Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजयबाब, गाड्या कुठे ठेवायच्या?

Khari Kujbuj Political Satire: काल सदानंद शेट तानावडे हे कुडचडे येथे आले असता आमदार नीलेश काब्राल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Sameer Panditrao

विजयबाब, गाड्या कुठे ठेवायच्या?

मडगावच्या बोड्डे रस्त्यावरील अडचणीच्या बाबी हटवण्याचा इशारा स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पहाणी करून दिला आहे. त्यांनी खरे तर मुद्याच्या गोष्टीवर बोट ठेवले आहे. पण ज्या पध्दतीने त्या संपूर्ण परिसराचा विकास केला गेला आहे वा झाला आहे तो पहाता त्यावर कोणताच उपाय नाही असे त्या परिसरांतील लोक म्हणत आहेत. या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी दुकाने व शोरूम उभे ठाकले आहेत. तेथे जाणा-यांना रस्त्यावर वाहने ठेवूनच जावे लागते. खरे तर मोठाल्या शोरुम वा मॅालना परवाने देताना पार्किंगवर लक्ष ठेवायला हवे होते पण ते न झाल्याने या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. चौगुले कॉलेज रस्ता चौपदरी केला आहे व त्यावर पार्किंग वर्ज्य फलक लावले आहेत. पण तेथील स्टेट बॅंक, अन्य मोठाली दुकाने यात जाणाऱ्यांनी वाहने कुठे ठेवायची त्याचा निर्देश केलेला नाही. आमदार वा मंत्र्यांसमवेत पहाणीसाठी येणारे अधिकारी फक्त माना डोलावतात, पर्याय वा अडचणी दाखवत नाहीत. त्यांतूनच अशा समस्या तयार होत आहेत. याच परिसरांत म्हणजे बगलरस्त्यावर असलेल्या मॅक्स मॅालकडे जाणाऱ्यांनी वाहने कुठे ठेवावयाची याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आता आलेली आहे. कारण तेथे जाणारे चक्क मुख्य रस्त्यावर वाहने ठेवत असतात. ∙∙∙

काब्राल यांचे खडे बोल

काल सदानंद शेट तानावडे हे कुडचडे येथे आले असता आमदार नीलेश काब्राल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, तानावडे भाजप प्रदेशाध्यक्ष असताना सर्वांना बरोबर घेऊन जात होते. त्यांनी ज्याप्रकारे पक्ष कार्यकर्त्यांना मान दिला होता. तो सर्वांच्या लक्षात असल्याने जरी आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष नसले तरी आमच्यावर लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले. असे बोलण्याचे कारण म्हणजे या दिवसांत कुडचडेच्या राजकारणात नको असलेले प्रकार होताना दिसतात, असे काब्राल यांनी म्हटले. वास्तविक काब्राल यांचा हा दामू नाईक यांना टोला होता. दामूंचे नाव न घेता काब्राल यांनी ही फिरकी घेतली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर दामू नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कुडचडेचा दौरा केला होता. पण त्यावेळी काब्राल आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना बरोबर न घेता जुन्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन एकप्रकारे काब्राल यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काब्राल यांनी हे खडे बोल सुनावले. ∙∙∙

भोंगळ कारभाराचे वाभाडे म्हणावे का?

सरकारी कामातील भोंगळ कारभार अनेक प्रकरणातून दिसून येतो. आता सरकारच्या आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी दोना पावला जेटीचे प्रवेशद्वार तोडून ब्रेक निकामी झालेली बस जेटीवर गेली होती. त्या बसला फिटनेस प्रमाणपत्र अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी दिले होते. या विषयी एका खासगी वृत्तवाहिनीने ही बातमी दिली असल्याने या घटनेची चर्चा ‘आरटीओ’ कार्यालयात सुरू झाली. प्रमापणत्र दोन दिवसांपूर्वीच दिले असेल तर त्या बसचा ब्रेक कसा काय निकामी झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे त्या बसविषयी फिटनेस प्रमाणपत्र जर खरोखरच दिले गेले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर वाहतूक संचालक कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. यावरून सरकारी कामात कसा भोंगळ कारभार चालतो, ते यावरून दिसून येते. ∙∙∙

भंडारी समाजातील खदखद

भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराच्या रथयात्रा समितीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना स्थान देण्यात आले नाही. रथयात्रा धुळापी येथे आली असताना श्रीपाद यांनी देवदर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे पूत्र सिद्धेश हेही होते. तेही या रथयात्रेच्या निमित्ताने कुठे सक्रीय दिसले नाहीत ,अशी चर्चा आहे. जल संपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनाही का स्थान या समितीवर देण्यात आले नाही, अशी विचारणा होत आहे. ते असताना माजी मंत्री महादेव नाईक यांना रथयात्रेचे दक्षिण गोवा प्रमुख करण्यामागची भूमिकाही समाजात चर्चेत आहे. रथयात्रेच्या निमित्ताने गटबाजी बंद व्हावी, असे वाटत असणाऱ्यांसमोर हे नवे प्रश्न येऊ लागले आहेत.∙∙∙

बंधन घाला, सौजन्य दाखवा!

