आम आदमी पक्षाचे दोन्ही आमदार व्हेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा हे दोघेही स्वतःला ‘व्होकल’ आमदार म्हणवून घेतात. या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघांना किनारपट्टी जोडलेली आहे. चार दिवसांआधी मोबोर येथे एक ट्रॉलर पाण्यात बुडाला. त्यामुळे २७ खलाशांचा जीव टांगणीला लागला होता. शेवटी पेले यांनी आपली जेट स्की घेऊन पाण्यात धाव घेतली आणि त्यांचा जीव वाचवला. मात्र, या घटनेतून आमच्या किनारपट्टीवर असलेली सुरक्षा सामग्री कशी कुचकामी आहे, हेही उघड झाले. व्हेन्झी आणि क्रुझ हे दोघेही स्वतःला मच्छिमारांचे प्रतिनिधीही म्हणवून घेतात, पण या सुरक्षा त्रुटीबद्दल कधीही आवाज उठवलेला दिसलेला नाही. त्यामुळे बाकी सगळीकडे ‘व्होकल’ असलेल्या या आमदाराना ‘लोकल’ समस्यां बद्दल काहीच पडून गेलेले नाही का? ∙∙∙
कळंगुटमध्ये ‘आरजी’ पक्षाने नवीन ऑफिस उघडलंय खरं, पण त्याची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरू आहे. चर्चा अशी आहे की, आरजी पक्षाने हे कार्यालय आमदार मायकल लोबो यांच्या मतदारसंघात मुद्दाम टाकलं. पक्षाची ही ‘निवडणुकीची तयारी’ आहे आणि हा ‘निशाणा’ थेट लोबोंवरच आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण खरी गंमत इथेच आहे! आरजी पक्ष कितीही ताकद लावूदे, इथे त्यांचा काही फायदा होणार नाही. उलट, लोबोंचे जे ‘चाहते’ मतदारसंघात आहेत, ते या ‘चॅलेंज’मुळे जास्त एकवटतील आणि लोबोंनाच सहानुभूती मिळेल. थोडक्यात, आरजीने लोबोंना आयताच फायदा करून दिलाय, अशी जोरदार चर्चा एका गटात होतेय. ते दुसऱ्या गटात आरजी पक्ष फक्त ‘कार्यालय’ उघडून थांबणार नाही. लोबोंच्या मतदारसंघात त्यांची जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे आणि ‘लोबोंचा बालेकिल्ला’ भेदण्यासाठी त्यांनी ‘सीक्रेट प्लॅन’ तयार ठेवलाय, असे आरजी कार्यकर्ते बोलतात. त्यामुळे, नुसता देखावा नाही, तर काहीतरी मोठा राजकीय धमाका या मतदारसंघात नक्कीच होणार! आता सगळ्यांच्या नजरा यावर आहेत की, आरजी पक्ष फक्त लोबोंना ‘त्रास’ देतो की खरे ''वर्चस्व'' तयार करतो! कळंगुटमध्ये आतापासूनच राजकीय ‘खेळ’ सुरू झालाय, हे निश्चित! ∙∙∙
राज्यातील आयआयटी सध्या विविध ठिकाणी फिरून आली असली तरी आयआयटीला कुणी थारा दिलेला नाही. प्रत्येक ठिकाणी आयआयटीला प्रखर विरोध झाला आणि सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. सांगे, केपे, काणकोण, सत्तरी आणि कोडार नंतर आता कुणाचा नंबर लागतो, याची चर्चा लोकांत सुरू आहे. आयआयटीला वीस लाख चौरस मीटर जमीन एकत्रित मिळणे कठीण होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्याची जमीन एखाद्या प्रकल्पाला देण्यास मुळात गोमंतकीय तयार नाहीत, कारण आधीच गोव्याची बहुतांश जमीन सरकारने फुंकून टाकली आहे, त्यात आता असे मोठे प्रकल्प आणून उर्वरित जमीन लाटायचा विचार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, गोव्याच्या पुढील पिढीसाठी कोणती जमीन तुम्ही राखून ठेवणार, असा सवाल त्यामुळेच उपस्थित होत असल्याने यापुढे आयआयटीच काय, अन्य अशा प्रकल्पांना गोव्यात थाराच मिळणार नाही, हे मात्र नक्की! ∙∙∙
सरकारने जीएसटी कमी झाल्याचा जो आनंदोत्सव साजरा केलाय ना... तो निव्वळ दिखावा आहे! आतून दुसरीच खिचडी शिजतेय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण म्हणजे सरकारने जीएसटी कमी झाल्याचं पत्रक तर ढोल बडवत फिरवलं, पण त्याच वेळी कमी झालेल्या पैशांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याची तयारी म्हणून वीज दरवाढ केली. ही म्हणजे नवीन ‘लूट’ आहे, असं जाणकार लोक खासगीत बोलतात. म्हणजे थोडक्यात काय? ‘एकीकडे लोकांचे पैसे कमी करायचे आणि दुसरीकडे कमी झालेले पैसे कसे काढता येतील हे बघायचे’ - हे या सरकारचं नवं ‘अर्थशास्त्र’ आहे! या ‘जीएसटी कट आणि डक’ धोरणाची चर्चा सध्या गल्लोगल्ली सुरू आहे. पुढे काय होणार? आता ही गोष्ट किती पसरते आणि मतदारांवर किती परिणाम करते, हे पुढच्या निवडणुकीत कळेल! ∙∙∙
