Pramod Sawant, Ravi Naik, Deepak Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘भाजप-मगो’ युती टिकणार की तुटणार? फोंड्यात चर्चेला उधाण; मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे वाढला संभ्रम

BJP MGP Alliance: प्रियोळप्रमाणे फोंड्यातही भाजपचा आमदार असल्यामुळे युती राहिली तरी हाही मतदारसंघ भाजप ‘मगो’ला देणार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे.

Sameer Panditrao

फोंडा: गेली तीन वर्षे सरकारचा घटक असलेला मगो पक्ष आता भाजपपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे फोंडा तालुक्यातील समीकरणे बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. नुकतेच अशाप्रकारचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळ येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केल्यामुळे अनेक जर-तरच्या शक्यता व्यक्त व्हायला लागल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी नंतर जरी युतीबाबतचे आपले विधान मागे घेतले असले तरी प्रियोळ मतदारसंघात भाजप निवडणूक लढविणार या आपल्या विधानावर ते ठाम राहिले आहेत आणि याचे पडसाद फोंडा मतदारसंघात उमटायला लागले असून याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रियोळप्रमाणे फोंड्यातही भाजपचा आमदार असल्यामुळे युती राहिली तरी हाही मतदारसंघ भाजप ‘मगो’ला देणार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे. सध्या फोंड्यात भाजप उमेदवारीकरता कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक व फोंड्याचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी हे स्पर्धेत असून त्यामुळे सध्या या मतदारसंघात ‘नेहले पे देहला’ प्रकारचे राजकारण सुरू झालेले दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला गेल्यावेळी केवळ ७७ मतांनी निवडणूक हरलेले मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर हे परत एकदा रिंगणात उतरून आपले नशीब अजमावण्याच्या तयारीला लागले आहेत. पण त्यांचे भवितव्य हे प्रामुख्याने युतीच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. जर भाजप-मगो युती राहिली व फोंडा भाजपकडे गेल्यास भाटीकरांना वेगळी भूमिका घ्यावी लागेल, हे नक्की आहे.

भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, असे जर झाले तर भाटीकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात; पण फोंडा मतदारसंघात अजूनपर्यंत एकदाही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून लढल्यास विरोधकांपुढे आव्हान उभे करू शकतील की काय, हे सांगणे सध्या शक्य नाही.

मात्र, भाजप-मगो युती तुटल्यास भाटीकर मगो पक्षातर्फे निवडणूक लढवू शकतात आणि तसे झाल्यास ते परत एकदा मोठे आव्हान उभे करू शकतात, असा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मागच्या वेळी फोंड्यात काँग्रेस रिंगणात असूनही लढत झाली होती ती भाजप व मगोमध्ये. त्यावेळी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. यावेळीही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

मतांचे गणित महत्त्वाचे!

फोंड्याच्या भाजप उमेदवारीकरिता दोघेजण इच्छुक असल्यामुळे आणि दोघेही तयारीला लागल्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यास दुसरा त्याचे पाय ओढू शकतो, असा तर्क व्यक्त केला जात आहे. फोंड्यात भाजपची जवळजवळ सहा-साडेसहा हजार मते असली तरी ती जिंकून यायला पुरेशी नाहीत, हेही तेवढेच खरे. मागच्या वेळी रवी नाईकांना त्यांच्या वैयक्तिक मतांनी हात दिला होता, हेही लपून राहिलेले नाही.

फोंडा भाजपमधील गटबाजी अधोरेखित

१.फोंडा भाजपात सध्या दोन गट झाले असून याचे प्रतिबिंब अनेक ठिकाणी पडत आहे. फोंडा नगरपालिकेत भाजपचे दहा नगरसेवक असले तरी ते एकसंघ असल्याचे कोठेही दिसत नाही. काही नगरसेवक रितेश नाईक यांच्याबरोबर तर काही विश्‍वनाथ दळवींबरोबर असे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालिकेच्या वा सरकारी कार्यक्रमांना त्यांचे एकत्र दर्शन होणे सध्या तरी दुर्लभ झाले आहे.

२.कुर्टी-खांडेपार पंचायतीतही हीच स्थिती दिसत आहे. कार्यकर्त्यांबाबतही हेच चित्र अधोरेखित होत आहे. आता रितेश नाईक-विश्‍वनाथ दळवींच्या या संघर्षात कृषिमंत्री रवी नाईक हे सध्या पॅव्हेलियनमध्ये बसल्यासारखे वाटत असले तरी ते कधी मैदानावर येऊन सिक्सर मारतील हे सांगणे मात्र कठीण आहे. मात्र, भाजपश्रेष्ठींनी या गटबाजीवर लवकरच तोडगा न काढल्यास आगामी निवडणुकीत भाजपला ‘फोंडा’ डोकेदुखी ठरू शकतो, असा कयास राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

स्वबळावर उपक्रम

फोंड्यात मगो पक्षाचीही बऱ्यापैकी मते असली तरी ती उमेदवाराला यशाच्या शिखरापर्यंत नेण्यात कमी पडतात, यात शंकाच नाही. यामुळेच आपली ‘वैयक्तिक शक्ती’ वाढविण्याकरता इच्छुक उमेदवार सध्या स्वबळावर अनेक सामाजिक उपक्रमांत भाग घेताना दिसत आहेत. भाटीकरांनी ‘रायझिंग फोंडा’चा आधार घेतला आहे तर विश्‍वनाथ दळवी ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’च्या बॅनरखाली काम करताना दिसत आहेत.

‘मगो’ला फोंड्यात फायदा शून्यच!

प्रियोळ मतदारसंघ अनुसूचित जमातीकरता आरक्षित झाल्यास मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर हे फोंड्यात येऊ शकतात, असेही बोलले जात आहे. हे पाहता आगामी निवडणुकीत ही युती राहते की तुटते, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत. मात्र, युती टिकल्यास त्याचा फायदा फोंड्यात तरी मगो पक्षाला होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT