Margao Municipality : मडगाव पालिकेत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या सर्व काही अालबेल नाही ही बाब उघड झाली आहे. मडगाव येथील फेस्ताला ८ नोव्हेंबर रोजी सुरवात होत आहे. २२ दिवसांपूर्वी आपण मुख्याधिकाऱ्यांना त्याची तयारी करायला सांगितले होते.
फेस्ताला दोनच दिवस बाकी असताना बुधवारी कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले आहे. जर गेल्या वर्षी पेक्षा फेस्त फेरीतून पालिकेला कमी महसूल मिळाला तर बाकी रक्कम मुख्याधिकाऱ्यांकडून वसुल करून घ्यावी असे आपण सरकारला सांगणार असल्याचेही नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. तसेच मुख्याधिकारी फातोर्डाच्या आमदाराच्या कानातही तेल ओतण्याचे काम करतात असा आरोप नगराध्यक्षांनी केली.
नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी आपल्याला नगराध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा जो सल्ला दिला आहे त्याला काहीही अर्थ नाही. मी नगराध्यक्षपदी राहावे की नाही हे माझे नेते आमदार दिगंबर कामत व माजी आमदार दामू नाईक ठरवतील, असे शिरोडकर यांनी सांगितले. कामिल यांनी प्रथम विचार करायला हवा. आपणही सत्ताधारी पक्षाचा असल्याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे असेही नगराध्यक्षांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी केलेले आरोप
१ प्रशासकीय कामा बद्दलची सर्व माहिती मुख्याधिकारी लपवतात.
२ कचरा रस्त्यावर पडतो याला मुख्याधिकारी वाहन चालकाला जबाबदार धरतात.
३ सोनसोडो कचरा प्रकल्पात असलेल्या अधिकारी व कामगारांकडून मुख्याधिकारी काम करून घेत नाहीत.
४ मुख्याधिकारी नगरपालिकेत राजकारण करतात.
५ उच्च न्यायालयातील खटले किंवा सुनावणीबद्दल आपल्याला सांगत नाहीत.
६ आमदार रेजिनाल्ड यांनी बुधवारी सोनसोडो कचरा प्रकल्पात बोलावले ते आपल्याला सांगायला पाहिजे होते.
७ नगरपालिका कर्मचाऱ्यांना सतावतात, त्यांना मेमो देतात.
८ त्यांच्या अनेक भानगडीचे पुरावे आपल्याकडे आहेत.
९ मुख्याधिकाऱ्यांनी मेकॅनिकल इंजिनिअर रोहीत गावकरकडून रस्त्यावर कचरा पडण्यास वाहन चालक जबाबदार असल्याचे बळजबरीने लिहून घेतले.
मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मुख्याधिकारी शंखवाळकर यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आपल्याला सकाळी फोन करून बोलावले. आपण नगराध्यक्षांशी बोललो असल्याचे त्यांनी आपणास सांगितले.
त्यामुळे मी नगराध्यक्षांना सांगितले नाही. तसेच नगराध्यक्ष नगरपालिकेत आले नव्हते असेही ते म्हणाले. वाहनचालक जबाबदार याचे कारण असे की, पहिल्या दिवशीच त्याला वाहन कसे व कुठे ठेवावे हे सांगितले होते. ते त्याने ऐकले नाही व आपल्याला हवे तेच केले. रोहित गावकर हा सर्वांत अकार्यक्षम कर्मचारी असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
आपण वाहनचालक व कर्मचाऱ्यांबद्दल आमदार दिगंबर कामत यांना यापूर्वीच कल्पना दिलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांच्या भेटीस आपण कधी गेलोच नाही. आपली व त्यांची शेवटची भेट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.