फोंडा: मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना उद्देशून ‘मराठी कुठली?’ अशी विचारणा करणारे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी तमाम मराठीप्रेमींचा अवमान केला आहे. त्यामुळे विजय सरदेसाई यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात यावा, अशी जोरदार मागणी मराठी राजभाषा समितीतर्फे करण्यात आली आहे. मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी फोंड्यात पत्रकारांशी बोलताना बेलगाम वक्तव्ये करणारे विजय सरदेसाई यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणून मराठीची शान राखावी असे आवाहन केले आहे. यावेळी मराठी राजभाषा समितीचे दिवाकर शिंक्रे व विनोद पोकळे उपस्थित होते.
गो. रा. ढवळीकर म्हणाले की, १९८७ साली गोवा विधानसभेने राजभाषा कायदा संमत केला गेला. त्यात सर्व शासकीय व्यवहारांमध्ये कोकणीबरोबरच मराठीलाही समान हक्क दिले आहेत. म्हणूनच या कायद्यानुसार सर्व शासकीय स्तरावर कोकणीबरोबर मराठीचा वापर करण्याचे बंधन आहे. असे असताना विधानसभेत मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांना ‘मराठी कुठली?’ असा सवाल विजय सरदेसाई करतात. तसेच त्यांना मराठीतून बोलण्यास प्रतिबंध करतात. सरदेसाई असे कसे काय करू शकतात? असा सवाल गो. रा. ढवळीकर यांनी केला.
ज्या विधानसभेत कायदा करून मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांना समान हक्क दिले आहेत, त्याच विधानसभेत एखाद्या सदस्याला मराठीतून बोलण्यास हरकत घेतली जावी हा खरे म्हणजे विधानसभेचा अवमान आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांसह सर्वच सदस्यांची बोलती बंद व्हावी आणि विधानसभेने दिलेल्या हक्कांची आणि स्वातंत्र्याची दखल एकाही सदस्याने घेतली जाऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? असे मराठी राजभाषा समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
विजय सरदेसाई यांना राजभाषा कायद्याचे ज्ञान नाही असे नाही तर त्यांनी मुद्दाम खोडसाळवृत्तीने हे वक्तव्य केल्याचा आरोप मराठीप्रेमींनी केला आहे. सुदिन ढवळीकर यांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला हवे होते. सभापती रमेश तवडकर यांनी तरी सरदेसाई यांना समज द्यायला हवी होती. परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षित अशी कृती घडली नाही. त्यामुळे एखाद्या सदस्याने विजय सरदेसाई यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडून सभागृहाची आणि तमाम मराठीप्रेमींची माफी मागण्यास त्यांना भाग पाडावे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखावी, अशी मागणी मराठी राजभाषा समितीने केली आहे.
आमदार विजय सरदेसाई यांनी मराठीबाबत नकारात्मक विधान करणे हे दुर्दैवी आहे. या विधानाचा सत्तरीतील मराठीप्रेमींनी निषेध केला. मराठीला मुख्यमंत्र्यांनी कोकणीसारखा पूर्ण राजभाषेचा दर्जा देऊन मराठीचा प्रश्न कायमचा सोडवावा, असा सूर सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमींतर्फे आज काणेकर सभागृहात उमटला.
या पत्रकार परिषदेला ॲड. शिवाजी देसाई, सदानंद काणेकर, तुळशीदास काणेकर, विजय नाईक, गौरीश गावस आदींची उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, गोवा स्वातंत्र झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी मराठी शाळांची निर्मिती केली. त्याचे कारण हेच होते की, गोव्यात मराठी रुजलेली होती. लोकांनी ओपिनियम पोलच्या बाजूने कौल दिला याचा अर्थ येथील मराठी भाषा संपली, असे होत नाही.
देशीभाषेचे संरक्षण हे केंद्र सरकारचे धोरण आहे आणि मराठी ही येथील भाषा आहे. आज विधानसभेमध्ये असंख्य आमदार हे मराठी भाषा बोलणारे आहेत. या आमदारांनी खरे म्हणजे विधासनभेत मराठीचा आवाज बुलंद केला पाहिजे. आमचा विरोध कोकणीला अजिबात नाही. परंतु त्याचबरोबर मराठी देखील रुजली पाहिजे.
विजय नाईक म्हणाले, मराठी भाषा गोव्यातून संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. तर, काणेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी कोकणीबरोबरच मराठीला पूर्ण राजभाषेचा दर्जा द्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.