पणजी: गेल्या एक आठवड्यापासून गोव्यासह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने हैराण केले आहे. केरळमध्ये देखील पावसाने दाणादाण उडवून दिल्यानंतर आज (२४ मे) मॉन्सून राज्यात दाखल झाल्याची अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर धडकला असून, दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर आणि सरासरी वेळेच्या आठ दिवस अगोदर मॉन्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. साधारणपणे एक जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो. यापूर्वी २३ मे २००९ मध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. १५ वर्षानंतर सरासरीच्या वेळेच्या अगोदर मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण गोवा व्यापून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सॅटेलाईट प्रतिमांनुसार, कमी दाबाचा पट्टा कोकण किनाऱ्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रावर केंद्रित आहे. कमी दाबाचा पट्टा रत्नागिरीजवळील दक्षिण कोकण किनाऱ्यावरून जातोय, असे ताज्या निरीक्षणांवरून असे दिसून येते. जमिनीवर धडकल्यानंतर, तो मध्य महाराष्ट्रातून पूर्वेकडे सरकत राहण्याची आणि पुढील २४ तासांत हळूहळू कमकुवत होऊन एका कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
गोव्यात रेड अलर्ट
हवामान खात्याने आजच्या दिवसासाठी (२४ मे) गोव्यात देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तर, २५ ते २८ मे या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत असून, येत्या चार दिवसांसाठी हा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
केरळ मुसळधार सुरुच, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने थिरुवनंतपूरम, कोल्लम, कोटायम, आलाप्पुझा, त्रिशूर, इडुक्की, आणि मलप्पुरम जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर, इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.