Mollem Chicken Waste Issue
फोंडा: पळसकट्टा, मोले येथे पार्सेकर फूड्स प्रा. लि.तर्फे उभारलेल्या पोल्ट्री फार्म चिकन वेस्टेज कचरा प्रकल्पामुळे गावात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने हा प्रकल्प या ठिकाणी नकोच अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पंचायत तसेच पोलिसांना निवेदन सादर केले आहे.
स्थानिक पंच वर्षा जानु झोरे यांनी पंचायतीला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पळसकट्टा येथे पार्सेकर फुड्स प्रायव्हेट लि.तर्फे पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे, परंतु गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी पोल्ट्री वेस्ट प्रक्रया व्यवसाय चालवला आहे.
त्यामुळे दुर्गंधीचा प्रचंड सामना स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आहे. या कंपनीचे मालक प्रभंजन पार्सेकर यांनी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ही समस्या अजून दूर झालेली नाही. स्थानिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या प्रकल्पाला पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
याबाबत येथील संदेश मिसाळ यांनी सांगितले की, पंधरा दिवसापूर्वी गावातील युवकांनी या प्रकल्पात बाहेरून चिकन वेस्टेज घेउन आलेले एक वाहन अडवले होते व याची माहिती स्थानिक पंचाला दिली होती. या प्रकल्पामुळे गावातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
मोलेचे सरपंच सुहास गांवकर यांनी सांगितले की, पळसकट्टा येथील पार्सेकर फूड्स प्रा. लि.च्या प्रकल्पाविरोधात स्थानिक पंच वर्षा झोरे यांनी स्थानिकांच्या सह्यांचे एक निवेदन पंचायतीला सादर केले आहे. या प्रकल्पातून उग्र वास येत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात ७ जानेवारी रोजी पंचायत मंडळाने स्थानिक व पार्सेकर फुडसचे मालक यांची एक बैठक बोलावली आहे. या प्रकल्पापासून लोकांना त्रास होत असेल तर पंचायतीने या प्रकल्पाला दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
पार्सेकर फूड्स प्रा. लि.चे मालक प्रभंजन पार्सेकर यांना यासंदर्भात विचारले असता गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी चिकन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र या प्रकल्पात चिकन कचरा साठवून ठेवला जात नाही. आमच्या फोंडा आस्थापनातून जो चिकन कचरा पाठवला जातो, त्यावर या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी सरकारकडे आम्ही स्वतंत्र जागेची मागणी केली आहे. जागा मिळाल्यानंतर हा प्रकल्प तिथे हलवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.