मडगाव: आपण मराठीप्रेमी आहोत. मराठी राजभाषा होणार आहे, एवढाच विचार करून आपले ध्येय साध्य होत नसते, तर येत्या २०२६ पर्यंत मराठीप्रेमींना जागृती पर्व करावे लागेल. राजकारणाची खेळी करून आपला स्वार्थ साधून घेणाऱ्या, राजकारण्यांना जेव्हा आपण आपली ताकद दाखवून देऊ, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील.
त्यामुळे आता या निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.
कुडचडे येथील सर्वोदय हॉलमध्ये आयोजित मराठीप्रेमींच्या मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर समन्वयक गो.रा. ढवळीकर, माजी नगराध्यक्ष अशोक नाईक, साहित्यिक उल्हास प्रभुदेसाई, ॲड. महादजी देसाई, ॲड. हर्षद गावस देसाई, शिवानंद देसाई आदी उपस्थित होते. मराठीला समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मराठीप्रेमींनी गोव्यात अभिजात मराठी भाषेवर होणारा अन्याय कायमचा मिटवण्यासाठी एकत्र येऊन एकदिलाने, अभिजात मराठीलाही गोव्याची राजभाषा करण्यासाठी कार्यरत राहून आपले ध्येय साध्य करूया अशी शपथ घेतली.
मराठी राजभाषा निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर म्हणाले, गोमंतकीयांसाठी शेकडो वर्षांपासून जीवनादर्श बनलेल्या, अभिजात मराठी भाषेला डावलून कोकणी या बोलीभाषेला राजभाषा म्हणून स्थान दिले गेले. राज्यात जेव्हा कोकणी राजभाषा झाली, तेव्हा जेमतेम कोकणी शिकणारी मुले होती.
मराठी भाषा त्र्याहत्तर हजारांहून अधिक मुले शिकत होती. कोकणी राजभाषा करेपर्यंत बहुतांश ग्रामपंचायतींचे व नगरपालिकांचे दफ्तर मराठीतून नोंदविले जात होते. ऐंशी टक्के लोकांची कोकणी ही बोलीभाषा हा निकष लावून तो दर्जा दबावाने दिला गेला.
कोकणीला राजभाषेचा दर्जा आहे, तो मागे घ्या, असे आमचे म्हणणे नाही; पण मराठीला डावलले गेले. देशात दिल्ली, पंजाब, तामिळनाडू व अन्यही राज्यांत, एकाहून अधिक राज्यभाषा स्वीकृत आहेत. मग मराठी ही राजभाषा झाली पाहिजे. ती मराठीप्रेमी सर्वस्वाने मान्य करून घेतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.