राज्यातील ३५ टक्के शॅक्सच्या मालकांनी दुसऱ्यांना शॅक्स चालविण्यास दिल्याचा दावा शॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी केला आहे. आता संघटनेचे अध्यक्षांनीच हे जाहीर केल्यामुळे या व्यवसायामागील अर्थकारण उघड झाले आहे. भाड्यापोटी लाखो रुपयांचा मलिदा ‘सुशेगाद''पणे मिळत असेल तर कशाला हवी ती झंजट, असा इरादा बाळगूनच अनेकजण भाड्याने शॅक्स देण्याकडे वळतात, असे म्हणावे लागेल. हरमल येथे भाड्याने चालविल्या जाणाऱ्या शॅक्सच्या ठिकाणी युवकाचा खून झाल्यानंतर शॅक्स व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शॅक्समध्ये यापूर्वीही बऱ्याच अनैतिक घटना घडल्या आहेत, पण त्याकडे त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा सोईस्कररित्या दुर्लक्ष करीत आल्या. परंतु वादातून स्थानिक युवकाचा खून झाल्यानंतर यंत्रणेची झोप उडाली. मात्र, असोसिएशनचे शॅक्स व्यवसायावर नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न आहे. शॅक्स असोसिएशनने आता स्वतःची घटना तयार करून गोयंकारपण जपले जाईल, अशी सेवा दिली जाईल याकडे लक्ष पुरविण्यासाठी पावले उचलावीत, असे सूचविले तर गैर वाटत नाही. ∙∙∙

‘ट्रस’चा वापर अन् अब्रू चव्हाट्यावर

कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात सध्या भारत रंगमहोत्सव सुरू आहे. ज्यावेळी अशा प्रतिष्ठीत नाट्यमहोत्सव आयोजित केले जातात, तेव्हा कला अकादमीतील रंगमंचाच्या उणिवा प्रकर्षाने चव्हाट्यावर येतात. ज्याप्रकारे रंगमंचासमोर ‘ट्रस’ उभारून व त्यावर लाईट्स टांगून प्रकाश योजना केली जात आहे, त्यातूनच नूतनीकरणाच्या दरम्यान केलेल्या प्रकाश योजनेतील उणिवा प्रेक्षकांसमोर स्पष्टपणे होत आहेत. यापूर्वीही नाट्य संस्थांना आपल्या प्रयोगासाठी भाड्याने ध्वनी योजनेची सोय करावी लागली होती. केवळ नाट्यसंस्थांनाच अशी कसरत करावी लागली नाही, तर तियात्र सादर करणाऱ्या संस्थांनाही याच अनुषंगाने जावे लागले होते. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांवर चौफेर टीका झाल्याने सरकारने त्याची तपासणी करण्यासाठी ज्येष्ठ नाट्यनिर्माते विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स बनवली, फोर्सने आपला अहवाल सरकारला दिलाही, पण पुढे काहीच झाले नाही. मात्र, रंगमंचावर प्रकाश योजनेतील चुका प्रतिष्ठित नाट्य स्पर्धेत आढळत असल्या तरी आयोजकांनी ‘ट्रस’चा वापर करून उरली-सुरली अब्रूही टांगली आहे, असेच दिसते. ∙∙∙

खर्च ‘कारंजा’वरचा ; अन् उद्‍घाटनाची चर्चा

मडगावचे रवींद्र भवन अनेक चांगल्या गोष्टींसाठी सध्या प्रसिद्ध आहे. राजेंद्र तालक तेथे आल्यापासून त्यांनी अनेक अभिनव गोष्टी सुरू केल्या. परंतु काल तेथे कारंजाचे उद्‍घाटन झाले, तेही नूतनीकरण केलेल्या कारंजाचे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचे कारण या कारंजाच्या नूतनीकरणासाठी ५८ लाख रुपये खर्च झालेत. गंमत म्हणजे याच रवींद्र भवनाच्या आतील बाजूला असलेल्या कारंजाचे उद्‍घाटन झाले, तेव्हा त्याचा खर्च २५ लाख रुपये आला होता. त्याची चौकशी सुरू झाली होती आणि अद्याप तो खर्च किंवा तो पैसा त्या कंत्राटदाराला मिळालेला नाही. त्यामुळे आता एवढा मोठा खर्च कारंजाच्या नूतनीकरणावर झाल्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारणे सुरू झाले आहे. त्यातही गंमत म्हणजे या नूतनीकरणाच्या उद्‍घाटनाला दिगंबर कामत उपस्थित होते. दामू नाईक यांनी हा कार्यक्रम सोयीस्कररित्या टाळला. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT