National Games Dainik Gomantak
गोवा

National Games: मॉडर्न पेंटॅथलॉनसाठी फोंड्याला पसंती, नव्वद टक्के सुविधा उपलब्ध

मॉडर्न पेंटॅथलॉनमधील तलवारबाजी, नेमबाजी, जलतरण व धावणे हे क्रीडाप्रकार घेण्यात येतील.

किशोर पेटकर

फोंडा क्रीडा संकुलात मॉडर्न पेंटॅथलॉनासाठी आवश्यक सुविधा असल्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) तांत्रिक शिष्टमंडळ समाधानी आहे, त्यामुळे 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या क्रीडाप्रकारासाठी फोंड्यालाच पसंती असल्याची माहिती भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.

आयओए शिष्टमंडळ, गोवा क्रीडा प्राधिकरण, मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे फोंडा क्रीडा संकुलाची सोमवारी पाहणी केली.

‘‘फोंड्यात मॉर्डन पेंटॅथलॉनच्या सुविधा नव्वद टक्के सज्ज आहेत. किंचित बदल अथवा सुविधा आवश्यक आहेत, त्यांची वेळेत पूर्तता होईल. तांत्रिक बाबींसंदर्भात पाहणीच्या वेळेस आम्हालाही निमंत्रित करण्यात आले ही खूप चांगली बाब आहे. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण करता आली. मॉडर्न पेंटॅथलॉन गोव्यासाठी नवा खेळ असला, तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाचे खूपच चांगले आयोजन होईल याची खात्री आहे. राष्ट्रीय स्पर्धेपूर्व राज्यात एखादी स्पर्धा घेण्याचे महासंघाचे नियोजन आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात गोवा क्रीडा प्राधिकरणाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे.’’ असे शिरगावकर यांनी सांगितले.

मॉडर्न पेंटॅथलॉनमधील तलवारबाजी, नेमबाजी, जलतरण व धावणे हे क्रीडाप्रकार घेण्यात येतील. घोडेस्वारी खेळ होणार नाही, कारण तांत्रिक बाबी आणि आवश्यक परवाना आड येत असल्यामुळे हा क्रीडा प्रकार वगळण्यात आल्याची माहिती शिरगावकर यांनी दिली.

यावेळी भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अभियंता दीपक लोटलीकर, सहाय्यक संचालक राजेश नाईक, क्रीडा खात्याचे अधिकारी पांडुरंग नाईक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे नीलेश नाईक, राष्ट्रीय स्पर्धा समितीच्या प्रकल्प अधिकारी प्रिया अशोक यांची उपस्थिती होती.

यॉटिंग, हॉकी केंद्रावर शिक्कामोर्तब

गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्पर्धा समितीचे संचालक आणि तांत्रिक शिष्टमंडळाचा तीन दिवसीय पाहणी दौरा सोमवारी संपला. शनिवारी व रविवारी यॉटिंग, हॉकी, गोल्फ, रोईंग, कॅनोईंग, कयाकिंग या खेळांच्या सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर यॉटिंगसाठी दोना पावला येथील हवाई बीच, तर हॉकीसाठी पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम स्पर्धेसाठी केंद्र या नात्याने निश्चित करण्यात आले, अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीतील गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे नोडल अधिकारी संदीप हेबळे यांनी दिली.

गोल्फसाठी काणकोण येथील ललित हॉटेलचे गोल्फ कोर्स, रोईंग, कॅनोईंग, कयाकिंगसाठी जुने गोवे जेटी, शापोरा नदी, बोरी नदी येथे पाहणी झाली, पण अंतिम निर्णय झालेला नाही. या स्पर्धा केंद्राविषयी संबंधित महासंघाची तांत्रिक समिती अंतिम निर्णय घेईल, असे हेबळे यांनी नमूद केले.

काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष आवश्यक

स्पर्धा केंद्र पाहणी दौऱ्यात शिष्टमंडळाने काही बाबींसदर्भात चिंता व्यक्त केली आणि त्याकडे लक्ष देऊन पूर्तता करण्याची सूचना केली. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने या सूचनांचे गांभीर्याने पालन करून कार्यवाहीसह आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे संदीप हेबळे यांनी पत्रकात नमूद केले.

एकंदरीत शिष्टमंडळाने हा दौरा फलदायी ठरल्याचा निष्कर्ष काढला. स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी गोवा सरकार, क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवा व्यवहार खाते कटिबद्ध असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT