Mormugao municipal council workers surround chief officer's home over the issue of wages Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मुख्‍याधिकाऱ्यांना घेराव

वेतन पुन्‍हा लांबले : कर्ज काढून लवकरच समस्‍या सोडविणार : जयंत तारी

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्‍याने या कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना घेराव घालून जाब विचारला. पालिकेकडे पैसे नसल्याने वेतन रखडले असल्याचे तारी यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत बॅंकेकडून कर्ज घेऊन तुम्‍हांला वेतन देऊ, असे आश्वासन त्‍यांनी दिल्यानंतर कर्मचारी माघारी फिरले.(Mormugao municipal council workers surround chief officer's home over the issue of wages)

मुरगाव पालिका (Mormugao Palika) कर्मचाऱ्यांची पगाराविना परवड सुरूच आहे. गेल्या महिन्याचे वेतन अजून बँक खात्यात जमा न झाल्याने पालिका कर्मचारी विवंचनेत पडले आहेत. त्‍यातच हप्ता वसुलीसाठी बँकांनी (Bank) तगादा लावल्याने कर्मचारी चिंताग्रस्त बनले आहेत. ‘अ’ दर्जाची पालिका नानाविध कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असते. त्‍यात कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही हा एक प्रमुख प्रश्न आहे.

दरम्यान, आज पालिका कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत तारी यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला असता तिजोरीत खडखडाट असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच सरकारकडून येणारा कर गेल्‍या सात वर्षांपासून मिळाला नसल्‍याने पालिकेवर ही स्थिती उद्भवल्‍याचेही स्‍पष्‍ट केले. विधानसभा निवडणुकीच्‍या (Goa Assembly Election 2022) काळात थकबाकी वसुली झालेही नाही. परिणामी वेतन देण्यास विलंब झाला. आता राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज काढून वेतन दिले जाईल, असे आश्वासन तारी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस वासुदेव धावडे यांना याबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, वेतन वेळेवर मिळत नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्‍यांच्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचारी कर्जबाजारी असून हप्ता वसुलीसाठी बॅंका तगादा लावत आहेत. शिवाय निवृत्त कर्मचारी अजूनही पेन्शनपासून वंचित आहेत. आपल्‍या कष्टाचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नसतील तर काय उपयोग, असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

प्रत्‍येक महिन्‍याला उद्‌भवते समस्‍या

पालिकेला कोट्यवधी रुपयांची थकबाकी येणे आहे. मात्र वसुली व्यवस्थित होत नसल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देणे पालिकेला डोईजड होत आहे. प्रत्येक महिन्याला हा प्रश्न उद्भवत असल्याने कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. प्रत्येक कर्मचारी कर्जबाजारी असल्याने वेतन वेळेवर खात्यात जमा होत नसल्याने बँका हप्ता वसुलीसाठी तगादा लावतात. परिणामी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ होते. तसेच त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे काय करावे अन्‌ काय नको, याच विवंचनेत कर्मचारी सापडले आहेत. डिसेंबर महिन्याच्या 22 तारखेला पालिका कर्मचाऱ्यांना त्यांचे शेवटचे वेतन मिळाले होते.

थकबाकी वसुली झाली नसल्यामुळे मुरगाव पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. याला जबाबदार पालिका प्रशासनच आहे. त्‍यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांवर खापर फोडू नये. येत्‍या दोन दिवसांत वेतनाचा प्रश्न सुटला नाही तर कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार.

- केशव प्रभू, गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT