Govind Gaude Big Revelation: गोव्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत माजी मंत्री गोविंद गावडे यांनी अखेर आपले मौन सोडले. सावंत मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या आमदार गोविंद गावडे यांनी रविवारी (22 जून) जाहीर सभा घेत भाजपमधील अंतर्गत गटबाजी, पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष आणि पक्षातील पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केले. मी दोनवेळा मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती, असेही गावडे म्हणाले.
गावडे म्हणाले, "2019 मध्ये जेव्हा रोहन खंवटे, विनोद पालयेकर आणि जयेश साळगांवकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, तेव्हा मी ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी याच तिघांनी मला राजीनामा देण्यापासून रोखले होते. त्यांच्या विनंतीमुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता, पण मनात निराशा होतीच."
गावडे पुढे म्हणाले की, ''मुख्यमंत्री सावंत यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्यावर कलाकार अनुदान निधीच्या वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्रस्त होऊन त्यांनी पुन्हा राजीनाम्याची तयारी दाखवली होती. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगून राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण त्यावेळी मुख्यमंत्री हसून गप्प राहिले होते."
दरम्यान, गावडे यांनी पक्षातील गटबाजी, संवादाचा अभाव आणि व्यक्तिगत आकस यांचाही पर्दाफाश केला. "पक्षामध्ये विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक असते. पण येथे जे चालले आहे ते निराशाजनक आहे. काही लोक आपापल्या फायद्यासाठी इतरांची प्रतिमा खराब करण्यात गुंतले आहेत. पण मी पक्षासाठी आणि लोकांसाठी काम करतो," असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
गावडे शेवटी म्हणाले, “मंत्रिपद गेल्यानंतर मी आमदारकीचा राजीनामा देणार किंवा भाजप सोडणार असल्याच्या अफवा असून त्या खोट्या आहेत. मी भाजपमध्येच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘विकसित भारत 2047’ आणि ‘विकसित गोवा (Goa)’ या संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.