Goa Monsoon 2023 Sandip Desai
गोवा

Monsoon 2023 : माॅन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर; कारवारमध्ये दाखल

राज्यात मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी; ‘बिपरजॉय’चा धोका कायम

दैनिक गोमन्तक डिजिटल

Monsoon 2023 : आठवड्याच्या विलंबानंतर 8 जून रोजी मॉन्सून केरळात दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो तसेच अन्य काही घटकांमुळे यंदा मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला होता; परंतु आता पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला असून शनिवारी तो कारवारात दाखल झाला.

सोमवारी मॉन्सून गोव्यात डेरेदाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शनिवारी राज्यात सायंकाळी मॉन्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उष्म्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला.

मात्र, अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यापासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात हे वादळ थैमान घालत असून त्यामुळे गोव्याला धोका निर्माण झाला आहे. हे वादळ प्रतितास 7 किलोमीटरच्या गतीने उत्तरेकडे सरकत आहे.

पुढील 24 तासांत चक्रीवादळाची शक्यता अधिक तीव्र होऊन ते उत्तर-ईशान्येकडे हळूहळू सरकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आज रविवार असल्याने शाळांना सुटी आहे. मात्र, उद्या सोमवारपासून शाळा नियमित सुरू राहतील, असे शिक्षण खात्याने कळविले आहे.

कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला

मॉन्सून यंदा केरळमध्ये तब्बल दहा दिवस उशिरा दाखल झाला. याचदरम्यान अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. यामुळे मॉन्सून विस्कळीत होईल की काय, अशी भीती हवामान शास्त्रज्ञांसह सर्वांनाच होती.

मात्र, या चक्रीवादळामुळे मॉन्सून गतिमान होण्याला मदत झाल्याने संपूर्ण पश्‍चिम घाटात मॉन्सूनसरी कोसळत आहेत. मॉन्सूनने शनिवारपर्यंत केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला असून सोमवारी राज्यात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी अडकला होता कारवारात

गेल्या वर्षी मॉन्सून तब्बल १० दिवस गोव्याच्या उंबरठ्यावर कारवारमध्ये अडकला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे हवामान खात्यालाही वाटते. कारण चक्रीवादळ ओमानकडे वळल्यास समुद्रावरील आर्द्रता कमी होऊन मॉन्सून विस्कळीत होईल, असे मत व्यक्त करण्यात येते.

उंच उंच लाटा

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे. ११ जूनपर्यंत राज्यात ३.५ ते ४.१ मीटर उंच लाटा किनाऱ्याला धडकू शकतात. त्यामुळे गोव्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारा

गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा इशारा दिला असला, तरी नागरिकांनी घाबरू नये. मात्र, समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी जाऊ नये, तसेच बोटी व लहान जहाजे न चालविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दिवसांत समुद्र किनाऱ्यालगतचे कार्यक्रम बंद करण्यास सांगितले आहे.

मॉन्सूनपूर्व सरींमुळे दिलासा

शुक्रवारी रात्रीपासून मॉन्सूनपूर्व सरींची राज्यातील विविध भागांत बरसात सुरू झाली. शुक्रवारी सर्वाधिक पेडणे, त्याखालोखाल म्हापसा, पणजी, साखळी, काणकोण, दाबोळी, मुरगाव, सांगे आदी भागांत मॉन्सूनपूर्व पाऊस पडला. शनिवारी राजधानी पणजीसह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. सत्तरी तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. साकोर्डा-तांबडीसुर्ला भागात रिमझिम सरींनी उष्म्याने त्रस्त झालेल्यांना दिलासा दिला.

पणजीत गटारे तुंबली

राजधानी पणजीत गेल्या वर्षभराहून अधिक काळ स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे गटारांमध्ये माती भरली आहे. त्यातच शनिवारी मॉन्सूनपूर्व सरींनी दमदार हजेरी लावल्याने शहरात अनेक ठिकाणी गटारे तुंबली. पाणी रस्त्यावरून वाहू लागले. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना, खासकरून दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. याबद्दल वाहनचालकांनी प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली.

वीज गायब

शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडल्यामुळे रात्री अनेक ठिकाणी पडझड होऊन वीज गायब झाली. वीज दुरुस्तीची कामे शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होती. शनिवारी पाऊस पडला, तरी उष्मा काही प्रमाणात जाणवत होता. त्यातच वीज गायब झाल्याने लोकांचे, खासकरून ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले.

आपत्कालीन काळात संपर्क

०८३२-२४१९५५०

०८३२-२२२५३८३

०८३२-२७९४१००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT