वाळपई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा पोलिसांत ध्वनी प्रदूषणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रूपेश पोके यांची कार जमावाने पोलिस चौकीसमोरच पेटवली. याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून होंड्याचे सरपंच शिवदास माडकर हे पोलिस कारवाईपासून वाचवण्यासाठी बेपत्ता झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, असा हा प्रकार रविवारी मध्यरात्री होंडा येथे घडला. पणजी पोलिस ठाण्यावर जमाव चालून जाण्याच्या स्मृती ताज्या करणाऱ्या या प्रकरणात होंडा वडाकडे येथील कर्णकर्कश आवाजाबाबत होंडा पोलिस चौकीवर तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराची पोलिस चौकीसमोरच पार्क केलेली कार जमावाने पेटवून दिली. जमावासमोर पोलिस बळ अपुरे पडले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे जाहीरपणे सांगितल्यानंतर पोलिस सक्रिय झाले आणि दुपारनंतर त्यांनी कारवाई सुरू करत ८ जणांना अटक केली आणि ४०० जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता. कार जाळल्यानंतरही पोके यांच्याकडून त्यांची कोणाविरुद्धही तक्रार नाही, असे लिहूनही घेण्यात आले होते. मात्र, यासंदर्भातील व्हिडिओ सार्वत्रिक झाल्यावर समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
आधीच नरकासुर प्रतिमांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला वैतागलेल्या जनतेने या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्या रागाला वाट करून दिली होती. अखेर सरकारला याची दखल घ्यावी लागली. गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाईचे आदेश द्यावे लागले आणि त्याच परिणती आज रात्री उशिरापर्यंत ८ जणांच्या अटकेत झाली असून आणखीन काही जणांना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
पोलिसांची लपवाछपवी
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८ जणांची नावे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नव्हती.
चारशेंच्या जमावाची पोलिस चौकीवर चाल
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास संशयित कृष्णा गावकर, शिवदास माडकर, गौतम पार्सेकर यांच्यासह सुमारे ४०० जणांच्या जमावाने होंडा पोलिस चौकी परिसरात जबरदस्तीने घुसखोरी केली. तक्रारदार रूपेश पोके यांना धमकावले, त्यांच्यावर हल्ला करून दुखापत केली आणि त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. हा प्रकार दिवाळीच्या पूर्वसंध्येला संगीत वाजवण्याच्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सरपंच माडकरांचा शोध सुरू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानंतर वाळपई पोलिसांनी होंडा कार जळीतप्रकरणी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयितांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. होंडाचे सरपंच शिवदास माडकर हे सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे निर्देश
याप्रकरणी मंगळवारी सकाळपासून अनेकांची कसून चौकशी सुरू होती. रात्रीपर्यंत एकूण आठ जणांना अटक केल्याची माहिती मिळाली. तसेच अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. पणजी येथे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी कोण गुंतले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सध्या काहीजणांना ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.
आमची मुले निरपराध : पालकांचा आक्रोश
सध्या पोलिस व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने नागरिकांची चौकशी करत असून त्यांना अटक करत असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, अटक केलेल्यांचे कुटुंबीय आज होंडा पोलिस चौकी तसेच वाळपई पोलिस स्थानकात ठाण मांडून होते. ‘आमच्या मुलांनी काहीच केले नाही. ते केवळ नरकासुर प्रतिमा दहन पाहायला गेले होते. गुन्हा दुसऱ्यानेच केला आणि आमच्या मुलांना विनाकारण पोलिसांनी ताब्यात घेतले’, असे काहीजणांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
रविवारी रात्री होंडा वडाकडे येथे नरकासुर प्रतिमा दहनाच्या ठिकाणी कर्णकर्कश आवाज सुरू असल्याची तक्रार रूपेश पोके यांनी होंडा पोलिस चौकीत केली.
त्यानुसार पोलिसांनी होंडा वडाकडे येथील त्या गटाला आवाज बंद करावा, कशी सूचना केली. त्यावेळी येथे असलेल्यांनी हरकत घेत, आम्हीच का आवाज बंद करायचा. होंडा परिसरात ७० हून अधिक नरकासुर आहे. आवाज बंद करायचा असेल तर होंडा पंचायत क्षेत्रामधील सर्वांचाच करा, असे उत्तर दिले.
त्यावेळी सुमारे ४०० जणांच्या जमावाने होंडा पोलिस चौकीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पोलिस आणि सरपंच शिवदास माडकर यांनी दोन्ही गटातील नागरिकांची समजूत काढून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोके आणि इतर नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यावेळी येथे जमा झालेल्या लोकांनी पोलिस चौकीबाहेर उभी केलेली रूपेश पोके यांची स्विफ्ट डिझायर कारमध्ये फटाके फोडले. कार पेटल्यानंतर हे प्रकरण चिघळले.
पहाटे चारच्या सुमारास दोन्ही गटांमधील लोकांची समजूत काढल्यानंतर पोके यांनी आपल्याला कोणाही विरोधात तक्रार दाखल करायची नाही, असे सांगून तसे लेखी स्वरूपात लिहूनही दिले होते. तसेच घरी जाण्यासाठी त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली. त्यानंतर पोलिस चौकीकडे जमा झालेले लोक माघारी परतले.
सोमवारी संध्याकाळी होंडा पोलिस चौकीसमोर पोके यांचे वाहन फटाके फोडून जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पणजी येथे रूपेश पोके यांच्यासह शैलेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच वाहनाला आग कोणी लावली त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.
त्यानुसार मंगळवारी सकाळी रूपेश पोके यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. माझ्या कारला जाणूनबुजून पोलिस चौकीसमोर आग लावली; परंतु पोलिसांनी संबंधितांवर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप करत लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली.
पोलिस चौकीसमोर असे कृत्य केलेल्यांना सोडले जाणार नाही. कडक कलमे लावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना गजाआड केले जाईल. राज्यात कायदा-सुव्यवस्था खालावू देणार नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. पोलिस चौकीसमोर असे प्रकार घडत असतील तर गप्प बसणार नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर
होंडा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठजणांना अटक केली असून त्यांना पोलिस कोठडीत ठेवले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती वाळपईच्या महिला पोलिस उपनिरीक्षक समीक्षा नाईक यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.