Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मडगाव पालिका खरेच कारवाई करील?

Khari Kujbuj Political Satire: ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई कोण करणार याबाबत सरकारच्या यंत्रणांत एकवाक्यता नाही. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपजिल्हाधिकारी व पोलिसांकडे सरळ बोटे दाखवणे सुरू केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव पालिका खरेच कारवाई करील?

मडगाव शहराला गोव्याची आर्थिक राजधानी असे म्हणतात. मात्र, या शहरात निम्म्याहून अधिक आस्थापने बेकायदेशीर असून ही अशी आस्थापने काही नगरसेवकांसाठी चरण्याचे खास कुरण असल्याने अशा आस्थापनांकडे डोळेझाक केली जात असे, पण आता मुंबई उच्च न्यायालयाने अशा बेकायदेशीर आस्थापनांना टाळे ठोका असा आदेश दिला आहे. आता तरी मडगाव पालिका या बेकायदा दुकानदारांवर कारवाई करील का? ∙∙∙

मध्यरात्रीनंतरच्या गोंगाटाची जबाबदारी

ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई कोण करणार याबाबत सरकारच्या यंत्रणांत एकवाक्यता नाही. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपजिल्हाधिकारी व पोलिसांकडे सरळ बोटे दाखवणे सुरू केले आहे. पोलिस खाते, महसूल खाते आदेश देणार याकडे डोळे लावून बसते. यात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा कुठल्या कुठे वाहून जातो. प्रत्येक खात्याचे मंत्री वेगळे, त्यामुळे सरकारी पातळीवरही कोण एकटा जबाबदारी घेणार असे नाही. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ध्वनी प्रदूषणाची लक्तरे सर्वांनी पाहिली आहेत. आता नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मध्यरात्रीपर्यंतच संगीत वाजवण्यास परवानगी देण्यास सरकारने मुभा दिली आहे. खरे तर सरकारच्या परवानगीची गरजच कोणाला असते. सरत्या वर्षाची शेवटची रात्रच कशाला त्या आधीच्या तीन चार रात्री या मौजमजेसाठी असतात असा समज दृढ झाला आहे. ध्वनी प्रदूषण विषयक कायदे नियम या भूमीवर नसावेत किंवा ध्वनी प्रदूषणाला सरकारी मान्यता असावी असाच माहोल असतो. त्यामुळे सरकारने परवानगी दिली काय किंवा नाही दिली तरी कोणाचे काही अडणार नाही. मध्यरात्रीची मर्यादा ओलांडली जाईल आणि सरकारी यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवत नव्या वर्षाचे स्वागत करेल हे ठरून गेलेले असेल. ∙∙∙

नॉन सिरीयस काँग्रेस

काँग्रेस पक्षात काय चाललेय हे काँग्रेसवाल्यांनाच माहीत. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यावर चौकशी आयोग न नेमल्यास १८ नोव्हेंबरपासून संपूर्ण गोव्यात हा विषय तापवू असे १४ नोव्हेंबरला एकदा जाहीर केले. त्यानंतर शुक्रवार २१ नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे धरू असे जाहीर झाले आणि आता म्हणे शनिवार २३ नोव्हेंबरला युवक काँग्रेस व एनएसयूआयवाले आंदोलन करणार आहेत. त्यातच अमेरिकेत अदानींच्या अटकेचे वॉरंट जारी झाले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. दिल्लीहून गोव्यातही पत्रकार परिषद घेण्याचा आदेश आला आणि अमितरावांनी सोपस्कार करूनही टाकले, परंतु एवढ्या मोठ्या विषयाकडे तीन आमदार आणि खासदार कॅप्टननी पाठ फिरवली. आमचे नेतेच असे ‘नॉन सिरीयस’ असल्याने जनता काँग्रेसला गंभीरतेने कशी घेईल असे आता काँग्रेसवालेच म्हणू लागले आहेत. ∙∙∙

वाहतूक कोंडी

राज्यात इफ्फी महोत्सवावेळी पणजीत वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी आवश्‍यक प्रमाणात वाहतूक व जिल्हा पोलिसांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलिस महासंचालकांनी सांगितले होते. मात्र, आज इफ्फी काळात काढण्यात आलेल्या कार्निव्हल व शिमगो मिरवणुकीवेळी केलेल्या वाहतूक मार्गबदलामुळे पणजी शहरातील तसेच आजूबाजूच्या अंतर्गत रस्त्यावर एकच कोंडी झाली आहे. इफ्फीचा आस्वाद घेणाऱ्यांत गोमंतकीयांची संख्या कमी आहे. देश विदेशातून आलेले प्रतिनिधी यांची उपस्थिती अधिक आहे. मात्र, वाहतुकीच्या कोंडीचा त्रास मात्र गोमंतकीयांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी आठवड्यापूर्वी त्याची माहिती दिली असली तरी अचानक आज वाहतूक मार्गबदल केल्यामुळे वाहनचालकांना संध्याकाळी कार्यालये सुटून घरी जाताना पर्यायी अंतर्गत रस्ते शोधण्याची पाळी आली. अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाली. पोलिसांना या वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना धावाधाव करावी लागली. चोख कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात आली आहे असे जरी पोलिसांचे म्हणणे असले तरी लोकांना दरवर्षी या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागतेच. ∙∙∙

गोंयच्या सायबाची कृपा

गोंयचो सायब म्हणून ओळखले जाणारे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा कालपासून थाटात सुरू झाला. जुने गोवे आणि सभोवतीच्या परिसरात बऱ्यापैकी विकासकामे करण्यात आली असून रस्ते हॉटमिक्स केले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कुंभारजुवे आणि सांतआंद्रे मतदारसंघात रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्याने लोकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यात खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना अंग दुखी झाली, तर बऱ्याच जणांना अपघातही झाले. रस्ते दुरुस्त कधी होणार याच्या प्रतीक्षेत लोक होते. अखेर शवप्रदर्शन सोहळ्याच्या निमित्त सरकारकडून जुने गोवे आणि सभोवतीच्या परिसरातील रस्ते हॉटमिक्स केल्याने गोंयच्या सायबाची कृपा झाली, असे समाधानाचे सूर ऐकू येत आहेत. ∙∙∙

काँग्रेस झाली आक्रमक

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात काँग्रेसवाल्यांनी प्रश्‍न लावून धरला आहे. म्हार्दोळ पोलिस स्थानकावर काढलेला मोर्चा आणि त्यानंतर आता मोठे आंदोलन करण्याची दिलेली ग्वाही यामुळे काँग्रेस पक्षाला पुढील काळात चांगले दिवस असावेत असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. कारण सत्ताधाऱ्यांविरोधात तोंड उघडायला बहुतांशजण घाबरतात, उद्या कारवाई झाली तर... आणि ती होतेही. त्यामुळे विरोधकांऐवजी सत्ताधाऱ्यांकडे लोकांचा कल जास्त असतो. तरीही म्हार्दोळ येथे जाऊन मुख्यमंत्री व स्थानिक आमदार तथा मंत्र्याची प्रतिमा जाळणे यावरून काँग्रेस आता आक्रमक झाली आहे, हे मात्र खरे. ∙∙∙

अंबानी गेले, अदानी उरले!

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यापासून ते अगदी राज्यस्तरावरील नेत्यांकडून काही महिन्यांपूर्वी राज्यातील दोन उद्योगपतींचे भाजपशी असलेल्या संबंधावर टीका होत होती. अंबानी आणि अदानी हे दोन देशातील मोठे उद्योगपती, परंतु अंबानींपेक्षा अदानी हे वादातीत राहिले आहेत. त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंत मारलेली झेप ही अनेकांना तोंडात बोटे घालायला लावलेली आहे. आता त्यांचे कारनामे बाहेर येऊ लागले, तसे काँग्रेसने अंबानींवर टीका करायची सोडली आहे आणि केवळ अदानी हेच त्यांच्या अजेंड्यावरील एकमेव आडनाव राहिले आहे असे वाटते. अदानी यांनी केवळ भाजप सरकारच नाही, तर काँग्रेसचे ज्या राज्यात सरकार आहे, त्या ठिकाणी मोठी गुंतवणूक केली आहे. एका बाजूला त्यांच्या व्यवसायाला सर्व परवानग्या मिळवून द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय नेते आणि इतर राज्यांतील नेत्यांकडून टीकाही घडवून आणायची असा तर डाव नसेल ना! ∙∙∙

हे सारे केवळ कंत्राटदारांसाठीच का?

रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याबाबत खरी कुजबूज प्रसिध्द झाली अन् कधी नव्हे ते मडगावच्या पूर्व बगल रस्त्याच्या बाजूला कितीतरी वर्षांनंतर गटाराचे बांधकाम हाती घेतले. त्यानंतर रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला वाट मिळाली अन् अनेकांना दिलासाही मिळाला, पण आता एकंदर स्थिती पाहिली, तर हे गटार बांधकाम पाण्याला वाट करून देण्यासाठी केले गेले की कंत्राटदाराची सोय करण्यासाठी अशी चर्चा तेथील लोकांमध्ये सुरू झाली आहे. कारण घाईघाईत गटार बांधले गेले खरे, पण ते मुंज विहारापासून बांधले गेले नाही. तसेच त्या खालील भागांत जे बांधकाम सुरू आहे, तेथे गटार का बांधले गेले नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण मुद्दा तेवढ्यावर संपत नाही, तर गटारासाठी खोदकाम करताना जी माती निघाली ती मुख्य रस्त्याच्या बाजूला तसेच दुसऱ्या कडेला राशीच्या स्वरूपात पडून आहे व त्याला काही महिने उलटले. ही माती तेथून हलविण्याचा ठेकेदाराच्या कामांत अंतर्भाव नव्हता का, पावसाळ्यात ही माती वाहून गटारात पडणार असून त्यानंतर ती उपसण्यासाठी नवे कंत्राट देण्याचा हेतू तर त्यामागे नाहीना अशी शंका उपस्थित झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT