍यावसायिकांनी केला.

वन खात्‍याच्‍या या अतिघाईने जारी केलेल्‍या आदेशामुळे रविवारी कित्‍येक व्‍यावसायिकांना नुकसान सोसावे लागले, असे स्‍थानिकांनी सांगितले.

रविवार असल्‍यामुळे धबधब्‍यांवर येणाऱ्या पर्यटकांनी स्‍थानिक स्‍वयंसेवक गटांना जेवणाची आगाऊ ऑर्डर दिली होती. त्‍यासाठी या गटांनी जेवणाचे साहित्यही विकत आणले होते. पण रविवारी अकस्‍मात ही बंदी जारी केल्‍यामुळे धबधब्‍यांवर आलेल्‍या पर्यटकांना माघारी जावे लागले आणि ज्‍या स्‍वयंसेवक गटांनी जेवणाचे साहित्य आणले होते त्‍यांनाही गिऱ्हाईक नसल्‍यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले, अशी माहिती देण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT