वाळपई: दाबे-सत्तरी येथे अडीच वर्षांपूर्वी विवाह झालेल्या एका विवाहितेचा विषारी फळे खाल्ल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या विवाहितेने विषारी फळे खाऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे दाबे परिसरात खळबळ माजली असून वाळपई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, विवाहाला अडीच वर्षांचा कालावधी झाल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरोली येथील एका तरुणीचा दाबे येथील युवकासोबत अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
घटनेच्या दिवशी सकाळी ही महिला आपल्या पतीसोबत डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरांकडून अपेक्षित स्पष्टीकरण किंवा समाधानकारक माहिती मिळाली नसल्यामुळे ती अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघेही घरी परतले. दुपारी त्यांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर तिचा पती बाहेर कामानिमित्त गेला होता.
दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पती घरी परतला असता त्याला पत्नी खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो घाबरला. त्याने तातडीने तिला वाळपई येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) पाठविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी
या महिलेच्या विवाहाला अडीच वर्षांचा कालावधी झालेला असल्यामुळे या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची प्रक्रिया सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी या प्रकरणातील परिस्थिती, उपलब्ध माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे वाळपई पोलिसही या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.