‘मला मिळाले नाही, तर तुलाही मिळणार नाही, ते शत्रूला मिळाले तरी हरकत नाही’ या काही काँग्रेसी नेत्यांच्या वृत्तीमुळेच आज काँग्रेस पक्षाची व त्या नेत्यांची जी गत झाली आहे, ते आपण पाहतच आहोत. यात भर पडली ती काँग्रेस पक्षाचे एक जुने नेते गोविंद फळ देसाई यांची. गेल्या अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षात असलेले व काँग्रेस पक्षाच्या सहयोगाने अनेकवेळा बाळ्ळीचे सरपंच पद भोगलेले. काँग्रेसच्या जिल्हा समितीवर विविध पदे भूषविलेले बाळळीचे माजी सरपंच गोविंद फळ देसाई यांनी गरजेच्या वेळी काँग्रेस पक्षाची साथ सोडली आणि भाजपाला जवळ केले. काँग्रेसच्या सहयोगाने गोविंद यांनी चार वर्षे बाळ्ळी चे सरपंच पद भूषविले. मात्र गोविंदाने गरजेच्या वेळी काँग्रेसला साथ देण्याचे सोडून भाजपची साथ जोडली. गोविंदाच्या दगाबाजीमुळेच बाळ्ळी पंचायतीवर भाजप समर्थकांची सत्ता आली, असे आम्ही नव्हे बाळ्ळीतील काँग्रेस कार्यकर्ते म्हणताहेत. ∙∙∙
नगरविकासमंत्री या नात्याने विश्वजित राणे यांनी मोठी बक्षिसी सफाई कर्मचाऱ्यांना दिली आहे. गौरव झालेल्या ५४ सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची भेट त्यांनी देणयाचे जाहीर केले आहे. आपण मंत्री म्हणून मिळणारे वेतन वापरत नाही. सरकारचा एक पैसाही वापरत नाही, असे सांगत मंत्री राणे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीवर या अनोख्या भेटीची थाप गुरुवारी मारली आहे. पणजीतील सफाई कर्मचाऱ्यांना आपल्याला सत्कारासोबत, अशी काही भेट मिळेल याची कल्पनाही नव्हती. राणे यांच्या या अचानकपणे केलेल्या घोषणेमुळे प्रशासकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे. ∙∙∙
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज दरवाढीसाठी संयुक्त वीज नियामक आयोगाकडे बोट दाखवले आहे. आयोग काही आताच आलेला नाही. याआधीही आयोगाने दरवाढ मंजूर केली होती. मागील विधानसभा निवडणुकीआधीची दरवाढ लागू होऊ नये यासाठी सरकारने वीज खात्याला देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ केली. आता इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीज स्वस्त आहे, म्हणून वीजमंत्री या दरवाढीचे अप्रत्यक्ष समर्थन करत आहेत. दरवर्षी किमान ४ टक्के वीज दरवाढ होत जाणार असल्याने राज्यभरात प्रचंड नाराजी आहे. त्याचे पडसाद कसे उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेषतः विरोधकांचे लक्ष आहे. ∙∙∙
सन्मान्य व्यक्तीचा अपमान होणार याची खबरदारी सन्मान करणाऱ्याने घेणे गरजेचे असते. कुंकळ्ळी पालिका मंडळाने आमदार युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत सावरकटा ते अष्टविनायक मंदिर रस्त्याला डॉ. प्रकाश कुराडे यांचे नाव देऊन एक योग्य काम केले. त्यासाठी पालिका मंडळ व आमदार अभिनंदनास पात्र आहेत. कुंकळ्ळीचे धन्वंतरी म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रकाश कुराडे यांचा पालिकेने त्यांच्या घराशेजारील रस्त्याला नाव देऊन योग्य सन्मान केला खरा. मात्र, आता यावरून कुंकळ्ळीत वेगळ्याच चर्चेला सुरवात झाली आहे. ज्या रस्त्याला डॉ. कुराडे यांचे नाव दिले आहे, त्या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. सुमार वीस मीटर लांबीचा रस्ताच गायब झालेला आहे. खरे म्हणजे येथे पक्का रस्ताच नाही. पालिकेने व स्थानिक आमदाराने रस्त्याला नाव देण्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याचे धाडस का दाखविले नाही, असा प्रश्न स्थानिक विचारीत आहेत. आमदाराने अष्टविनायक मंदिराच्या सभागृहाचे नूतनीकरण करण्याचे काम ही सुरू केले आहे, मात्र मंदिराला जोडणारा रस्ता का होत नाही? डॉ प्रकाश कुराडे यांचे नाव असलेला रस्ता योग्य स्थितीत असायला नको का? नगराध्यक्ष व आमदारसाहेब यांचे उत्तर जनतेला मिळणार का? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.