म्हापसा: गणेशपुरीतील दरोड्याने मंगळवारी (ता.७) संपूर्ण राज्य हादरले. उत्तर गोव्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या म्हापसा शहरात पहाटे ३ ते ५ वा.च्या सुमारास सहा सशस्त्र बुरखाधारी दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र कामत घाणेकर (४९) यांच्या बंगल्यात डाव्या बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी ग्रील चौकोनी आकारात कापून प्रवेश केला आणि बंगल्यातील दाम्पत्याला बांधून घातले.
त्यांनी दरोड्यात ८ ते १० लाखांची रोख तसेच मौल्यवान सोन्याचे दागिने मिळून ३५ लाखांचा ऐवज पळविला. या घटनेमुळे घाणेकर कुटंंबीय अजूनही मानसिक तणावात आहे. धक्कादायक म्हणजे, या दरोडेखोरांनी घाबरलेल्या या कुटुंबीयांना प्राणघातक शस्त्र दाखवून ‘आवाज केला तर ठार मारू’ अशी धमकी दिली.
त्यांनी ८० वर्षीय वृद्धेलादेखील मारहाण केली. तिला किचनमध्ये डांबले. दरोडेखोरांच्या हातात सुरी व लोखंडी सळ्या होत्या. त्यामुळे घाणेकर कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. जातेवेळी दरोडेखोरांनी डॉक्टरांची कार घेतली आणि ते पसार झाले. विशेष म्हणजे, ही गाडी नंतर दरोडेखोरांनी पणजीत सोडून दिली. जी पोलिसांकडून नंतर हस्तगत करण्यात आली.
दरोडेखोर पळून गेल्यानंतर पीडितांपैकी डॉ. महेंद्र यांच्या पत्नीने स्वतःला कसेबसे आधी सोडून घेतले व नंतर इतरांची सुटका केली. त्यानंतर पीडितांनी घरासमोरील शेजाऱ्यांना घडलेली आपबीती सांगून, त्यांच्याकडून म्हापसा पोलिसांशी संपर्क साधला.
म्हापसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नंतर पोलिस अधिकारी व इतर लवाजमा पोहोचला. तसेच सकाळच्या वेळी पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. तर दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक अलोक कुमार, उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनीही भेट दिली व पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे, गुन्हे शाखेचे उपअधीक्षक, निरीक्षक व त्यांची टीम म्हापसा शहरात तळ ठोकून होती.
डॉ. महेंद्र घाणेकर व त्यांच्या पत्नी हे दोघेही डॉक्टर्स. ते म्हापसा जिल्हा इस्पितळात कार्यरत. महेंद्र हे स्त्रीरोगतज्ज्ञ, तर त्यांची पत्नी बालरोगतज्ज्ञ.
दरोडेखोरांनी फ्रीजमधील सफरचंद, संत्री खाल्ली, दोन तास वावरले घरात.
वृद्ध आईच्या हातचा चहा बनवून दरोडेखोरांनी शांतपणे प्याला.
वृद्धेचे हात बांधून तिला किचनमध्ये डांबले. दरोडेखोरांच्या हातात सुऱ्या व लोखंडी सळ्या होत्या.
बंगल्यातील सदस्यांचे कापडाने हातपाय बांधले व उशीमधील कापसाचे बोळे पीडितांच्या तोंडात कोंबले.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुदैवाने इजा नाही, तिलाही बेडरुमध्ये बांधले.
बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, दरोडेखोरांनी डीव्हीआर (रिकॉर्डर) काढून नेले.
सहाही दरोडेखोरांनी माकडटोप्या परिधान केल्या होत्या. सर्व ३५ ते ४० वयोगटातील.
पोलिसांनी प्रत्येकी पाचजणांची ८ पथके तयार करून शेजारील राज्यांत पाठविली.
पीडित कुटुंबीयांनी सशस्त्र दरोडेखोरांचा प्रतिकार केला नाही, अन्यथा ते हिंसक झाले असते, जे पीडितांच्या जीवावर बेतले असते.
म्हापसा शहरातील मुख्य जंक्शनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडथळा.
१ बंगल्याच्या डाव्याबाजूच्या खिडकीचे ‘ग्रील’ कापून आधी एकट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मुख्य दरवाजा उघडून आपल्या इतर साथीदारांना आतमध्ये घेतले. यावेळी डॉ. महेंद्र यांची आई ही किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती. हा चहासुद्धा दरोडेखोरांनी प्याला. नंतर ८० वर्षीय वृद्धेला तळमजल्यावरील किचनमध्ये बांधून डांबून ठेवले.
२ कालांतराने दरोडेखोर हे पहिल्या मजल्यावर गेले व तिथे बेडरुममध्ये असलेले डॉ. महेंद्र, त्यांच्या पत्नीला दमदाटी करून मारहाण केली व त्यांना बांधून ठेवले. यासाठी दरोडेखोरांनी बेडशीट, साडी फाडून दोघांचे हातपाय घट्ट बांधले.
३नंतर दरोडेखोरांनी घरातील कपाट व इतर ठिकाणी ठेवलेल्या मौल्यवान वस्तू व दागिन्यांवर डल्ला मारला. तसेच सर्वांच्या अंगावरील दागिनेदेखील काढून घेतले.
४ ८० वर्षीय वृद्धेला धमकावून तिच्याकडे असलेली रोख ८ ते १० लाख रुपये घेऊन दरोडेखोर पळाले. जातेवेळी दरोडेखोरांनी बंगल्याबाहेर गॅरेजमध्ये उभी (जीए-०३-पी-७१८७) कारही पळवली.
५घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल हिसकावून घेतले व नंतर ते बंगल्यापासून शंभर मीटरच्या आत फेकून दिले. हे फोन ‘स्वीच ऑन’च आहेत. पोलिस या मोबाईल संचांचा शोध घेत आहेत.
दरोडेखोरांनी डॉक्टरांची जी कार पळवली होती, ती त्यांनी पणजीत सोडली. तेथून ते टॅक्सी करून कर्नाटकला गेले. टॅक्सीचालकाने या दरोडेखोरांना बेळगावमध्ये सोडले. हे टॅक्सीभाडे ४ हजार ठरले होते. संबंधित टॅक्सीचालकाकडून आवश्यक माहिती घेऊन पोलिस पथक कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांना या दरोडेखोरांबद्दल महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरोडेखोरांना १०० टक्के पकडले जाईल. पोलिसांचा तपास योग्य मार्गावर आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून नाकाबंदी तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढविली जाईल. सर्वजण सराईत दरोडेखोर आहेत. ते उत्तर भारतीय हिंदी भाषेत आपापसांत बोलत होते. सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.