पणजी: म्हादई नदीवर काजूमळ आणि तातोडी या दोन ठिकाणी लघू धरणे उभारण्यासंदर्भातील सर्वेचे काम पूर्ण झाले असून, त्याबाबतचे सविस्तर प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सल्लागारांची नेमणूक करून लवकरच या दोन्ही धरणांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. सोबतच पुढील काही वर्षांत म्हादईवर आणखी सहा लघुधरणे बांधण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत गेल्या अनेक वर्षांपासून म्हादई नदीचा वाद सुरू आहे. केंद्र सरकारने याबाबत स्थापन केलेल्या म्हादई पाणी वाटप लवादाने अंतिम निवाडा दिल्यानंतरही या तिन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, तेथे याप्रश्नी सुनावण्या सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर गोव्याच्या हद्दीत असलेल्या म्हादई नदीचे पाणी स्थानिक जनतेला मिळवून देण्यासाठी म्हादई नदीवर आठ ठिकाणी लघू धरणे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या धरणांसाठी आर्थिक तरतुदही केलेली होती.
त्यानंतर जलस्रोत खात्याने आठ ठिकाणे निश्चित करीत काजूमळ आणि तातोडी येथे लघू धरणे उभारण्यासाठी आवश्यक परवाने आणि सर्वेचे कामही हाती घेतलेले होते. सर्वेचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले असून, लवकरच सल्लागारांची नियुक्ती करून या दोन्ही लघू धरणांचे काम पुढील काहीच महिन्यांत हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय इतर सहा लघुधरणांच्या उभारणीसाठीची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.