Unique Traditions In Goa Diwali Padva
डिचोली: माळरानावरील पारंपरिक जागेत बसून पोळे आणि चटणीचा आस्वाद घेण्याची गुरांच्या पाडव्यातील पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आजही काही मोजक्याच भागात टिकून आहे. त्यापैकीच एक मये हा गाव. मयेतील शेतकऱ्यांनी ही परंपरागत प्रथा आजही टिकवून ठेवली आहे.
बलिप्रतिपदेदिनी साजरा करण्यात येणाऱ्या गुरांच्या पाडव्याला ‘पोळ्यांचा पाडवा’ म्हणूनही ओळखण्यात येते. एक काळ असा होता, की पाडव्यादिवशी गोठ्यात गुरांची पूजा केल्यानंतर गुराखी अर्थातच शेतकरी घरात भाजलेले पोळे, चटणी आदी खाद्यपदार्थ घेऊन रानात जायचे. नंतर त्याठिकाणी पारंपरिक जागेत एकत्रित बसून पोळ्यांचा आस्वाद घेत असत. बदलत्या काळानुसार बहुतेक भागात ही परंपरा कालबाह्य झाली आहे. असे असतानाच, डिचोली तालुक्यातील मये गावात ही परंपरा आजही टिकून आहे.
वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही गुरांच्या पाडव्यातील ही परंपरा जोपासताना मये गावातील केळबायवाडा आदी भागातील शेतकरी सकाळी पोळे आणि चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन ‘वण्ण्यार’ येथील माळरानावर गेले. त्याठिकाणी सर्वांनी एकत्रित बसून पोळे, चटणी, चिकन आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पाडव्याचा आनंद द्विगुणित केला. साधारण तास-दीड तास माळरानावर घालविल्यानंतर हे शेतकरी माघारी फिरले. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांबरोबर लहान मुला-मुलींचाही समावेश होता.
१. गोपूजा झाल्यानंतर गोशाळेतील गुरांना पोळे खाऊ घालण्यात आले. गोशाळेतील महिला कामगारांसह विविध स्वयंसाहाय्य गटांनी हे पोळे बनविले होते. गोशाळेमध्ये मोकाट गुरांसह अपघातग्रस्त गुरांना आसरा देण्यात येत आहे.
२. विविध पंचायती आणि पालिकांनीही गोशाळेशी करार केला असून, आतापर्यंत विविध भागातील मिळून गोशाळेत ४ हजार ५५ गुरांना आसरा देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. दत्तराज नाईक पर्रीकर यांनी दिली.
३. गुरांच्या पाडव्यादिवशी प्रत्येकजण ‘गुराखी’ ही भावना बाळगून माळरानी जातात. ही परंपरा पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आजही ही परंपरा सुरू आहे. लहान मुलेही मोठ्या उमेदीने यात सहभागी होत आहेत.
सत्तरीतील नाणूस येथील अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात गोशाळेतील गोमातांची पूजा पार पडली. यावेळी गोप्रेमींनी उपस्थित राहून मोठ्या श्रद्धेने गोमातांची पूजा केली. केंद्राचे खजिनदार लक्ष्मण जोशी यांच्या उपस्थितीत विधीवत मंत्रोच्चाराने गोमातेची पूजा झाली. सत्तरीत आजही गोपालन पूजेला महत्त्व दिले जाते.
गोमंतक गोसेवक महासंघ संचलित सिकेरी-मये येथील गोशाळेत गुरांचा (गोधन) पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोपूजा केल्यानंतर गोशाळेतील गुरांना पोळे खाऊ घालण्यात आले. गोधन पाडव्याचे औचित्य साधून शनिवारी गोशाळा परिसरात बांधलेल्या घुमटीत भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आली.
ग्रामीण भागात एकेकाळी कृषी संस्कृतीची श्रीमंती गुरांच्या धनावर मोजली जात होती. आज कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण आले आणि गुरांना दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आज भटक्या गुरांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
असे असताना काणकोणात गुरांचा पाडवा पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला. सकाळी गोठ्यातील गुरांना आंघोळ घालून त्यांच्या गळ्यात नवे दावे, झेंडूच्या फुलांच्या माळा, पोह्यांची पुरचुंडी, खोबरे तसेच अंगावर रंगोटी करून त्यांना माळरानावर सोडण्यात येते. त्याशिवाय एका काठीवर घोंगडी ठेवून त्यासमोर दावे व कारिटे ठेवून गुराख्याची पूजा करण्याची काणकोणात परंपरा आहे. गोधनाबरोबरच त्यांना चरण्यास नेणाऱ्या गुराख्याचा गुरांच्या पाडव्या दिवशी सन्मान करण्याला या विधीत विशेष स्थान आहे. गोठ्यात गुरांची पूजा केल्यानंतर त्यांना माळरानावर सोडले जाते.
१. पूर्वीच्या काळी दुपारच्या वेळी सर्व गुराखी गुरांना चरण्यास सोडून माळरानावरील एका झाडाखाली दुपारचे जेवण करून विश्रांती घेत होते. त्या जागेला गोठण म्हणत. अशाच काही जागांवर आजही श्रीकृष्ण पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.
२. त्यापैकी पैंगीण पंचायत क्षेत्रातील कुंभेगाळ, शिसेव्हाळ, वेलवाडा, अर्धफोंड, गालजीबाग त्याचप्रमाणे लोलये पंचायत क्षेत्रात वेळ्ळी, पोळे येथे आजपासून श्रीकृष्ण पूजन केले जाते. काही ठिकाणी एक दिवसापेक्षा जास्त दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.