मडगाव: मडगाव पालिकेतील कर्मचारी पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेत घोटाळा झाला असून, ही परीक्षा पुन्हा घ्यावी ३० दिवसांत याबाबत निर्णय ना झाल्यास पालिकेचे कामकाज रोखू, असा इशारा दिला. मडगाव गट काँग्रेस व एनएसयूआय आणि युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची भेट घेतली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून न घेता पालिकेने घ्यावी, अशा आशयाचे परीपत्रक दाखवावे, अशी मागणी केली. त्याशिवाय अनेक उमेदवारांना पोस्टातून पाठवलेली परीक्षेची प्रवेशपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे पालिकेकडून त्यांना पत्रे पाठवली होती, त्याच्या पावत्या दाखवाव्यात, असेही बजावले.
मडगाव पालिकेतील सर्वेक्षक व लिपिकांची १३ रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेकडून प्रक्रिया करण्यात आली. ही रिक्त पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेत निम्म्यापेक्षा कमी परीक्षार्थींचा सहभाग होता, असा आरोप यावेळी करण्यात आला. मडगाव गट काँग्रेसचे निमंत्रक सावियो कुतिन्हो, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी व अन्य यावेळी हजर होते. पुन्हा परीक्षा नाही!
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले, की पालिकेकडून सर्व प्रक्रिया योग्यप्रकारे केलेली आहे. पुन्हा परीक्षा घेण्यात येणार नाही,असे स्पष्ट केले. त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढील महिनाभरात या परीक्षेबाबत योग्य चौकशीअंती पुन्हा परीक्षा घेण्यात न आल्यास मडगाव पालिकेचे कामकाज होऊ देणार नाही , असा इशारा दिलेला आहे. नगराध्यक्ष शिरोडकर यांनी हा सारा खटाटोप केवळ राजकीय श्रेयासाठी असल्याचे सांगितले.
एजन्सीव्दारे ही परीक्षा घेण्यात आली. ११ जागांसाठी सुमारे १७०० अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. उमेदवारांना पोस्टाद्वारे प्रवेशपत्र पाठवलेली होती. ज्यांनी प्रवेशपत्र न मिळाल्याच्या तक्रारी केल्या त्यांना पालिकेतून प्रवेशपत्रे दिली होती. पोस्टाच्या दिरंगाईमुळे प्रवेशपत्र न मिळाल्यास पालिका काहीही करू शकत नाही. प्रक्रिया योग्य नसल्याचे वाटत असल्यास त्यांनी न्यायालयात जावे, असे दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.