कळंगुट: येत्या ऑक्टोबरपासून राज्यात सुरू होत असलेला आगामी पर्यटन काळ कुठल्याही अडथळ्यांविना पार पाडण्यासाठी स्थानिक हॉटेलियर्स तसेच इतर व्यावसायिकांशी नागवा-हडफडे पंचायत मंडळाकडून मंगळवारी चर्चात्मक बैठक घेण्यात आली. या चर्चेत पंचायत क्षेत्रातील पर्यटनाशी संबंधित लोकांनी अनेक विषयांवर गंभीरपणे आपापली मते मांडली तसेच आगामी पर्यटन काळ यशस्वी करण्यासाठी सल्लामसलत केल्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले.
पर्यटन काळात या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, भटकी कुत्री तसेच गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पर्यटन खात्याकडून ठोस उपाययोजना आखण्याची जोरदार मागणी परिसरातील हॉटेलियर्स तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून करण्यात आली.
पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकांची डोकेदुखी ठरणाऱ्या परप्रांतीय भिकाऱ्यांविरोधात कळंगुट पोलिसांनी कडक पावले उचलणे गरजेचे असून त्यामुळे या काळात राज्याची विनाकारण बदनामी होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
सरपंच रोशन रेडकर यांनी बैठकीत उपस्थित व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या मागण्या तसेच सूचना कळंगुटचे आमदार मायकल लोबो तसेच पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्यामार्फत निश्चितपणे सोडविण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले. या चर्चेत पंचायत मंडळातील सर्व सदस्यांनी भाग घेतला.
पर्यटन व्यवसाय हा आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असल्याने पर्यटनाशी संबंधित असलेला येथील टॅक्सी व्यवसाय सुरळीत करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस उपाययोजना आखण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली.
पर्यटकांना राज्यात कुठल्याही त्रासाविना प्रवास करता यावा यासाठी स्थानिक पर्यटक टॅक्सी व्यवसाय तसेच इतर कॅबधारक चालकांत असलेला वाद पर्यटनापूर्वी मिटविणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी यावेळी उपस्थित हॉटेलियर्स तसेच संबंधित व्यवसायिकांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.