Vijai Sardesai About Goa Tourism And Stray Dogs Issue
सासष्टी: गोव्यात पर्यटनाला उतरती कळा लागण्यामागे भटक्या कुत्र्यांचा पर्यटकांना होणारा त्रास, हे एक प्रमुख कारण आहे. मात्र, सरकार त्याबाबत काहीच उपाययोजना करीत नाही. केवळ १५ दिवसांचे शिबिर घेऊन भागणार नाही. सरकारने यावर गंभीर विचार करून वर्षभर अशा प्रकारची मोहीम राबविणे गरजेचे आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
श्वानांसाठी मोफत लसीकरण शिबिर सोमवार ६ जानेवारीपासून ‘व्ही फॉर फातोर्डा’ फुटबॉल मैदानावर सुरू करण्यात येणार आहे. हे शिबिर २४ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरदेसाई यांनी आज केले.
या शिबिरात श्वांनासोबतच मांजरांचेसुद्धा लसीकरण करण्यात येईल. या शिबिरात भटक्या तसेच पोसलेल्या श्वानांचे लसीकरण तसेच रॅबिजवर उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. स्टेसी सिक्वेरा यांनी यावेळी दिली. ज्यांना आपल्या श्वानांना शिबिरात आणता येत नसेल, त्यांना शिबिरात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे शिबिर डब्ल्यूव्हीएस, मिशन रेबिज आणि ‘व्ही फॉर फातोर्डा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.
दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या शिबिरात २४०० श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या २० दिवसांत सुमारे एक हजार श्वानांची शस्त्रक्रिया करण्याचा उद्दिष्ट असल्याचे डॉ. मुरूगन यांनी सांगितले. अशा प्रकारची शिबिरे नगरपालिका व पंचायतींनी आपापल्या क्षेत्रांत आयोजित करावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्थानिक नगरपालिका या उपक्रमासाठी पुढाकार घेत नाही म्हणूनच आम्हाला अशा प्रकारची शिबिरे आयोजित करावी लागतात. आगामी विधानसभा अधिवेशनात मी हा प्रश्न मांडणार असून उत्तर व दक्षिण गोव्यात श्वानांसाठी अशा प्रकारची शिबिरे वर्षभर सरकारने आयोजित करावीत, अशी मागणी करणार असल्याचेही आमदार सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.